HW News Marathi
राजकारण

जवानांचा जय व किसानांचा पराजय असे होऊ नये !

मुंबई । निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागेल. त्यामुळे सर्वत्रच उद्घाटने, मुहूर्त, घोषणांचा धूमधडाका सुरू झाला आहे. पंतप्रधान मोदी यांच्याही सभा, भाषणांचा धडाका सुरू आहे.मध्य प्रदेशात पुढील चार दिवसांत 25 लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ होईल, अशी घोषणा तेथील मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केली आहे. तिथला शेतकरीही अनंत अडचणींचा सामना करीत असला तरी त्याच्या कर्जमाफीची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रातील शेकडो कर्जबाजारी शेतकरीही अशा कर्जमाफीची वाट पाहत आहेत. राज्यातील 14 हजार 778 गावे दुष्काळग्रस्त आहेत. मराठवाड्यातील पाण्याची पातळी तळ गाठत आहे. टंचाईग्रस्त भागात चारा छावण्या नक्की सुरू झाल्या आहेत काय? जाहिरातींच्या भडिमारात चारा छावण्या कुठे हरवल्या तर नाहीत ना? याचा शोध सरकारला घ्यावा लागेल. सरकारी यंत्रणा पुढच्या चार दिवसांत निवडणूक कामाला जुंपली जाईल व शेतकऱ्यांची वेदना पुन्हा बेवारस बनेल. जवानांप्रमाणे आमचा किसानही मरत आहे. त्यांच्या आत्महत्यांचा बदला कसा घ्यायचा? जवानांचा जय व किसानांचा पराजय असे होऊ नये, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीयमधून शेतक-यांच्या कर्जमाफीवरून राज्य सरकारवर टीका केली आहे.

सामनाचे आजचे संपादकीय

सरकारी यंत्रणा पुढच्या चार दिवसांत निवडणूक कामाला जुंपली जाईल व शेतकऱ्यांची वेदना पुन्हा बेवारस बनेल. निवडणूक प्रचारात शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या नव्या घोषणा होतील. पण शेतकऱ्यांच्या मानेभोवती आवळलेला फास तसाच राहील. पुलवामात मरण पावलेल्या जवानांच्या हत्येचा बदला सरकारने घेतला व त्यामुळे सरकारचा ‘जयजयकार’ सुरू आहे. जवानांप्रमाणे आमचा किसानही मरत आहे. त्यांच्या आत्महत्यांचा बदला कसा घ्यायचा? जवानांचा जय व किसानांचा पराजय असे होऊ नये. जवान जिंकतात तेव्हा विजयाचे जुलूस निघतात, पण मरणाऱ्या शेतकऱ्यांच्या चिता म्हणजे थंडीतील उबदार शेकोटी नव्हं हे आम्ही परखडपणे सांगत आहोत!

निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागेल. त्यामुळे सर्वत्रच उद्घाटने, मुहूर्त, घोषणांचा धूमधडाका सुरू झाला आहे. पंतप्रधान मोदी यांच्याही सभा, भाषणांचा धडाका सुरू आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा कुंभमेळ्यात जाऊन गंगेत डुबकी मारून म्हणजे पुण्यस्नान करून आले. देशातील वातावरण हवाई हल्ल्याच्या धुंदीने बेहोश झाले आहे. त्यांत देशभक्ती हा विषय असला तरी देश म्हणजे फक्त जमीन नाही तर देशातील जनता. त्यामुळे देशालाही पोट असतं व पोटापाण्याचा विचार करावा लागतो. महाराष्ट्रासह देशातील शेतकऱ्यांच्या किंकाळ्या कानावर येत आहेत. हवाई हल्ल्यांची बेहोशी ठीक आहे. त्या बेहोशीत शेतकऱ्यांच्या किंकाळ्या विरून जाऊ नयेत. बीड जिल्ह्यात एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत हे वृत्त काळीज चिरणारे आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाल्याचे सरकार सांगत असते व तशा जाहिराती प्रसिद्ध होतात. मग शेतकरी मरतोय का? सरकारने संपूर्ण कर्जमाफी करावी यासाठी शिवसेना आग्रही आहे. ग्रामीण भागातील शेतकरी कर्जमाफीच्या उंच टांगलेल्या हंडीकडे आशा लावून बसला आहे. तिकडे मध्य प्रदेशात पुढील चार दिवसांत 25 लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ होईल, अशी घोषणा तेथील मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केली आहे. तिथला शेतकरीही अनंत अडचणींचा सामना करीत असला तरी त्याच्या कर्जमाफीची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रातील शेकडो कर्जबाजारी शेतकरीही अशा कर्जमाफीची वाट पाहत आहेत. त्यांची वाट आणखी बिकट होणार नाही याची काळजी राज्यकर्त्यांनी घ्यायची आहे. आताही बीड जिल्ह्यातील ज्या तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या

