Site icon HW News Marathi

पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा, NDRF पथकांना सज्ज ठेवा! – मुख्यमंत्री

मुंबई | राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हवामन खात्याने मुंबईसह उपनगरांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. रायगड, रत्नागिरी, चिपळून आणि सिंधुदुर्ग मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे एनडीआरएफची टीम येथे तैनात करण्यात आली आहे. पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा, एनडीआरएफ पथकांना सज्ज ठेवा, असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून दिले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी वर्तविली आहे.

मुख्यमंत्री ट्वीटमध्ये म्हणाले, “चिपळूण येथील परिस्थितीकडेही सातत्याने लक्ष ठेवण्याचे आणि नागरिकांना वारंवार सूचना देऊन त्यांना सावध ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या. प्रसंगी त्यांना हलविणे करणे तसेच जीवितहानी होऊ देऊ नये यासाठी जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागांना सावध राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा, एनडीआरएफ पथकांना सज्ज ठेवा.”

दरम्यान, उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नंदुरबार आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाट क्षेत्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच आज ( 5 जुलै) मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागात 30-40 किलोमीटर प्रतितास वेगाने वादळ वारा व वीजेच्या गडगडाटासह मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस तर 6 व 7 जुलै दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबईतील मुसळधार पावसामुळे हार्बर लाईन आणि मध्य रेल्वे मार्गावरील सर्व ट्रेन्स या जवळपास ५ ते १० मिनिटे उशिराने धावत आहेत. तर पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सुमारे 10 मिनिटे उशिराने धावत आहेत. मुंबईत आज दिवसभर मुसळधार पावसामुळे कुर्ला, माटुंगा, सायन, ठाणे यांसारख्या स्टेशनवरील ट्रॅकवर पाणी भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित बातम्या
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ८ जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
Exit mobile version