HW News Marathi
महाराष्ट्र

“…तर उद्या माझी पुन्हा ब्रेकिंग न्युज होईल!”, अजित पवारांचा पत्रकारांना मिश्किल टोमणा

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनोख्या शैलीतील प्रत्युत्तर सगळ्यांनाच गार करुन टाकते, शिवाय त्यांचा स्पष्टवक्तेपणा सर्वांनाच माहित आहे. अनेकदा जाहीरपणे देखील अजि पवार मनातलं थेट बोलून मोकळे होतात. काही वेळा त्यांची अशी वक्तव्य त्यांच्यावरच शेकतात. मात्र, तरी त्यांच्या स्पष्टवक्तेपणामध्ये अजिबात फरक पडलेला नाही. माध्यम प्रतिनिधींसोबत अनेकदा अजित पवार अशाच प्रकारे कधी थेट तर कधी विनोदी शैलीमध्ये मनात आहे ते बोलत असल्याचा अनेकांना अनुभव आहे. आजही (२७ एप्रिल) विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना याची प्रचिती आली आहे.

राज्यात सध्या १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण करण्याच्या मुद्द्याची चर्चा सुरू आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. या सगळ्या विषयावर आदित्य ठाकरे यांनी आधी ट्विट केलं मग ते डिलिट केलं. तर दुसरीकडे राष्ट्र्वादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्य सरकार मोफत लस देणार असल्याचे जाहीर केले. या सगळ्यावर अजित पवार यांनी आज भाष्य केले आहे.

महाविकासआघाडीचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्रीच घेऊ शकतात

याच मुद्द्यावरून जेव्हा अजित पवारांना मंगळवारी विचारणा केली गेली, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे “मोफत लसीकरणाविषयी अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील”, असं सांगितलं. “ज्या निर्णयामुळे राज्यावर आर्थिक भार पडू शकतो, त्यावर निर्णय महाविकासआघाडीचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्रीच घेऊ शकतात. बाकीच्यांनी त्यामध्ये समंजस भूमिका घ्यायला हवी. अशी वक्तव्य इतरांनी टाळलेलं चांगलं”, असं म्हणत अजित पवारांनी मोफत लसीकरणाविषयी वक्तव्य करणाऱ्यांना अप्रत्यक्षपणे समजच दिल्याचं बोललं जात आहे.

तर उद्या पुन्हा माझी ब्रेकिंग न्यूज होईल

दरम्यान, उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोफत लसीकरणावर चर्चा होणार असून तेव्हाच निर्णय होईल, असं अजित पवारांनी सांगितल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पुन्हा खोदून खोदून काय निर्णय होऊ शकतो, असं विचारलं असता अजित पवारांनी त्यावरून प्रतिनिधींना चांगलाच टोला हाणला. “आत्ता मी काही बोललो आणि उद्या तिकडे मंत्रिमंडळ बैठकीत सगळ्यांच्या चर्चेत काही वेगळा प्रस्ताव मंजूर झाला तर उद्या पुन्हा माझी ब्रेकिंग न्यूज होईल. बघा अजित पवार हे म्हणाले होते आणि मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे. त्यापेक्षा उद्या काय तो निर्णय होईल. २४ तास प्रतीक्षा करा”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उदयनराजे म्हणाले, “काय बाई सांगू?”; शिवेंद्रराजेंनी विचारलं, “तुम्हाला लाज…”

News Desk

पवारांना पंतप्रधान तर अजितदादांना मुख्यमंत्री करायचंय, त्यांना पुण्यात गुंतवून ठेवू नका, – अमोल कोल्हे

News Desk

‘आयत्या बिळावर नागोबा’सारखे जाऊन बसलेल्या चंद्रकांत पाटलांनी शरद पवारसाहेबांची मापं काढणे बंद करावे – जयंत पाटील

News Desk