HW News Marathi
संपादकीय

मुंबईकरांच्या मनस्तापाला कारणीभूत कोण ?

पूनम कुलकर्णी | मुंबईकर नक्की कुठे आहे सुरक्षित ? असा प्रश्न हल्ली सर्वसामान्य मुंबईकरांना पडू लागला आहे. लोकलची गर्दी, विस्कळीत होणारी वाहतूक, दुथंडी वाहणारे नाले, जागो जागो साचणारे पाणी, मेट्रोच्या खोदकामामुळे अरुंद झालेले रस्ते, रस्त्यावरचे खड्डे त्यात कमी की काय म्हणून वाढत असलेल्या दुर्घटना हे सर्व पाहिले तर खरचं प्रश्न पडतो मुंबईकर नक्की कुठे आहे सुरक्षित ? देशातल्या अनेक देखण्या शहरांपैकी एक नाव म्हणजे मुंबई. मुंबईतल्या वास्तू, प्रेक्षनीय स्थळे मुंबईचा इतिहास समुद्र किनारे एकदा पाहिले तर ज्याला त्याच कौतुक आणि आकर्षण वाटत नाही असा व्यक्ती मिळणे दुर्मिळ. 2 कोटी 13 लाखाच्या घरात लोकसंख्या असलेल्या मुंबईत प्रत्येकजण एक स्वप्न घेऊन येतो. कुणी फिल्म स्टार होतो तर कुणी फक्त कुंटुब जगविण्यासाठी कमवतो. रोजच लोकलचे धक्के खातो पण हा प्रत्येकजण मुंबईकर असतो. परंतु रोज धावणा-या या मुंबईकरांची सुरक्षा मात्र राम भरोसे आहे.

मुंबईकरच ठरतो नेहमी बळी

2 कोटी 13 लाख इतकी आवाढव्य लोकसंख्या तर 2018- 19 चे मुंबई महापालिकेचे बजेट 27,258 करोड इतके होते. मुंबई भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. भारतातील 10 % कारखाना-रोजगार (Factory employment), 40 % प्राप्तिकर, 20 % केंद्रीय कर (Central excise), 60 % आयात कर, 40 % परदेश व्यापार आणि 40 अब्ज रुपये (9 अब्ज अमेरिकन डॉलर्स) व्यावसायिक कर एकट्या मुंबईतून येतो. महत्त्वाच्या आर्थिक संस्थांची कार्यालये मुंबईत असून मुंबई शेअर बाजार, भारतीय रिझर्व बँक, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, टाटा, गोदरेज व रिलायन्स समूह अशा मोठ्या उद्योगसमूहांची मुख्य कार्यालये मुंबईत आहेत. 2008 साली मुंबईचे वार्षिक सकल उत्पन्न भारतीय रूपया 9,19,600 कोटी इतके होते व प्रती व्यक्ती आय भारतीय रूपया 1,28,000 होती, जी राष्ट्रीय सरासरीच्या तिप्पट आहे. अनेक आंतरराष्ट्रीय बँका व कंपन्यांच्या शाखा मुंबईत आहेत.सर्वसामान्यांना अवाक करणा-या या आकडेवारीसह मुंबईच्या अनेक बाबी देशवासियांनी आवाक करणा-या आहेत. परंतु प्रत्येक घटनेत मुंबईकरांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. कितीही मोठी घटना घडली तरीही रोज सकाळी उठून पुन्हा एकदा तितक्याच जोमाने मुंबईकर कामाला लागलेला पहायला मिळतो पण हेच स्पिरिट बहुदा केंद्र आणि राज्य सरकार व मुंबई महानगर पालिके ने गृहीत धरले आहे. मुंबईची लाईफ लाईन असलेली लोकल सेवा ठप्प झाली तर मात्र मुंबईकरांना प्रचंड मनस्थापाला सामोरे जावे लागते. मुंबईत झालेले बॉम्बस्फोट असोत दहशदवाद हल्ला असो किंवा मुंबईची तुंबई करणारा पुर असो अशा अनेक संकटांना मुंबईकर नेहमीच तोंड देतो. सतत धावणा-या या मुंबईकरांची जबाबदारी घेताना मात्र स्थानिक प्रशासन आणि सरकारकडून नेहमीच टोलवाटोलव केली जाते. मुंबईकरांच्या वाटेल फक्त मनस्ताप येतो.

पावसाळ्यात मुंबईची होते तुंबई

पावसाळा सुरु होण्यापुर्वी महापालिकेकडून दरवर्षी नालेसफाई उत्तम रीत्या केल्याचे महापौर घोषित करतात. परंतु पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई होते आणि सामान्य मुंबईकरांना मनस्थापाला सामोरे जावे लागते. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढणा-या शिवसेनेची मुंबई महापालिकेत सत्ता आहे. परंतु दरवर्षी पावसाला सुरुवात झाल्यानंतर मुंबईकरांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो. जागो जागी पाणी तुंबल्यामुळे देशाची अर्थिक राजधानी ठप्प होते. गावापासून इतक्या दुर पैसे कमवायला आलेला मुंबईकर दररोज सकाळी घाईने बाहेर पडतो परंतु त्याच्या सुरक्षिततेची हमी मात्र कुणीच घेत नाही. देशातल्या अनेक राज्यांचे अर्थिक बजेट पाहिले तर ते मुंबई बजेटच्या अगदी निम्मे देखील नाही. मग हा पैसा जातो तरी कुठे हा प्रश्न अनेक जागी होणा-या भ्रष्टाचाराकडे बोट दाखवणारा आहे. यंदा 2018 च्या पावसाळ्यात मुंबईची तुंबई होण्याला महापालिका जबाबदार नसून याला सर्वस्वी राज्यसरकारचा मेट्रो प्रकल्प जबाबदार असल्याचे म्हणत मुंबईच्या महापौरांनी हात झटकले. त्यामुळे मुंबईकरांची सुरक्षितता या पावसाळ्यात कोणाच्या भरवश्यावर ?