आत्महत्येमागची कारणे

समान आहेत. सततची नापिकी आणि डोक्यावरील कर्जाचा असह्य झालेला बोजा, यामुळेच त्या तिघांनाही स्वतःचे जीवन संपवून घेणे भाग पडले. बीडच्या केज तालुक्यातील खर्डेवाडी येथील शेतकरी महादेव रामभाऊ भोसले, वडवणी तालुक्यातील दामोदर गणपती शिंदे हे दोन शेतकरी आणि धारूर तालुक्यातील राजाभाऊ बन्सी जोगदंड हे ग्रामसेवक यांच्या आत्महत्या सरकारने गांभीर्याने घ्यायलाच हव्यात. नांदेडमध्ये दोन महिन्यांत 18 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मराठवाडा, विदर्भात 1972 पेक्षा भयंकर दुष्काळाची गिधाडे फडफडत आहेत. 350 पैकी 180 तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला आहे. या तालुक्यांत चारा, पाणी, अन्न यांची दुर्दशा झाली आहे. पशुधनाची स्थिती चिंताजनक आहे व खाटकाच्या दारातून वाचवलेल्या गोवंशांना चारा-पाण्याअभावी मरावे लागत असेल तर ते ‘गोहत्ये’चेच पातक ठरेल हे समजून घेतले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी गंगास्नान केले आहे. त्यामुळे राज्यातील गोवंश हत्येचे पातक त्यांच्या शिरावर येऊ नये असे आम्हास वाटते. धाराशीवचे दत्ता असालकर (भूम तालुका) यांनी दोन गाई नोव्हेंबर 2018 ला विकत घेतल्या. 70 हजार रुपयांना एक गाय विकत घेतली, पण आताच्या दुष्काळामुळे चारा-पाण्याच्या टंचाईने असालकर यांनी या दोन गाई व इतर चार गाई अशा एकूण सहा गाई 1,35,000 रुपयांना विकल्या. म्हणजे नुकसानच नुकसान. जनावरांसाठी पाच लाख रुपये खर्चून गोठा बांधला तो आता रिकामाच आहे. त्या

रिकाम्या गोठ्याकडे

पाहून दत्ता असालकर यांच्या डोळ्यांतील अश्रू थांबायला तयार नाहीत. दत्ता असालकर यांच्याप्रमाणे शेकडो शेतकरी याच परिस्थितीशी झुंजत आहेत व झुंज अपयशी ठरल्यावर आत्महत्या करीत आहेत. शेतकऱ्यांनी पीक व दुभती जनावरे दोन्ही गमावले आहे. विकलेला गोवंश नक्की कोठे जात आहे? त्या गोवंशाचे काय झाले याचा शोध गोरक्षकवाल्यांनीच घ्यायचा आहे. युद्धज्वर आणि निवडणूक ज्वराने आमची डोकी बधिर झाली आहेत. अनेक मूळ प्रश्नांचा विसर पडला आहे. राज्यातील 14 हजार 778 गावे दुष्काळग्रस्त आहेत. मराठवाड्यातील पाण्याची पातळी तळ गाठत आहे. टंचाईग्रस्त भागात चारा छावण्या नक्की सुरू झाल्या आहेत काय? जाहिरातींच्या भडिमारात चारा छावण्या कुठे हरवल्या तर नाहीत ना? याचा शोध सरकारला घ्यावा लागेल. सरकारी यंत्रणा पुढच्या चार दिवसांत निवडणूक कामाला जुंपली जाईल व शेतकऱ्यांची वेदना पुन्हा बेवारस बनेल. निवडणूक प्रचारात शेतकऱयांच्या कल्याणाच्या नव्या घोषणा होतील. पण शेतकऱ्यांच्या मानेभोवती आवळलेला फास तसाच राहील. पुलवामात मरण पावलेल्या जवानांच्या हत्येचा बदला सरकारने घेतला व त्यामुळे सरकारचा ‘जयजयकार’ सुरू आहे. जवानांप्रमाणे आमचा किसानही मरत आहे. त्यांच्या आत्महत्यांचा बदला कसा घ्यायचा? जवानांचा जय व किसानांचा पराजय असे होऊ नये. जवान जिंकतात तेव्हा विजयाचे जुलूस निघतात, पण मरणाऱ्या शेतकऱ्यांच्या चिता म्हणजे थंडीतील उबदार शेकोटी नव्हं हे आम्ही परखडपणे सांगत आहोत!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमित शहांनी सहकुटुंब घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

Aprna

कर्नाटक निवडणुकीबाबत अजित पवारांचा गौप्यस्फोट

News Desk

विधानसभेला युती निश्चित, लवकरच होणार अधिकृत घोषणा

Gauri Tilekar