HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोना संकटातही गलिच्छ राजकारण करणाऱ्या भाजपाने महाराष्ट्राची माफी मागावी!

मुंबई | देशात सध्या कोरोनाने थैमान घातलेले असताना कालपर्यंत गायब असलेले देशाच्या इतिहासातील सर्वात अकार्यक्षम केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी अतीसक्रिय होत अत्यंत हीन पातळीवर जाऊन असंवेदनशील आणि अशोभनीय भाषेचा वापर करत महाराष्ट्रातील १३ कोटी मराठी माणसांचा अपमान केला आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी आपल्या वक्तव्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

मुंबई येथे पत्रकार परिषदेत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन व भाजपाचा समाचार घेताना नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना जनाची तर नाही मनाची थोडीफार शिल्लक असेल तर केंद्राचा कैवार घेऊन महाराष्ट्रावर खोटेनाटे आरोप करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा नतद्रष्टपणा आणि महाराष्ट्रद्रोह करण्यापेक्षा झोपलेल्या केंद्र सरकारला जागे करून महाराष्ट्रासाठी आवश्यक कोरोना लस, रेमडेसीवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजन व इतर अत्यावश्यक औषधांचा पुरेसा पुरवठा करण्यास सांगावे.

एका वर्षापूर्वी केंद्र सरकारने कोरोनाला राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर केले. आपत्ती निवारण कायदा २००५ नुसार आपत्ती जाहीर करणे याचा अर्थ त्या आपत्ती निवारणाची सर्वप्रकारची जबाबदारी आणि बांधिलकी स्वीकारणे आहे. त्यामुळे या आपत्तीची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारची आहे पण दुर्देवाने केंद्र सरकार आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे जबाबदारीपासून पळ काढत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन असंवेदनशील आणि अश्लाघ्य पद्धतीने बेजबाबदारपणे आरोप करत आहेत.

कोरोनाच्या दुस-या लाटेचा अंदाज घेऊन केंद्र सरकार आणि केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी नियोजन करणे ही राष्ट्रीय आपदा व्यवस्थापन कायदा २००५ नुसार जबाबदारी होती परंतु तिचे पालन न करता देशातील नागरिकांच्या जीविताचा विचार न करता केंद्र सरकारने देशातील केवळ ८ कोटी नागरिकांना लस दिली असून पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्रासहित इतर देशांना मोठ्या प्रमाणात मोफत लस पाठवली आहे. लसीचा पुरवठा, लसींची उपलब्धता, रेमडेसीवर व ऑक्सीजनचा पुरवठा याबाबतीत वस्तुनिष्ठ निर्णय़ घेण्याऐवजी केंद्र सरकार आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे खोटे आरोप करून देशाची दिशाभूल करत आहे, असे पटोले म्हणाले.

मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्राचा घोर अपमान केला आहे. केंद्र सरकारची जबाबदारी असताना महाराष्ट्राला लसींचा कमी पुरवठा करून राज्याच्या अडचणी वाढवल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती ओढवलेली असताना केंद्र सरकारने या वर्षी काहीही मदत केलेली नाही. केंद्र सरकार महाराष्ट्रावर अन्याय करत आहे. केंद्र सरकारने दिलेले व्हेंटिलिटरही उपयोगाचे नाहीत.

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख म्हणाले की, कोरोना लसींचा पुरवठा करण्यात केंद्र सरकारचे नियोजन नाही. लोकसंख्येच्या प्रमाणात लसींचा पुरवठा गरजेचा असताना त्याप्रमाणात पुरवठा केला जात नाही. सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात असताना त्याप्रमाणात लस उपलब्ध होऊ शकत नाहीत हे केंद्र सरकारचे अपयश आहे, असे काँग्रेस अमित देशमुख म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

MPSC विद्यार्थ्यांसाठी आंदोलनाचा सदाभाऊ खोत यांचा इशारा!

News Desk

राजकारणाची खाज शमली असेल तर देशापुढील गंभीर समस्यांकडे वळायला हरकत नाही

News Desk

आमच्यासाठी अजित पवार हेच मुख्यमंत्री !

News Desk