HW News Marathi
महाराष्ट्र

विकासाच्या वाटेवर अग्रेसर राहण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध!– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक। नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक गडकिल्ले आहेत. या गडकिल्ल्यांच्या संवर्धनातून त्यांचे ऐतिहासिक वैभव जपण्यसाठी प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे विकासाच्या वाटेवर अग्रेसर राहण्यासाठी जिल्ह्याला राज्य शासन कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले आहे.

शुक्रवारी महाकवी कालीदास कलामंदिर येथे नाशिक रत्न पुरस्कारांच्या (Nashik Ratna Award)  वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, छत्रपती संभाजीराजे भोसले, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर-पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, सपकाळ नॉलेज हबचे संचालक रवींद्र सपकाळ, नाशिक न्युजचे मुख्य संपादक लक्ष्मण घाटोळ-पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबई, पुणे या शहरांच्या सोबत विकासाच्या वाटेवर अग्रेसर असलेले महत्त्वाचे शहर म्हणून नाशिकची ओळख आहे. या ठिकाणी दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरत असल्याने जगात धार्मिक शहर म्हणून देखील नाशिकचा नावलौकीक आहे. त्याचप्रमाणे अनेक गडकिल्ल्यांचा वारसा लाभल्याने स्वराज्याच्या रक्षणाचे केंद्रबिंदू म्हणून नाशिक ओळखले जाते.  धार्मिक, सांस्कृतिक ही ओळख जपत नाशिक जिल्ह्याने उद्योग, कला, कृषी, पर्यटन अशा सर्वच क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे. पर्यटनाला चालना देवून नाशिकमध्ये विकास साधला जाईल. गडकिल्ल्‍यांच्या संवर्धनासाठी राज्य शासनामार्फत प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी ग्वाही ही मुख्यमंत्री  शिंदे यांनी दिली.
2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कोणतीही गैरसोय होणार नाही याकरिता शासनामार्फत नियोजन करण्यात येईल. नाशिक महानगर व जिल्हा विकास आराखडा तयार करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. बळीराजाला केंद्रबिंदू मानून त्याला सर्वोतोपरी मदत करत आहे. उद्योग वाढीसाठी प्रयत्न करून रोजगार  निर्मितीवर राज्य शासनाच्यावतीने भर देण्यात येत आहे. पुरस्कारार्थींनी समाजाचे आपण देणे लागतो या भावनेतून  समाजहिताचे काम अखंड सुरू ठेवावे. तसेच आपल्या कामातून इतरही प्रेरित होतील यादृष्टीने प्रयत्नशील रहावे, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.
पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात समर्पित भावनेतून जनेतेची सेवा करणाऱ्यांचा नाशिक रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. पुरस्कारार्थीनी त्यांच्या क्षेत्रात केलेल्या कामातून निश्चितच सर्वांना प्रेरणा मिळेल, अशी भावना व्यक्त करत उपस्थितांना पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
छत्रपती संभाजीराजे भोसले म्हणाले, कोल्हापूर नंतर सर्वगुण संपन्न शहर म्हणून नाशिकची ओळख आहे. रायगड किल्ला संवर्धनाच्या धर्तीवर नाशिक येथील किल्ल्यांचे सवंर्धन करण्यासाठी शासनाने सहकार्य करावे. तसेच राजर्षी शाहू महाराजांनी समतेच्या लढ्यासाठी पिंपळगाव बसवंत येथे इतिहास घडविला आहे. त्यामुळे नाशिक येथे शाहू महाराजांच्या   जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे स्मारक व्हावे. तसेच पर्यटनाच्या दृष्टिने जिल्ह्याचा विकास होण्यासाठी राज्य शासनाने सहकार्य करण्याची अपेक्षा यावेळी संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केली.

नाशिक रत्न म्हणून यांचा झाला सन्मान…

  • राजकीय क्षेत्र : डॉ. भारती पवार, केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री
  • पोलीस प्रशासन : सुनील कडासने, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक
  • प्रशासकीय : लीना बनसोड, आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक
  • वैद्यकीय क्षेत्र : डॉ. आवेश पलोड, नाशिक महानगरपालिकेचे वैद्यकीय अधीक्षक
  •     विधज्ञ : ॲङ नितीन ठाकरे, अध्यक्ष, नाशिक वकील परिषद
  •     पर्यटन : शशिकांत जाधव, संचालक, नाशिक फ्लावर अँड शुभम वॉटर पार्क
  •  बांधकाम : ललित रुंग्ठा, सीईओ, रुंग्ठा ग्रुप
  •    व्यापार : राजेंद्र शहाणे, संचालक, मयुर अलंकार
  •  उद्योग : प्रविण मराठे, सीईओ, ईशा पब्लिसिटी, नाशिक
  •    शैक्षणिक : साने गुरूजी शिक्षण संस्था
  •    शेती : शिवाजी ढोले, प्रयोगशील शेतकरी

यांना शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नाशिक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेते पदी निवड

News Desk

संघर्ष कधी करायचा अन् संवाद कधी साधायचा, हे ज्याला कळतं तोच खरा नेता- उद्धव ठाकरे

News Desk

संजय राऊतांपेक्षा आदित्य ठाकरेंना गोव्याची जास्त माहिती, नितेश राणे यांची खरमरीत टीका!

News Desk