Site icon HW News Marathi

राज्यातील सत्तांतराची सुनावणी लांबणीवर; पुढील सुनावणी 22 ऑगस्टला होणार

नवी दिल्ली | राज्यातील सत्तांतरावर 12 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) होणारी सुनावणी आता  22 ऑगस्टला होणार आहे. महाराष्ट्रातील सत्तांतरावरील सुनावणी आता 10 दिवसांनी पुढे ढकलली आहे. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल (9 ऑगस्ट) झाला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे 9 तर शिंदे गटातील 9 एकूण 18 आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे.

यापूर्वी 3-4 ऑगस्टला सलग दोन दिवस सुनावणी सुरू होती. न्यायालयात शिंदे गटाकडून हरीश साळवे, नीरज किशन कौल आणि महेश जेठमलानी आणि ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून राज्याचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयात युक्तिवाद केला होती. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्या. कृष्ण मुरारी आणि न्या. हिमा कोहली या त्रिसदस्यीय पीठापुढे काल सुनावणी झाली होती. दरम्यान, शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्ही बाजूने पाच याचिका दाखल केली होती.

न्यायालयातील युक्तीवाद

या प्रकरणाचे सर्व अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात यावा अशी मागणी शिंदे गटाने न्यायालयात केली होती. शिवसेनेवर दावा सांगण्यासाठी शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात का आलात? असा सवाल सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी केला. यावर शिंदे गटचे वकील नीरज कौल म्हणाले, आमच्या आमदारांच्या जीवाला धोका तर होताच. पण, आमच्या आमदारांना धमकी येत होती. यामुळे सर्वोच्च न्यायालयात यावे लागले. न्यायालयात कोणी पहिली याचिका दाखल केली, यावर शिंदे गटचे वकील हरिश साळवे म्हणाले, विधानसभा उपाध्यक्षांनी अपात्रतेची नोटीस बजावल्यानंतर आम्ही आधी न्यायालयात धाव घेतली. ठाकरे गटाच्या वकीलांनी शिंदे गटला दुसऱ्या पक्षात विलीन होण्याशिवाय पर्याय नसल्याचे वारंवार सांगितले. परंतु, शिंदे गटांच्या वकीलांनी देखील न्यायालयात म्हटले की, आमच्या आमदारांनी अजून ही पक्ष सोडला नाही. या प्रकारावर न्यायालयात काय निर्णय येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या आहेत 5 याचिका
1) शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईविरोधात याचिका
2) शिंदे गटाचे प्रतोद गोगावले, गटनेते एकनाथ शिंदेंच्या मान्यतेविरोधात याचिका
3) एकनाथ शिंदे यांच्या शपथ विधी आणि विशेष अधिवेशनाविरोधात याचिका
4) राज्यपालांनी ठाकरे सरकारला विश्वासमताबाबत दिलेल्या निर्देशाविरोधातील याचिका
5) शिंदे गटाचे प्रतोद गोगावलेंच्या व्हीपचे शिवसेना आमदारांकडून उल्लंघन झाल्याविरोधात याचिका
संबंधित बातम्या

जाणून घ्या… सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तांतरावर आज युक्तिवादात नेमके काय झाले

महाराष्ट्रातील सत्तांतरावर 8 ऑगस्टला होणार सुनावणी

Exit mobile version