HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रभक्तीची भावना मनात सतत तेवत ठेवा! – उपमुख्यमंत्री

पुणे । भारताचा तिरंगा ध्वज हा आपल्या आत्मविश्वासाचे , आत्मभानाचे, आत्मतेजाचे आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी १५ ऑगस्ट रोजी आपला तिरंगा ध्वज घरावर फडकवावा आणि देशाविषयीची अभिमानाची भावना मनात सतत तेवत ठेवावी, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सव व ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) कार्यक्रमांतर्गत आयोजित युवा संकल्प अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, सिद्धार्थ शिरोळे, शिवेंद्रराजे भोसले,सुनील कांबळे, कुलगुरू डॉ. कारभारी काळे, आयोजन समिती अध्यक्ष डॉ.राजेश पांडे आदी उपस्थित होते.

पुणे विद्यापीठाचे उपक्रमाबाबत अभिनंदन करून उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कुठल्याही देशातील राष्ट्रभक्त तरुणांनी मोठ्या संख्येने राष्ट्रध्वज फडकविण्याचा हा अनोखा विक्रम असेल. हा सर्वांसाठी अभिमानाचा क्षण असणार आहे. या उपक्रमासोबत स्वातंत्र्यलढ्यात आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या अनामिक स्वातंत्र्य सैनिकांना शोधून नव्या पिढीपुढे आणण्याची आवश्यकता आहे.

आजच्या पिढीत देशाला विश्वगुरु पदापर्यंत पोहोचविण्याची क्षमता


स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रप्रेमाने भारावलेली पिढी होती, स्वातंत्र्यानंतर देशाला स्वयंपूर्ण करण्याचे ध्येय समोर असलेली पिढी होती, तर आज देशाला विश्वगुरू पदापर्यंत पोहोचविण्याची क्षमता असलेली पिढी देशाला पुढे नेत आहे. संशोधन, नाविन्यता आणि उद्यमशीलतेच्या बळावर या पिढीने जगाला चकित केले आहे. जागतिक स्तरावर देशाला विकासाकडे घेऊन जाताना त्यांची नाळ राष्ट्राशी जोडण्यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून करण्यात येत आहे. बलशाली भारताचे स्वप्न साकार करण्यात हा उपक्रम यशस्वी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ध्येय ज्ञानाधारीत समाजव्यवस्था निर्माण करणार


 फडणवीस म्हणाले, विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करण्याचे हे एक माध्यम आहे. या माध्यमातून ज्ञानाधारीत समाजव्यवस्था निर्माण करायची आहे. केवळ शिक्षित समाज निर्माण करून उपयोगाचे नाही तर विद्यार्थ्याची वाटचाल ज्ञानाकडे व्हायला हवी आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे समग्र व्यक्तिमत्व घडायला हवे. राष्ट्र घडविण्यासाठी समाजाविषयी जाणीव असलेले विद्यार्थी निर्माण करणारी व्यवस्था अनुकूल परिवर्तन घडवू शकते. अशा उपक्रमाच्या माध्यमातून युवा पिढीला समाजाशी जोडत असल्याने त्याला महत्व आहे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मंत्री पाटील म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरोघरी तिरंगा फडकविण्याचे आवाहन केले. त्या अंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विश्वविक्रमाचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. देशाविषयी अभिमानाची भावना आणि देशभक्तांच्या त्यागाविषयीची तरुणांमध्ये जाणीव निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम महत्वाचा आहे. १८ ते २५ वयोगटातील पिढीला इतिहासाची माहिती व्हावी यासाठी हा उपक्रम आहे. देशासाठी चांगले कार्य करून त्याचा गौरव वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी योगदान देण्याची भावना या उपक्रमातून निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कुलगुरू डॉ.काळे म्हणाले,स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील घराघरात स्वातंत्र्यप्रेमाची भावना निर्माण करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. पुणे, अहमदनगर, व नाशिक या तिन्ही जिल्ह्यातून उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. अभियानात उस्फूर्त व स्वयंप्रेरणेने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. विद्यापीठाने नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विविध क्षेत्रात प्रगती केली असल्याचे ते म्हणाले.

प्रास्ताविक आयोजन समिती अध्यक्ष डॉ.राजेश पांडे यांनी केले. युवा संकल्प अभियान स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतीकारकांना अभिवादन करण्यासाठी आहे. किमान ५ लाखांहून अधिक व्यक्तींनी तिरंगा ध्वज हातात घेतलेला स्वतःच्या छायाचित्रांचा ऑनलाइन अल्बम करून गिनीज जागतिक विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेतर्फे उपक्रमासाठी प्राप्त ५ लाख तिरंगा ध्वजाचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाला प्र – कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, आयोजन समिती सदस्य डॉ. संजय चाकणे, प्रसेनजित फडणवीस, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. प्रभाकर देसाई, अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, इतर सर्व अधिकार मंडळाचे सदस्य, प्राचार्य, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमापुर्वी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. तत्पूर्वी विद्यापीठाच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली.

युवा संकल्प अभियान

‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सहभागी होत असून या निमित्ताने युवा संकल्प अभियानाची सुरुवात करण्यात येत आहे. या अभियानात विद्यापीठाचे ५ लाखांहून अधिक आजी माजी विद्यार्थी स्वयंप्रेरणेने सहभागी होतील असा प्रयत्न आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्व घटकसंस्था, महाविद्यालये, परिसंस्था, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीदेखील स्वयंप्रेरणेने सहभागी होत आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी दत्तक गावांमध्ये हा संकल्प प्रत्यक्षात आणण्याचा निर्धार केला आहे. ७५० हून अधिक महाविद्यालये, ६५ हजार राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, ३ हजारहून अधिक प्राध्यापक यांच्या एकत्रित प्रयत्नातून ५ लाखाहून अधिक विद्यार्थी व नागरिक आणि विविध सामाजिक क्षेत्रापर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

३१ डिसेंबर साजरा करताय? मग राज्य शासनाचे हे ‘१०’ नियम आधी पाहा! 

News Desk

बारामतीमधील शरद पवारांच्या ‘गोविंदबाग’तील पोलीस बंदोबस्तात वाढ

Aprna

किरीट सोमय्या यांना काही मदत हवी असेल तर मी स्वत: हजर होईल – आज्ञा नाईक

News Desk