HW News Marathi
Covid-19

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागातील दौऱ्यानंतर फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, केल्या ‘या’ मागण्या

मुंबई | राज्यात कोरोनाच्या संकटाचा कोणत्या भागात काय परिणाम झाला आहे, याची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस काही भागांचा दौरा करत होते. या दौऱ्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. कोरोना काळात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांच्या दौऱ्यानंतर आढळलेली वस्तूस्थिती आणि त्यावरील उपाययोजनांबाबतचे हे पत्र आहे. आम्ही शक्य ती सर्व मदत तुम्हाला करतो आहे. मात्र आता परिस्थिती गंभीर होत चालली आहे. या कठीण काळात आवश्यकता वाटत असल्यास चर्चेला तयार आहोत, असेही फडणवीसांनी यात लिहिले आहे.

मुंबईतील केईएम, नायर आणि सेंट जॉर्ज रूग्णालय, पुणे आणि पिंपरी चिंचवड, सोलापूर, अमरावती आणि अकोला, नागपूर, एमएमआर क्षेत्रातील पनवेल, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मिरा भाईंदर तसेच नाशिक, मालेगाव, जळगाव आणि औरंगाबाद इत्यादी ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी दौरा केला होता.

रुग्णालयाबाहेर झालेले ६०० मृत्यू अद्याप मुंबई महापालिकेने जाहीर केलेले नाहीत. त्यासंबंधीच्या आकडेवारीची तात्काळ पडताळणी करून ती संख्या जाहीर करण्यात यावी तसेच १० जुलै २०२० रोजीच्या प्रसिद्धीपत्रकात मुंबईतील २७५ मृत्यू हे अन्य कारणांमुळे झाले, असे दर्शविण्यात आले.

पत्रातील महत्वाचे मुद्दे:

आयसीएमआरने कोणते मृत्यू कोरोनामृत्यू समजावे आणि कोणते नाही, यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिले आहेत. असे असताना ते अन्य कारणांमुळे झाले असे दाखविणे योग्य नाही. ते कोरोनाबळींच्या संख्येत दाखवण्यात यावेत, या प्रमुख मागण्या फ़डणवीसांनी पत्रातून केल्या आहेत.

संपूर्ण राज्यात रुग्णसंख्या अतिशय झपाट्याने वाढत आहे. त्याचा अंदाज लावून येणाऱ्या काळासाठी पुरेशा प्रमाणात बेड्स आणि ऑक्सिजन, व्हेंटीलेटरची सुविधा असणारे बेडस् उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. महापालिका, नगरपालिकांच्या वर्गानुसार, तेथे पुरेशा प्रमाणात व्हेंटिलेटर राज्य शासनामार्फत तातडीने उपलब्ध करुन द्यावेत.

राज्यामध्ये सर्वाधिक चाचण्या झाल्या म्हणून रुग्णसंख्या अधिक आहे, हे गृहीतकच मुळात चुकीचे आहे. कारण सर्वाधिक चाचण्यांचा दावा चुकीचा आहे. प्रति दहालाख लोकसंख्येमागे चाचण्या करण्यात महाराष्ट्र देशात नवव्या क्रमांकावर आहे. कोरोना मोठ्या प्रमाणात शिरकाव करत आहे. अशावेळी चाचण्या हाच एकमात्र उपाय आहे. अजूनही चाचण्यांवर लक्ष केंद्रीत केले नाही, तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. त्यामुळे चाचण्यांची पूर्ण क्षमता वापरावी.

कोविडचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असणार्‍या शहरातील व जिल्ह्यात सध्या उपलब्ध रुग्णवाहिका या वाढत्या रुग्णसंख्येला पुरेशा नाहीत. त्याही आवश्यकतेनुसार तत्काळ उपलब्ध करुन द्याव्यात तसेच सामाजिक संघटनांची सुद्धा मदत घेऊन रुग्णवाहिकांची संख्या तातडीने वाढविण्यात यावी.

अ‍ॅक्टमेरा, रेमडेसिवीर ही औषधे बाजारात उपलब्ध होत नाहीत. त्याचा सर्रास काळाबाजार केला जातोय. ही औषधे तत्काळ आणि सहज उपलब्ध होण्यासाठी यंत्रणा उभारण्यात यावी. राज्यभरात उभारण्यात आलेल्या विलगीकरण कक्षांमध्ये (क्वारंटाईन सेंटर) बर्‍याच ठिकाणी वेळेत पाणी, जेवण मिळत नाही. परिणामी तेथील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. ही बाब नागरिकांच्या लक्षात आल्याने आता कोणतेही नागरिक विलगीकरण कक्षात जाण्यास तयार होत नाहीत.

परिणामी रोगाचा प्रादुर्भाव जो सहज टाळता येऊ शकतो, तो टाळणे अशक्य झाले आहे. त्यामुळे अशा केंद्रांना वारंवार भेटी देऊन, तेथील व्यवस्थांचा आढावा घेत, कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. दोनवेळचे जेवण आणि चहा वेळेत मिळेल, हे सुनिश्चित करण्यात यावे.

कोविडला प्राधान्य देताना नॉन-कोविड रुग्णांकडे मोठे दुर्लक्ष होत आहे. अर्थात कोरोनाकडे लक्ष देण्याला प्राधान्य असलेच पाहिजे. पण, त्यामुळे इतर रूग्णांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांच्याही मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नॉन-कोविड रुग्णालये सुद्धा योग्यप्रमाणात उपलब्ध असतील, हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आईच्या निधनानंतर ३ दिवसातच राजेश टोपे पुन्हा राज्यासाठी कोरोना विरुद्धच्या लढाईत उतरले

News Desk

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा होम आयसोलेशनचा निर्णय सरकारने केला रद्द – राजेश टोपे

News Desk

कोरोनाबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी धार्मिक नेत्यांनी पुढे यावे !

News Desk