HW News Marathi
महाराष्ट्र

पाण्याच्या सद्यपरिस्थितीनुसार नागरिकांना पाणी पट्टीमध्ये दिलासा ! – सुभाष देसाई

औरंगाबाद। महापालिका, जिल्हा प्रशासन, पोलिस, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व इतर विभागांच्या समन्वयाने औरंगाबाद शहराला मुबलक व समाधानकारक पाणी पुरविण्यासाठी विविध घटकांवर कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. त्याचाच परिणाम म्हणून येत्या आठवडाभरात शहराला 15 द.ल.लिटर अतिरिक्त पाण्याचा पुरवठा होणार असल्याचा विश्वास उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर सद्यपरिस्थिती पाहता नागरिकांकडून पाणी पट्टी चार हजार रुपयांवरून समाधानकारक पाणी मिळेपर्यंत दोन हजार रुपये करण्याच्या सूचनाही महापालिकेला त्यांनी दिल्या.

आमखास मैदानाजवळील महापालिकेच्या स्मार्ट सिटी कार्यालयात शहराच्या पाणी पुरवठ्याचा आढावा देसाई यांनी घेतला. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अजय सिंह, महापालिकेचे सर्व उपायुक्त, शाखा प्रमुख आदींची उपस्थिती होती.

मंत्री देसाई म्हणाले, शहराच्या पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी शासनाच्या विविध यंत्रणेकडून युद्धपातळीवर 42 प्रकारची कामे सुरू आहेत. ज्यामध्ये पाण्याची गळती थांबविणे, पाइप लाइन टाकणे, स्वच्छ पाण्याचा पुरवठा आदी कामांचा समावेश आहे. ही कामे युद्धपातळीवर पूर्ण करून नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा करण्याचा यंत्रणांचा विश्वास आहे.

उपलब्ध पाण्याचे समान प्रमाणात समन्यायी पद्धतीने पाणी वाटप व्हावे, यासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलिस आयुक्त, पाणी पुरवठा विभागाचे सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आदींचा यामध्ये समावेश आहे. शहराचा पाणी समस्या सोडवणुकीसाठी जिल्हाधिकारी यांनी तत्काळ खासगी विंधन विहिर, बोअरवेल अधिग्रहित कराव्यात. त्याचबरोबर अनधिकृत पद्धतीने पाणी चालू, बंद करणाऱ्या अपप्रवृत्तींवर गुन्हा नोंदविण्याचे काम पोलिस प्रशासनाने करावे, अशा सूचनाही केल्या आहेत. शहराला मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा दैनंदिन आढावा घेण्यात येत असल्याचेही देसाई यांनी सांगितले.

सुरूवातीला मनपा आयुक्त पांडेय यांनी मनपा प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या सुरळीत व योग्य पाणी पुरवठ्याबाबत, उन्हाळी परिस्थितीत पाण्याची वाढीव मागणी लक्षात घेता करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत मंत्री देसाई यांना सविस्तर माहिती दिली. तसेच पाणी पट्टी चार हजारांवरून दोन हजार रूपये करण्याच्या पालकमंत्री देसाई यांच्या निर्णयाचे स्वागत करत तत्काळ अंमलबजावणी करणार असल्याचेही सांगितले.

Related posts

फुले दाम्पत्यांला भारतरत्न द्या | मुख्यमंत्री

swarit

ठाण्याच्या महापौरांची व्हॉटसॲपवरुन ऑक्सीजनची मागणी, मुख्यमंत्र्यानी तात्काळ केली व्यवस्था⁩

News Desk

एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

News Desk