मुंबई। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना राज्याच्या मंत्रिमंडळातून काढलेलं दिसतंय, ते रोज मागणी करत असतात त्यांच्याकडे सत्ता आहे. त्यांनी हवं ते करावं असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. नवाब मलिकांनी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली होती. तसेच एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही आरोप केला होता. मलिकांनी सगळ्यांवर आरोप कऱण्याची सुरुवात केली असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
तुमच्याकडे सगळी सत्ता आहे
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिकांवर टोला लगावला आहे. पाटील म्हणाले, नवाब मलिकांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे वाटतं तुम्ही जर मंत्रीमंडळात मंत्री आहात तर तुम्ही पत्रकार परिषदच्या माध्यमातून का मागणी करत आहात. संगळं सरकार तुमचे आहे. एक गृहमंत्री जरी जेलमध्ये गेले तर दुसरे गृहमंत्री आजारी होते ते आता बरे झाले आहेत. तुमच्याकडे सगळी सत्ता आहे. एसआयटी गठीत करा नाहीतर डबल एसआयटी गठीत करा असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.तसेच रोज उठून ट्विट करा आणि प्रेस घ्या म्हणजे त्यांना मंत्रिमंडळातून काढलेलं दिसत आहे. मंत्रिमंडळातून काढलेल्या माणसानेच मागणी करायची असते. शाहरुखच्या मुलाला अटक केल्यानंतर नवाब मलिकांनी आरोप करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील वातावरण खराब झालं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
या सगळ्याची सुरुवात मलिकांनी केली
यंत्रणांना त्यांच्याप्रमाणे काम करु द्या त्यामध्ये बोलण्याची गरज नाही. या सगळ्याची सुरुवात अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. शाहरुख खान म्हणजे कोणी मोठा व्यक्ती नव्हे त्यामुळे त्याच्या मुलाला पकडल्यानंतर आक्रमकपणे पक्ष म्हणून उतरावं, उतरायचे होते तर तेवढ्यापुरती बोलायचे, तुम्ही फडणवीसांबद्दल बोललात म्हणून आम्हाला बोलावं लागले असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.आमच्या काळात एसटी संपावर जाण्याची वेळ आली नाही, भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले की, ५ वर्षे आम्ही सत्तेत असताना कधीही एसटी कर्मचाऱ्यांना संपावर जाण्याची वेळ आली नाही. तोटा आताच नाही आहे. नियमच असा आहे की, पीएमपीएलला तूट आली तर ती महानगरपालिकेनं द्यायची असते. तसेच तत्कालीन फडणवीस सरकारमध्ये दिवाकर रावते हे खमके मंत्री होते. ते फडणवीसांच्या मानेवर बसून सरकारमधून लगेच तूट घ्यायचे त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना अडचण आली नव्हती असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
तुम्ही लोकांना मारायचे ठरवलं आहे का?
राज्य सरकारच्या आर्थिक परिस्थितीवरुन चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. आता जर तुमच्याकडे पैसे नाहीत तर कर्ज काढा केंद्र सरकारने जी २५ टक्के कर्ज काढण्याची परवानगी दिली आहे. ती २० टक्के केली आहे. तुम्ही सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला कर्ज काढणार, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कर्ज काढणार नाही. एसटी कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी कर्ज काढणार नाही. मग तुम्ही काय लोकांना मारायचे ठरवलं आहे का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.