HW News Marathi
राजकारण

धर्मवीराच्या महान पित्याचा, छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे ‘अण्णाजी पंत’ आज सत्तेवर! – सामना

मुंबई | “धर्मवीराच्या महान पित्याचा, छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे ‘अण्णाजी पंत’ आज सत्तेवर आहेत”, असा टोला सामनाच्या (saamana) अग्रलेखातून शिंदे-फडणवीस सरकारसह त्यांच्या पक्षातील नेत्यांना लगावला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान केला होता. राज्यपालांच्याविरुद्ध राज्यात संतापाचा उद्रेक झाला, महाविकास आघाडीने विराट मोर्चा काढला. तरी ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तारतम्य बाळगणार आहेत काय? , असा सवाल ठाकरे गटाने केला आहे.

सामनाच्या अग्रलेखात अजित पवारांच्या समर्थनात म्हणाले, ” छत्रपती संभाजी महाराजांच्या राजकीय, आर्थिक, धार्मिक धोरणांवर छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा कोरलेला आढळतो. त्याच स्वराज्य रक्षणासाठी संभाजीराजांनी इतिहासातील सगळय़ात मोठा त्याग व बलिदान केले. एखादा तपस्वी व धर्मवीरच असे बलिदान करू शकतो. त्या धर्मवीराच्या महान पित्याचा, छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे ‘अण्णाजी पंत’ आज सत्तेवर आहेत, राजभवनात ठाण मांडून बसले आहेत. त्यांना पाठीशी घालणारे अण्णाजी पंतांचे समर्थक अजित पवारांना तारतम्य बाळगण्याचा सल्ला देतात हीच खरी गंमत आहे. आधी शिवराय अपमानप्रकरणी राज्यपालांना हटवण्याची मागणी करा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे तारतम्य बाळगणार आहेत काय?”

 

सामनाच्या अग्रलेखता नेमके काय  म्हणाले

अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्यासंदर्भात केलेल्या विधानावरून भाजपने धुरळा उडवायला सुरुवात केली आहे. ”छत्रपती संभाजी महाराजांना आपण स्वराज्य रक्षक म्हणतो. ते धर्मवीर नव्हते. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचा कुठे पुरस्कार केला नाही.” असे विधान अजित पवार यांनी करताच भाजपपुरस्कृत धुळवड संघटनांनी गदारोळ सुरू केला. संभाजीराजांचे बलिदान हे धर्मासाठीच होते याबाबत कुणाच्याही मनात शंका नाही, पण छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण केले त्या स्वराज्य रक्षणासाठीही छत्रपती संभाजीराजेंनी त्याग आणि बलिदान केले. अजित पवार म्हणतात, ”छत्रपती संभाजीराजे स्वराज्य रक्षक होते. धर्मवीर नव्हते.” आम्ही म्हणतो, खरा धर्मवीरच स्वराज्याचा रक्षक असतो. तेव्हा त्यात उगाच श्लेष काढून कोणाला छाती पिटण्याची गरज नाही. मात्र यावरून उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांवर टीकेची झोड उठवली आहे. अजित पवारांनी तारतम्य बाळगावे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. तारतम्याची भाषा मुख्यमंत्री शिंदे यांनी करावी हे आश्चर्यच आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचा अपमान राज्यपाल कोश्यारी व भाजपच्या अनेक पुढाऱ्यांनी केला तेव्हा ”राज्यपाल, तारतम्य बाळगा!” असे सांगण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांना झाली नाही. कुणी शिवरायांना ‘माफीवीर’ म्हणाले, तर कुणी ‘इतिहासातील जुने नेते’ म्हणून शिवरायांची चेष्टा केली. हे काय तारतम्यास धरून होते? राज्यपालांनी शिवरायांचा अपमान करूनही ते राजभवनाची हवा खात बसले आहेत. राज्यपालांविरुद्ध राज्यात संतापाचा उद्रेक झाला, महाविकास आघाडीने विराट मोर्चा काढला. यावर कोणतेही तारतम्य न बाळगता उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘हा नॅनो मोर्चा आहे’ अशी त्याची संभावना केली. वास्तविक, हा मोर्चा शिवरायांच्या अपमानाविरुद्ध होता याचे तारतम्य तरी फडणवीस यांनी बाळगायला हवे होते. शिवराय हेसुद्धा हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणजे धर्मवीरच होते व त्यांचाच वारसा

