HW News Marathi
देश / विदेश

अस्तित्व मिटवण्याचे अनेक प्रयत्न झाले, मात्र राम आजही आपल्या मनात आहेत – पंतप्रधान

अयोध्या | गेकिर अनेक दशके ज्या ऐतिहासिक सोहळ्याकडे देशवासियांचे डोळे लागले होते, तो अयोध्या नगरीतील राम मंदिर भूमिपूजन सोहळा आज (५ ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत संपन्न झाला. राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी मुख्य मंचावर पंतप्रधान मोदींसह केवळ ५ जणांना स्थान देण्यात आले होते. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि महंत नृत्यगोपालदास महाराज यांचा यात समावेश होता.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी ?

“विश्वासच बसत नसेल की आपण जीवंतपणीच हा क्षण पाहिला. रामजन्मभूमी आज मुक्त झाली आहे. आपल्या स्वातंत्र्य संग्रामाच्यावेळी आपले सर्वस्व अर्पण केले होते. गुलामगिरीच्या काळात स्वातंत्र्यासाठी आंदोलन झाले नाही असे एकही ठिकाण नव्हते.. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन त्या लाखो बलिदानांचे प्रतिक आहे. त्याचप्रमाणे राम मंदिरासाठी अनेक शतके, अनेक पीढ्यांनी अविरत, एकनिष्ठ प्रयत्न केले. आजचा दिवस त्या संकल्पाचेच एक प्रतिक आहे”.

“राम मंदिरासाठी सुरु असलेल्या आंदोलनात संघर्षही होता आणि संकल्पही होता. या आंदोलनात सहभागी झालेल्या १३० कोटी भारतीयांच्यावतीने मी नमन करतो. यात सहभागी झालेला प्रत्येक व्यक्ती हा सोहळा पाहत आहे. राम आपल्या मनात एकरुप झाले आहेत. कोणतंही काम करायचं असेल तर प्रेरणेसाठी आपण भगवान रामाकडेच पाहतो. इमारती नष्ट झाल्या,अस्तित्व मिटवण्याचे अनेक प्रयत्न झाले. मात्र, राम आजही आपल्या मनात आहेत. श्रीराम भारताची मर्यादा आहेत, मर्यादा पुरुषोत्तम आहेत”.

“हनुमानजींच्या आशिर्वादाने राम मंदिराच्या भूमिपूजनाला सुरुवात झाली आहे. हे मंदिर आपलं आधुनिक प्रतिक बनले. शाश्वत आस्थेचं, राष्ट्रीय भावनेचं प्रतिक बनेल. हे मंदिर येणाऱ्या पिढ्यांना आस्था, श्रद्धा आणि संकल्पाची प्रेरणा देईल. या मंदिरामुळे अयोध्येची प्रतिमाच नाही बदलणार, तर येथील अर्थशास्त्रही बदलेल. प्रत्येक क्षेत्रात नव्या संधी तयार होतील. पूर्ण जगातील लोक प्रभू राम आणि माता जानकीचं दर्शन करायला येतील”.

“कोरोनामुळे तयार झालेल्या परिस्थितीमुळे भूमिपूजनाचा हा कार्यक्रमाला अनेक मर्यादा आल्या आहेत. श्रीरामांच्या कामात जी मर्यादा दाखवली पाहिजे तिच मर्यादा आज आपण दाखवून दिली. अशीच मर्यादा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर दाखवली होती. तेव्हा देखील देशाने सर्वांच्या भावनांचा आदर करत मर्यादा दाखवली होती. या मंदिरासोबत नवा इतिहासच रचला जात नाही, तर इतिहासाची पुनरावृत्ती देखील होत आहे”.

“ज्या पद्धतीने मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे माध्यम झाले, दलित, वंचित अशा समाजातील प्रत्येक घटकांनी गांधींना सहयोग दिला, तसाच आज देशातील प्रत्येकाच्या सहकार्याने राम मंदिराच्या निर्माणाचं काम सुरु झालं आहे. जसा रामसेतू तयार झाला, तसाच गावागावातून आलेल्या विटा, माती, नद्याचं पाणी येथे प्रेरणा देत आहे. ही अमोघ शक्ती आहे. हे न भुतो न भविष्यती आहे”.

“भारताच्या श्रद्धेची ही शक्ती संपूर्ण जगासाठी अभ्यासाचा विषय आहे. सत्यावर अढळ राहणे हेच श्रीरामांच्या चरित्राचा केंद्रबिंदू आहे. म्हणूनच हजारो वर्षांपासून श्रीराम आपल्यासाठी आशेचा केंद्र आहे. तुलसीचे राम सगुण राम, तर नानक यांचे निर्गुण राम आहेत. भगवान बुद्ध यांचाही रामांशी संबंध आहे. राम सर्वठिकाणी आहेत, राम सर्वांचे आहेत. राम भारताच्या अनेकतेत एकतेचं प्रतिक आहेत. जगातील अनेक देश रामाचं नाव घेतात. ते देश श्रीरामांशी स्वतःला जोडून घेतात. जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियात आजही राम पुजनीय आहेत”.

“इराण आणि चीनमध्ये देखील रामाचे प्रसंग किंवा राम कथांचं वर्णन मिळेल. श्रीलंकेत जानकीहरण म्हणून रामायण सांगितलं जातं. अशाचप्रकारे जगातील कितीतरी देश आहेत. जेथे राम कोणत्या ना कोणत्या रुपात अस्तित्वात आहेत.श्रीरामांच्या नावाप्रमाणेच हे मंदिर अनंत काळापर्यंत संपूर्ण मानवतेला प्रेरणा देईल. त्यामुळे भगवान रामांचा संदेश संपूर्ण जगापर्यंत पोहचेल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत”.

“शास्त्रात म्हटलं आहे की पूर्ण पृथ्वीवर श्रीरामांइतका नितीमान शासक कधीही झालेला नाही. कुणीही दुखी होऊ नये, गरिब असू नये. नर नारी सर्व समानपणे सुखी होवो, भेदभाव नको, असा श्रीरामांचा संदेश आहे.आपली मातृभूमी स्वर्गाहून अधिक महत्त्वाची असते हाच श्रीरामांचा संदेश आहे. आपला देश जितका शक्तिशाली होईल, तितकी शांती तयार होईल. रामाची हीच नीती आपलं मार्गदर्शन करत राहिलं. भगवान रामांचं हे मंदिर युगानुयुगे मानवतेला प्रेरणा देईल, मार्गदर्शन करेल. कोरोनामुळे जी स्थिती तयार झाली, त्यात रामांच्या मर्यादांची अधिक गरज आहे. आता ‘दो गज की दुरी, मास्क हे जरुरी’ ही मर्यादा आवश्यक आहे”.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रमोद सावंत दुसऱ्यांदा होणार गोव्याचे मुख्यमंत्री, नावावर शिक्कामोर्तब

Aprna

वासराशी महिलेचा विवाह

News Desk

जम्मूमधील बस स्टँडवर ग्रेनेड हल्ला

News Desk