नांदेड | नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत २१ पैकी १७ जागा जिंकत महाविकासआघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर महाविकासआघाडीच्या समर्थ सहकार पॅनलचे सर्व नेते, कार्यकर्ते व उमेदवारांचे पालकमंत्री अशेक चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.आज झालेल्या मतमोजणीत महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने १२, राष्ट्रवादी काँग्रेसने ४ तर शिवसेनेने १ जागा जिंकून विरोधकांवर एकतर्फी मात केली आहे.
समर्थ सहकार पॅनलला विजयी करणाऱ्या जिल्हा बॅंकेच्या सर्व सभासदांचेही अशोक चव्हाणांनी आभार मानले . जिल्हा बॅंकेच्या मतदारांनी महाविकास आघाडीवर मोठा विश्वास दाखवला आहे. त्यांचा हा विश्वास सार्थ ठरवून शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांच्या या बॅंकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व संचालक प्रामाणिक प्रयत्न करतील, याची खात्री असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जिल्हा बॅंकेची परिस्थिती आज काय आहे, ते लपून राहिलेले नाही. मागील काही वर्षात एकाधिकारशाहीमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेल्या या संस्थेची वाताहत झाली आहे. ही बॅंक वाचवण्यासाठी मी राज्य सरकारच्या माध्यमातून १०० कोटी रूपयांचे अनुदानही मिळवून दिले. पण बॅंकेला चांगल्या परिस्थितीत आणण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज असून, महाविकास आघाडीच्या समर्थ सहकार पॅनलचे नवनिर्वाचित संचालक त्या दिशेने पराकाष्ठा करतील, याचा विश्वास असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.
सोबतच सर्व उमेदवार व या विजयाच्या शिलेदारांना अशोक चव्हाण यांनी विनंती केली आहे की, सध्याची कोरोनाची परिस्थिती व ज्येष्ठ नेते गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांचे झालेले निधन लक्षात घेता कोणताही जल्लोष करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.
अशोक चव्हाणांची सरशी..
एकंदरित जिल्हा बॅंकेवर पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणजेच काॅग्रेसचे वर्चस्व राहणार असे दिसते. गेल्यावेळी भाजपने काॅंग्रेसला एकाकी पाडत जिल्हा बॅंकेची सत्ता मिळवली होती. परंतु राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असतांना अशोक चव्हाण यांनी जिल्हा बॅंकेत परिवर्तन घडवल्याचे निकालांवरून स्पष्ट होत आहे. जिल्हा बॅकेत महाविकास आघाडीने आतापर्यंत सर्वाधिक जागा मिळवत भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना दणका दिल्याचे दिसून आले आहे.
माजी मंत्री पराभूत …
माजी मंत्री गंगाधर कुंटूरकर यांचा नायगांव सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून पराभव झाला आहे. कुटुंरकर यांंचेे कालच निधन झाले. आज मतमोजणीत त्यांचा माजी आमदार वसंत चव्हाण यांनी २८ विरुद्ध २२ मतांनी पराभव केल्याचे समोर आले .
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.