HW News Marathi
राजकारण

माझ्या शेतकऱ्यांना आणि आम्हाला डिवचलात तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही – अजित पवार

उस्मानाबादला विराट मोर्चाने सरकारवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल

उस्मानाबाद दि. १६ – माझ्या बळीराजाचे वीज कनेक्शन तोडू नका. अधिकाऱ्यांना सांगतो वीज तोडायला जावू नका तुम्हीही शेतकरी आहात. आमचा शेतकरी पैसा बुडविणारा नाही. मात्र तरीही शेतकऱ्यांना आणि आम्हांला डिवचण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा सज्जड दम विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी उस्मानाबादच्या विराट सभेमध्ये सरकारला दिला.

उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य मोर्चा नंतर ही अतिविराट सभा पार पडली. या सभेमध्ये अजित पवार यांनी सरकारला उलथवून टाकण्यासाठी मराठवाडयाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ देण्याचे आवाहन केले. शिवाय उस्मानाबादमधील जनतेला त्यांनी आवाहन करताना आपल्याला आपलं सरकार आणायचं असून याअगोदर दोन आमदार दिले होते आता तसे नको मला सर्वच आमदार दया अशी मागणी जनतेला केली. अजित पवार यांनी आपल्या तडाखेबाज भाषणामध्ये सरकारला अनेक उपमा देत कधी चिमटे काढत हल्लाबोल केला. त्यांनी आपल्या भाषणामध्ये सरकारचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत. निवडणूका आल्या की, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक तर कधी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आठवते असा आरोपही केला.

एक गाजलेले गाणं होतं ‘लबाड लांडगं ढोंग करतंय लगीन करायचं सोंग करतंय’तसं या सरकारला ‘लबाड लांडगं ढोंग करतंय जनतेला फसवण्याचे काम करतंय’अशी म्हणण्याची वेळ आली असून यांना आता खडयासारखं बाजुला करुया असे आवाहन जनतेला केले. त्यांनी आपल्या भाषणामध्ये मराठवाडयाला सापत्नभावाची, दुजाभावाची वागणूक का देत आहात याचं उत्तर सरकारने दयायला हवं. आपल्या शेजारचं लहान राज्य २४ तास वीज मोफत देत असेल तर आम्हाला ८ तास तरी वीज दया अशी मागणी करतानाच आमचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांची वीज तोडत आहे असा आरोप केला.

येणाऱ्या निवडणूकामध्ये आश्वासनांचे गाजर दाखवणाऱ्या सरकारला गाजर भेट दया आणि त्यांच्यासोबत फसव्या आश्वासनांमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेला मुळा भेट दया मग ते खात बसा नाहीतर एकमेकांना दाखवत बसा असा टोलाही अजित पवार यांनी लगावला. अजित पवार यांनी आपल्या भाषणामध्ये अनेक मुदयांना हात घालतानाच सरकारवर जोरदार आसूड ओढले.

*या सभेमध्ये विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनीही सरकारवर जोरदार हल्ला केला. देशाचा प्रमुख आणि राज्याचा प्रमुख तुझ्या दारात येवून खोटं बोलत असेल तर या दोघांची सत्ता उलथवून टाकण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दे असं साकडं आई भवानीला आम्ही घातलं असे धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितले. आज या अतिविराट सभेने आई भवानीने हा कौल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिला आहे. आई भवानीचे दर्शन घेत आणि मराठवाडयाची माती कपाळी लावून राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करत आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भाजप-सेना हे सगळे महाचोर असून सगळा महाराष्ट्र लूटुन खात असल्याचा आरोपही धनंजय मुंडे यांनी यावेळी केला.

सभेमध्ये रासपचे कोषाध्यक्ष किशोर मासाळ यांनी आपल्या पत्नीसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. शिवाय नाशिकमधील संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाले. सभेचे प्रास्ताविक आमदार राणा जगजितसिंह यांनी केले. या सभेनंतर जिल्हाधिकाऱ्यांना सरकारविरोधी निवेदन देण्यात आले.

या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,उस्मानाबादमधील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पद्मसिंह पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसेपाटील, पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार सतीश चव्हाण, अमरसिंह पंडित , विक्रम काळे , जयदेव गायकवाड, प्रकाश गजभिये, विदया चव्हाण आदींसह मराठवाडयातील सर्व आमदार, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, सर्व सेलचे प्रदेशाध्यक्ष आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पळ काढणारे चौकीदार नव्हे तर चोर असतात !

News Desk

जाणून घ्या…महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाबाबत

News Desk

विधानसभेतील शिवसेनेचे कार्यालय सील

Aprna