HW News Marathi
Covid-19

रेमडेसिविरच्या नावे दिले पॅरासिटामॉलचे पाणी, बारामतीत ३५ हजारांना बनावट इंजेक्शनची विक्री

बारामती | एकीकडे कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे तर दुसरीकडे आरोग्य सेवा अपुऱ्या पडत आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर रेमडिसिविरचा पुरवठा महाराष्ट्राला थांबवल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे बारामतीत रेमडेसिविरच्या नावे पॅरासिटामॉलचे पाणी असलेले इंजेक्शन दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

रेमडिसिविरचा काळाबाजार सुरु असताना दुसरीकडे या इंजेक्शनच्या रिकाम्या बाटलीत पॅरासिटामॉल औषधाचे लिक्विड भरून ते रेमडिसीवीर इंजेक्शन म्हणून विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यातल्या बारामतीत उघडकीस आला. विशेष म्हणजे हे बनावट रेमडिसीवीर इंजेक्शन ३५ हजार रुपयांना विकले जात असल्याची माहिती समोर आली आहे. बारामती तालुका पोलिसांच्या सतर्कतेमुळे बनावट रेमडेसिवीर विकणारी टोळी गजाआड झाली आहे.

याप्रकरणी दिलीप गायकवाड, संदीप गायकवाड, शंकर भिसे आणि प्रशांत घरत या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.बारामतीतील एका रुग्णाच्या नातेवाईकाला रेमडेसिवीरची तातडीची गरज असल्याने त्याने या टोळीतील एका सदस्याशी संपर्क साधला होता. तो एका कोविड सेंटरमध्ये काम करतो. त्याच्याकडे इंजेक्शन असल्याची माहिती गरजूला मिळाली होती.

त्यानुसार इंजेक्शन देणा-याने त्याला शहरातील फलटण चौकात येण्यास सांगितले. एका इंजेक्शनचे ३५ हजार असे दोन इंजेक्शनचे ७० हजार द्यावे लागतील, अशी मागणी केली होती. पोलिसांना ही घटना समजल्यानंतर त्यांनी सापळा रचून या टोळीतील प्रशांत घरत, शंकर पिसे, दिलीप गायकवाड, संदीप गायकवाड यांच्यासह फॉर्च्यूनर गाडी ताब्यात घेतली आहे.

या चौघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून धक्कादायक माहिती मिळाली. राज्यात रेमडिसीवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ सुरू आहे. काही ठिकाणी काळाबाजार सुरू आहे. मात्र तरीदेखील इंजेक्शन मिळत नाहीत.

याच संधीचा फायदा घेत या टोळीने बनावट रेमडिसीवीर तयार करण्याची योजना आखली. त्यानुसार कोविड सेंटरमधील रिकाम्या झालेल्या रेमडेसिवीरच्या बाटल्यांमध्ये पॅरासिटीमॉल पाण्यामध्ये मिसळून त्याचे लिक्विड बाटलीत भरुन ते बंद केले जात होते.

हे बनावट औषध तयार करून ते विकले जात होते. रुग्णांच्या जीवाशी त्यातून खेळ केला जात होता. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाकडून तक्रार घेत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली आहे.

बारामतीत रेमेडिसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचे समोर आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत घेतलेल्या जिल्हाधिकाऱ्यांचे घेतलेल्या आढावा बैठकीत देखील पोलिसांना अशा काळाबाजार रोखण्यास सूचना केल्या होत्या. त्यानंतरच असा धक्कादायक प्रकार समोर आल्याने बारामतीत नेमकं काय सुरु आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चिंताजनक ! राज्यात आज १०,५७६ रुग्ण आढळले, तर ५५५२ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

News Desk

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे वेळापत्रक ४५ दिवस आधी जाहीर होणार | अमित देशमुख

News Desk

चित्रपट क्षेत्रातील कलाकारांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे, मुख्यमंत्र्यांनी दिला विश्वास

News Desk