ठाणे । मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ऐरोली – काटई नाका रस्ता प्रकल्पांतर्गत (Airoli-Katai Naka Road Project) पारसिक डोंगरामधील मुंब्रा ते ऐरोली बोगद्याच्या डाव्या बाजूच्या मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले असून नियंत्रित स्फोट पद्धतीचा वापर करून हा बोगदा दोन्ही बाजूने खुला करण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रकल्पातील डाव्या बाजूच्या बोगद्याच्या भुयारीकरणाचे काम आता पूर्ण झाले असून हा बोगदा दोन्ही बाजूने खुला झाला आहे. या प्रकल्पामुळे कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, नवी मुंबई व ठाणे परिसरातील नागरिकांच्या प्रवासाच्या वेळेत बचत होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, एमएमआरडीचे महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांच्यासह अधिकारी, अभियंते उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबईतील अंतर कमी करणाऱ्या ऐरोली ते काटई भुयारी मार्गातील डाव्या बाजूकडील बोगदा दोन्ही बाजूकडून जोडण्यात आला आहे. या ऐरोली – काटई प्रकल्पामुळे कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, ऐरोली, नवी मुंबई, ठाणे, मुंबई परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. या रस्त्यामुळे सात किमी अंतर कमी होणार असून नवी मुंबई येथून डोंबिवली, कल्याण,अंबरनाथ, बदलापूर येथे जाणाऱ्या प्रवाशांच्या वेळेत कमालीची बचत होणार असून इंधनाचीही बचत होणार आहे. प्रवासाचा वेळ वाचल्यामुळे नागरिकांच्या कार्यक्षमतेतही वाढ होईल
राज्य शासनाच्या वतीने अनेक पायाभूत सुविधांचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. शिळफाटा ते कल्याण व कल्याण ते भिवंडी असा थेट एलिव्हेटेड उड्डाणपूल करणार आहोत. तसेच कल्याण ते तळोजा मेट्रो असा दुमजली रस्ता व मेट्रो असलेला मार्गाचे नियोजन आहे. याशिवाय मानकोली -डोंबिवली या खाडी पुलाच्या कामामुळे अंतर कमी होईल. ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी चेंबूर फ्री वे जेथे उतरतो त्या ठिकाणाहून थेट फाऊंटनपर्यंत शहराच्या बाहेरुन बायपास करतोय. ज्या ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते अशा ठिकाणी असे अनेक प्रकल्प राबवित आहोत. मुंबई व मुंबई महानगर परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून क्रॉसिंग असलेल्या ठिकाणी डबलडेकर टनेल ही संकल्पना राबविणार आहोत. जेणेकरून मुंबई आणि एमएमआरमधल्या लाखो प्रवाशांची वाहतूक कोंडीमधून सुटका होईल व त्यांचे जीवन सुसह्य होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
असा आहे प्रकल्प
ऐरोली काटई नाका प्रकल्प हा तीन भागात विभागाला गेला असून भाग-१ अंतर्गत चा रस्ता हा ठाणे बेलापूर रोड ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ आहे. सदर भागाची लांबी ३.४ कि.मी. इतकी असून त्यामध्ये १.६९ कि.मी. लांबीचा दुहेरी बोगदा व उर्वरित रस्ता व उन्नत मार्ग आहे. सदर प्रकल्पात असलेला बोगदा हा चार ४+४ मार्गिकेचा आहे.( त्यामध्ये १+१ रेफ्युजी मार्गिका आहे.)
सदर बोगद्यांचे भुयारीकरणाचे काम हे New Austrian Tunneling Method (NATM) कंट्रोलिंग ब्लास्टिंग या तंत्रज्ञान पद्धतीने करण्यात येत आहे. सद्यस्थितीत बोगद्याचे ६७ टक्के काम पूर्ण झाले असून प्रकल्पाची उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत.
सद्यःस्थितीत प्रवाशांना महापे किंवा ठाणे येथून मार्ग काढून जावे लागत आहे. या प्रकल्पामुळे कल्याण- डोंबिवली आणि नवी मुंबई मधील अंतर ७ कि.मी. ने कमी होईल. त्यामुळे वेळेची आणि इंधनाची बचत होईल. सदर प्रकल्पामुळे कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
एमएमआरडीचे महानगर आयुक्त श्रीनिवास म्हणाले की, “पारसिक टेकड्यामधील भुयारीकरणाचे काम हे खूप अवघड आहे. आज डाव्या बाजूच्या बोगद्यात शेवटचा ब्लास्ट करून तो दोन्ही बाजूंनी खुला झाला आहे. ह्या बोगद्याच्या दुसऱ्या बाजूच्या भुयारीकरणाचे काम देखील लवकरच पूर्ण होईल. दोन्ही बाजूंचे काम पूर्ण झाल्यावर प्रकल्पातील महत्त्वाचा आणि अवघड टप्पा पार होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर शिळफाटा रस्त्यावरील अवजड वाहतूक कमी होईल आणि काटई नाका ते ऐरोली दरम्यानच्या प्रवासात ३० मिनिटांनी कमी होईल. ज्याचा फायदा मुंबईहून कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना होईल.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.