HW News Marathi
Covid-19

लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन अधिकाऱ्यांनी काम करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

पुणे । कोरोना विषाणूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी सर्वच आघाड्यांवर प्रयत्न केले जात असले तरी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन व त्यांच्या सहकार्याने काम करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज (२२ मे) लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत केल्या. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, तथापि, खासदार वंदना चव्हाण, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, गिरीश बापट यांनी केंद्राकडून अधिकाधिक निधी आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

 

बैठकीला उपस्थित असणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या सूचना ऐकून घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, खाजगी हॉस्पिटलचे ८० टक्के बेड ताब्यात घेण्यात येणार आहेत. आपल्या सूचनांची प्रशासन निश्चित दखल घेईल. वेळोवेळी बैठका घेतल्या जातील. आपल्या सूचना वेळोवेळी पाठवा, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या, सोशल मीडिया अधिक सक्रिय केला पाहिजे. कोरोनाच्या बाबत केल्या जाणाऱ्या उपाययोजना व प्रशासनाच्यावतीने सामान्य नागरिकांसाठी देण्यात येणाऱ्या सूचनांची रोजच्या रोज माहिती दिली जावी. जेणेकरुन लोकप्रतिनिधींना माहिती मिळेल.

खासदार सुप्रिया सुळे यांनी परराज्यात रेल्वेने लोकांना पाठविले, प्रशासनाने याबाबत उत्तम काम केले असल्याचे सांगितले.

खासदार श्रीरंग बारणे यांनी वेळोवेळी प्रशासनाने लोकप्रतिनिधींना अद्ययावत माहिती द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. ग्रामीण रुग्णालये अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे सांगितले.

खासदार गिरीश बापट म्हणाले, परराज्यातील मजूर त्यांच्या त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी अधिकाधिक रेल्वेची व्यवस्था करण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींना माहिती वेळोवेळी देण्यात येऊन पोलिस प्रशासनानेही समन्वय ठेवावा. पुणे कॅटोन्मेंटला आणखी निधी द्यावा, असे ते म्हणाले.

आमदार शरद रणपिसे यांनी कोरोनाबरोबर राहण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याची गरज आहे. प्रभागनिहाय समिती नेमा. त्यात स्थानिक लोकप्रतिनिधींना सामावून घ्या. नागरिकांची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. पावासाळ्यापूर्वीची कामे त्वरित करून घ्या, असेही त्यांनी सांगितले.

आमदार सिद्धार्थ शिरोळे, लक्ष्मण जगताप, भीमराव तापकीर, चेतन तुपे, सुनील टिंगरे, सुनील कांबळे, सुनील शेळके, महेश लांडगे, आण्णा बनसोडे आदींनी चर्चेत भाग घेऊन उपयुक्त सूचना केल्या.

विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी कोरोना विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी विविध आघाड्यांवर प्रयत्न करण्यात येत आहे. सनदी अधिकाऱ्यांवरही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. योग्य तो निधी जिल्ह्याला उपलब्ध करून दिला आहे. सर्व यंत्रणा समन्वयाने काम करीत आहेत, असे सांगितले.

जमाबंदी आयुक्त एस.चोकलिंगम यांनी ससून हॉस्पिटलबाबत माहिती देताना सांगितले, मृत्यू दर आता कमी झाला आहे. ससूनची क्षमता वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, मृत्यू दर कमी होत आहे.२१८२ लोक बरे होऊन घरी गेले आहेत. १० कोटीपेक्षा अधिक निधी विविध संस्थांनी वैद्यकीय उपकरणासाठी उपलब्ध करुन दिला आहे. वैद्यकीय तपासणीसाठी मोबाईल व्हॅन सुरू केली आहे. खासदार व आमदारांनी त्यांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. सॅम्पलींग वाढविले आहे. १६०० बेड तयार आहेत. बालेवाडीत ५०० बेडचे सेंटर कार्यान्वित केले आहे. काही हॉस्पिटलबरोबर करार केले आहेत.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, एप्रिल महिन्यात मृत्यू दर व रुग्णसंख्या अधिक होती. आता कमी होताना दिसत आहे.बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या जवळपास ५० टक्के आहे. भविष्यात परिस्थिती बिकट झाली तर त्यादृष्टीने उपाययोजना केल्या आहेत. पुण्याहून अन्य राज्यात व जिल्ह्यात कामगार, मजूर, विद्यार्थी, नागरिक यांना पाठविण्यात येत आहे. जनजागृतीचे उपक्रमही राबविण्यात येत आहेत.

पिंपरी-चिंचवडचे मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, अजूनही परिस्थिती नियंत्रणात आहे. होम क्वारंटाईनवर अधिक लक्ष देत आहे. मोठ्या प्रमाणात टेस्टींग केले आहे. वर्दळीच्या ठिकाणच्या वसाहतीत रुग्ण सापडत आहे. शहर सध्या रेड झोनमध्ये नाही. उद्योगांना परवानगी दिली आहे. मोठ्या प्रमाणात जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात येत आहे. सोशल मीडियाचाही वापर करण्यात येत आहे. सध्या ४८ कंटेन्टमेंट झोन आहे. प्रत्येक वॉर्डासाठी पथक नियुक्त केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि राधाकृष्ण विखे-पाटील कोरोना पॉझिटिव्ह

Aprna

आज १४७५ रुग्ण कोरोनामुक्त, राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला ८० हजारांचा टप्पा

News Desk

महाराष्ट्रातही तोक्ते वादळ आले मग महाराष्ट्राबाबत पंतप्रधानांचा भेदभाव का? पंतप्रधानांच्या गुजरात दौऱ्यावर राष्ट्रवादी भडकली !

News Desk