त्यांच्या छाव्याने

म्हणजे संभाजीराजांनी पुढे चालवला. प्रश्न इतकाच आहे की, शिवरायांच्या अपमानावर शेपूट घालून बसणारे संभाजीराजांच्या निमित्ताने तारतम्याची भाषा करू लागले आहेत. या मंडळींना संभाजीराजे कळलेच नाहीत. संभाजी महाराज हे अत्यंत देखणे, करारी व शूर होते. त्यांना कला, साहित्याची आवड होती. त्यांना अनेक भाषा अवगत होत्या. राजकारणातील बारकावे त्यांनी लहान वयातच आत्मसात केले होते. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर 12 दिवसांत जिजाऊंचे निधन झाले. त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते. तरुण, स्वाभिमानी संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकऱ्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले. अमात्य अण्णाजी पंत दत्तोंच्या कारभारास संभाजी महाराजांचा विरोध होता. अण्णाजी पंतांचा कारभार स्वराज्यासाठी योग्य नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. तरीही शिवाजी महाराजांनी अण्णाजी पंतांच्या भ्रष्ट कारभाराकडे अनेकदा दुर्लक्ष केले. कारण अण्णाजी हे अनुभवी व कुशल प्रशासक होते, पण संभाजीराजांना ते मान्य नव्हते. त्यामुळे अण्णाजी पंत दत्तो व इतर मानकरी संभाजीराजांच्या विरोधात गेले. अण्णाजींच्या गुप्त इशाऱ्यांमुळे दरबारातील इतर मानकरी संभाजी महाराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले. यामागे अण्णाजी पंतांचे कारस्थान होते. पंतांच्याच विरोधामुळे संभाजीराजांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. मुख्य म्हणजे शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजी महाराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधान मंडळाने नकार दिला. त्यामुळे अत्यंत नाइलाजाने शिवाजी महाराजांना कोकणातील

शृंगारपूरचे सुभेदार म्हणून

संभाजीराजांना पाठवावे लागले. या सगळय़ामागे अण्णाजी पंत दत्तो होते, असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. संभाजीराजांना स्वराज्यापासून व पित्यापासून तोडण्याचे मोठे कारस्थान त्या काळात रचले गेले. त्या कारस्थानाचे सूत्रधार अण्णाजी पंत होते व त्याच अण्णाजी पंतांचे वारसदार आज महाराष्ट्रविरोधी कारस्थानात सामील आहेत. संभाजीराजांना स्वराज्य व धर्मरक्षणासाठी शेवटी हौतात्म्य पत्करावे लागले. त्यांनी यातना सहन केल्या, मरण पत्करले; पण मोगलांशी तडजोड केली नाही. त्यामुळे स्वराज्य व धर्मरक्षणासाठी संभाजीराजांनी केलेला त्याग व शौर्याचे वर्णन करावयास शब्द नाहीत. हा शौर्याचा व धर्मरक्षणाचा वारसा संभाजीराजांनी आपल्या राजश्री आबासाहेबांकडून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांकडून घेतला. दि. 6 जानेवारी 1681 रोजी छत्रपती संभाजी महाराजांनी गोपाळ भट अग्निहोत्री महाबळेश्वरकर यांच्या पुत्रास लिहिलेल्या पत्रात एक अतिशय समर्पक असे वाक्य आले आहे. संभाजीराजे म्हणतात, ”राजश्री आबासाहेबांचे जे संकल्पित आहे ते चालवावे हे आम्हांस अगत्य.” याचा अर्थ सरळ स्पष्ट आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या राजकीय, आर्थिक, धार्मिक धोरणांवर छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा कोरलेला आढळतो. त्याच स्वराज्य रक्षणासाठी संभाजीराजांनी इतिहासातील सगळय़ात मोठा त्याग व बलिदान केले. एखादा तपस्वी व धर्मवीरच असे बलिदान करू शकतो. त्या धर्मवीराच्या महान पित्याचा, छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे ‘अण्णाजी पंत’ आज सत्तेवर आहेत, राजभवनात ठाण मांडून बसले आहेत. त्यांना पाठीशी घालणारे अण्णाजी पंतांचे समर्थक अजित पवारांना तारतम्य बाळगण्याचा सल्ला देतात हीच खरी गंमत आहे. आधी शिवराय अपमानप्रकरणी राज्यपालांना हटवण्याची मागणी करा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे तारतम्य बाळगणार आहेत काय?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी संरक्षणमंत्री जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस यांचे निधन

News Desk

आंध्रची विधानसभा स्टॅच्यू ऑफ युनिटीला टक्कर देणार का?

News Desk

दसरा मेळाव्याच्या याचिकेवर उद्या दुपारी मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी

Aprna