गोखले पूल दुर्घटनेनंतर एकमेकांकडे बोट दाखवत रेल्वे-पालिकेने केले हात वर

पश्चिम रेल्वेच्या अंधेरी रेल्वेस्थानकाजवळ असलेल्या पुलाच्या दुर्घटनेवरुन रेल्वे प्रशासन आणि मुंबई महापालिकेमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पहायला मिळत आहेत. कोसळलेला गोखले पूल हा मुंबई महापालिके अंतर्गत येतो, असे रेल्वे प्रशासनाने पत्रकाद्वारे म्हटले आहे. तर दुसरीकडे गोखले पुलाच्या देखभाल- दुरुस्तीची जबाबदारी रेल्वेची असून या दुर्घटनेसाठी रेल्वे प्रशासनच जबाबदार आहे, असा आरोप मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे. दरम्यान, महापौरांच्या या वक्तव्यावर भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी टीकास्त्र सोडत ”कोसळलेला पूल मुंबई महापालिकेनं बांधला आहे. त्याच्या देखभालीचे कार्य मुंबई महापालिकेने करणे आवश्यक होते’,असे म्हटले आहे. एकूणचं काय नेहमी प्रमाणे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत राजकीय पक्ष पुन्हा एकदा मुंबईकरांची दिशाभूल करत मुख्य मुद्याला बगल देताना दिसून येत आहेत. त्यामुळे मंगळवारी सकाळी घडलेल्या या दुर्घटनेत मुंबईकरांना झालेल्या त्रासाकडे सरकार सोईस्कर दुर्लक्ष करताना पहायला मिळत आहे.

 

एलफिन्स्टन दुर्घटनाने प्रशासनाला आली जाग

गतवर्षी 29 सप्टेंबर 2017 रोजी मुंबईत एलफिन्स्टन ब्रीजवर झालेल्या चेंगराचेंगरीत 22 निष्पाप मुंबईकरांना आपले प्राण गमवावे तर 30 जण जखमी झाले . या दुर्घटनेनंतर नव्या पुलाला मंजुरी देण्यात यावी. दरम्यान, या मुंजरीसाठी तुम्हाला लोकांचे बळी हवे होते का, अशा तीव्र शब्दात लोकांनी संताप देखील व्यक्त केला. नव्या रेल्वे पुलासाठी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी तात्काळ साडेनऊ कोटींचा निधी मंजूर केला. त्यावेळी सरकारने पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी आपण पुर्ण प्रयत्न करु जुन्या पुलांच्या डागडुजी पासून ते नवे पुल बांधण्यापर्यंतच्या अनेक घोषणा केंद्रसरकार आणि राज्यसरकार कडून करण्यात आल्या. लष्काराला पाचारण करुनएलफिन्स्टन येथे नवा पुल बांधण्याचा घाट घातलेला बघून मुंबईकरांचा जीव भांड्यात पडला. परंतु 3 जुलै 2018 रोजी अंधेरीच्या गोखले ब्रीजचा काही भाग खचून झालेल्या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा मुंबईकरांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे.

कमला मिल आग प्रकरण आणि 14 जणांचा बळी

लोअर परळ भागात असलेल्या कमला मिल कंपाऊंडमधल्या हॉटेल मोजोसला 29 डिसेंबर 2017 ला आग लागली. ही आग एवढी भीषण होती की, मोजोसच्या बाजूलाच असलेलं लंडन टॅक्सी हे रेस्टॉरंटही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या आगीत गुदमरून 14 जणांचा मृत्यू झाला तर 14 हून अधिक जण जखमी झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी 4 तासांचे शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले.मोजोस हे रेस्टॉरंट पूर्णतः शाकाहारी असल्यामुळे गुजराती, मारवाडी आणि सिंधी लोकांची या गर्दी असे. कमला मिल कंपाऊंडमध्ये tv9 मराठी, टाइम्स नाऊ, मुंबई मिरर सारखी मीडिया हाऊस देखील आहेत. या ठिकाणी आग लागून 14 जणांचा बळी गेल्यानंतर महापालिका प्रशासनाने या रेस्टॉरंट परीसरातील सुरक्षा व्यवस्थापणाकडे सरकारचे लक्ष गेले. येथील आस्थापनांचे सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. महापालिका आणि सरकारने वेळेत कारवाईचा बडगा उगारला असता तर कदाचित ते 14 नाहक बळी गेले नसते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत २६ जुलैची पुनारावृत्ती होऊ शकते ?

swarit

ठाकरे बंधू एकत्र आले तर…

swarit

महिलांची सुरक्षा नक्की आहे तरी काय ?

swarit