HW News Marathi
महाराष्ट्र

पश्चिम वाहिनी नद्यांचे वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात वळविण्याचे काम यावर्षी सुरु करण्यासाठी प्रयत्नशील! – उपमुख्यमंत्री

लातूर । कृष्णा खोऱ्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून मराठवाड्यात (Marathwada) आणले जाणार आहे. यासाठीच्या तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून २०२३ मध्येच या कामाला सुरुवात करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांनी सांगितले. निलंगा (जि. लातूर) येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री कर्मवीर डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मारकाच्या अनावरणप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते स्मारकाचे अनावरण झाले. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री तथा आमदार जयंत पाटील, माजी मंत्री तथा आमदार यशोमती ठाकूर, श्रीमती सुशीलाबाई शिवाजीराव पाटील निलंगेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच खासदार सुधाकर शृंगारे, आमदार रमेश कराड, आमदार विक्रम काळे, आमदार संजय बनसोडे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी खासदार रूपाताई निलंगेकर, जिल्हाधिकरी पृथ्वीराज बी. पी. यांच्यासह माजी खासदार, माजी आमदार उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी सतत समाजाच्या भल्याचा विचार केला. मराठवाड्याच्या विकासासाठी ते आग्रही होते. जिल्ह्यातील लोअर तेरणा, मांजरा प्रकल्पासह राज्यात अनेक सिंचन प्रकल्प आकारास येण्यामध्ये त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. औरंगाबाद येथे उच्च न्यायालायचे खंडपीठ होण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत यशस्वी लढा दिला. त्यामुळे आज मराठवाड्यातील लोकांना जलद न्याय मिळण्यास मदत होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करताना डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी योजना आखल्या. चाळीस कलमी कार्यक्रम राबवून मराठवाडा, विदर्भ आणि कोकणच्या विकासाला गती दिली. यासारखे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेवून राज्याच्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. मराठवाड्याचा विकास हे त्यांचे स्वप्न होते. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मराठवड्यात सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांमधून समुद्राला वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात आणले जाणार आहे. त्याशिवाय मराठवाड्याचा दुष्काळ दूर होणार नाही आणि पर्यायाने महाराष्ट्राचा विकास पूर्ण होणार नाही. त्यामुळे डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे मराठवाड्याच्या विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली

लातूर येथे रेल्वे बोगी निर्मितीचा कारखाना मंजूर झाल्यानंतर डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी आनंद व्यक्त केला होता. या बोगी निर्मिती कारखान्यात लवकरच ‘वंदे भारत’रेल्वेच्या बोगींची र्निमिती सुरु होणार असल्याचे उपमुख्यमंत्री  फडणवीस यांनी सांगितले. सध्या मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष सुरु असून डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनीही या लढ्यात सहभाग घेतला होता. या अनुषंगाने त्यांच्या जीवनातील एक प्रसंग उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितला.

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी आपल्या मनोगतात डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासोबत काम करताना घडलेल्या प्रसंगांना उजाळा दिला. कोणताही भेदभाव न करता सर्व समाज घटकांच्या विकासासाठी डॉ. शिवाजीराव पाटील – निलंगेकर यांनी प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांच्यापासून सर्वांनी प्रेरणा घेवून समाजाच्या, देशाच्या विकासासाठी काम करावे, असे आवाहन केले.

डॉ. शिवाजीराव पाटील – निलंगेकर यांनी राज्यातील कष्टकरी जनतेच्या हिताची कामे केली. त्यांच्या विकासासाठी भरीव योगदान दिले. त्यांच्या स्मारकामुळे समाजातील सर्व घटकांसाठी काम करण्याची प्रेरणा पुढील पिढीला मिळेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला.

समाज हिताचे कोणतेही काम करताना डॉ. शिवाजीराव पाटील – निलंगेकर यांच्याकडे विचार स्पष्टता होती. त्यांच्या कार्यकाळात मांजरा, तेरणा खोऱ्यात अनेक विकासकामे झाली, असे माजी मंत्री तथा आमदार जयंत पाटील यांनी सांगितले. तसेच त्यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला.

विविध पदांची जबाबदारी पार पडताना डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी प्रयत्न केले. त्या पदांमुळे मिळालेल्या अधिकारांचा वापर लोकांच्या हितासाठी केला. त्यांच्या काळात मराठवाड्याच्या विकासाला गती मिळाली, असे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी सांगितले. तसेच त्यांचे नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त केला.

डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी आपल्या कार्यकाळात हजारो लोकांची घरे उभी केली. त्यांच्या विषयीचा जिव्हाळा आजही अनुभवायला मिळतो. उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ ते विधानभवनाच्या इमारतीच्या उभारणीसह अनेक विकासकामांमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. मराठवाड्याच्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात आणणे आवश्यक असल्याचे माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले. तसेच डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्याविषयीच्या विविध आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच डॉ. शिवाजीराव पाटील – निलंगेकर स्मारक अनावरणनिमित्त केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांचा संदेश यावेळी चित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात आला.

महाराष्ट्र शिक्षण समितीच्या वतीने विजय पाटील निलंगेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. तसेच यावेळी चित्रफितीच्या माध्यमातून डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा जीवनपट मांडण्यात आला. अशोकराव पाटील-निलंगेकर यांनी प्रास्ताविक केले. शैलेश गोजमगुंडे यांनी सूत्रसंचालन केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“जेव्हा ठाकरे-मोदी भेटतात, तेव्हा चर्चा तर होणारच”, संजय राऊतांची सूचक प्रतिक्रिया!

News Desk

“शाळा सुरु झाल्यानंतरही शालेय साहित्य उपलब्ध होऊ शकले नाही,” नितेश राणेंचे पालिका आयुक्तांना पत्र

News Desk

महाराष्ट्रातील अस्थिरता संपविण्यासाठी ‘नीळकंठ’ व्हायला आम्ही तयार !

News Desk