मुंबई | मराठा आरक्षणावरुन मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केल्यानंतर मराठा समाजातर्फे आज सोलापुरात (२१ सप्टेंबर) आंदोलन करण्यात आले. मराठा आरक्षण आणि आंदोलन या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण समितीचे प्रमुख आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ही बैठक पार पडली असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात मराठा आरक्षणाच्या बाबतीत महत्वाची चर्चा झाली या बैठकीत जयंत पाटीलही उपस्थित होते. “मराठा आरक्षणाबाबत काही कायदेशीर मुद्दे आहेत. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबरोबर चर्चा झाली होती. त्याची माहिती शरद पवारांना दिली,” अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाणांनी या बैठकीनंतर दिली.
“मराठा आरक्षणावरील स्थगिती उठण्यासाठी जे प्रयत्न सुरु आहेत. त्याची माहिती या बैठकीत शरद पवारांना दिली. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही याबाबत आपली मतं मांडली. सर्वोच्च न्यायालयात जायचं आहे. त्याची तयारी सुरू आहे. त्याबाबत शरद पवारांशी चर्चा केली. आपण न्यायालयात जातो आहे. घटनापीठ लवकर स्थापन व्हावं यासाठी आपण मुख्य न्यायमूर्तींकडे प्रयत्न करतो आहे,” असेही अशोक चव्हाण म्हणाले. “ दरम्यान, कोणत्या नेत्यांना आरक्षण नको आहे, असे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट करावं. वेगवेगळी विधानं टाळून यात एक वाक्यता असायला हवी,” असा टोलाही अशोक चव्हाणांनी लगावला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.