HW News Marathi
राजकारण

सत्ताधार्‍यांना हिंदुत्व आणि राममंदिरही नको झाले !

सत्तेवर येताच मध्य प्रदेशातील शेतकर्‍यांची सर्व कर्जे माफ करू, असे राहुल गांधी यांनी सांगितले. त्यावर राहुल गांधी काय आकाशातून सूर्य-चंद्रही आणून देतील, अशी टीका मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली. 2014 साली मोदी यांनी हेच सूर्य-चंद्र जनतेला आणून द्यायचे वचन दिले होते. पण जनतेच्या हातात दगडधोंडेही पडले नाहीत. मोदी यांचाच प्रचार मार्ग राहुल गांधी यांनी स्वीकारला तर काय बिघडले? जात, धर्म, गोत्र, आई-वडील हेच प्रचाराचे मुद्दे ठरत आहेत. नोकर्‍या, भूक, महागाई, दहशतवाद यावर बोलावे असे कुणाला वाटत नाही. आता सत्ताधार्‍यांना हिंदुत्व आणि राममंदिरही नको झाले आहे. यालाच म्हणतात गोंधळाकडून गोंधळाकडे.

सामनाचे आजचे संपादकीय

विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. पण त्यातून फार काही हाती लागेल असे वाटत नाही. 29 तारखेस मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाचे विधेयक येईल. चर्चा वादळी वगैरे झाल्या तरी ते मंजूर होईल. मराठा आरक्षण झाले तसे मुस्लिमांनाही धर्माच्या नावावर आरक्षण मिळावे अशी मागणी होत आहे. चंद्रकांत पाटलांनी ती फेटाळून लावली. मुस्लिमांतील मागास जातींना आरक्षण मिळणार आहे व धर्माच्या आधारावर आरक्षण मिळणार नाही, हे चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केले हे बरे झाले. धनगर समाजाच्या आरक्षणाचे आता काय व कसे होणार व महादेव जानकर वगैरे मंडळी कोणती भूमिका घेतात यावर लाखो धनगर बांधवांचे लक्ष लागून राहिले आहे. निवडणुका लढवण्यासाठी फाटक्या गोधड्यांना ठिगळं लावण्याचे काम सुरू आहे. पण यामुळे जनतेला ऊब मिळेल काय? निवडणुकीत आपण जी आश्वासने देतो ती ‘जुमलेबाजी’ ठरू नये याची काळजी यापुढे सगळ्यांनीच घेणे गरजेचे आहे. लोकप्रियता मिळवण्यासाठी भरमसाट आश्वासने दिली जातात व सत्ता मिळताच त्यांचा विसर पडतो. जनतेला मूर्ख बनवण्याचे हे धंदे आहेत. चार राज्यांतील विधानसभा निवडणूक प्रचारात त्याच जुमलेबाजीचा धुरळा उडवला गेला व उद्या महाराष्ट्रातही काही वेगळे घडेल असे आम्हास वाटत नाही. सत्तेवर येताच मध्य प्रदेशातील शेतकर्‍यांची सर्व कर्जे माफ करू, असे राहुल गांधी यांनी सांगितले. त्यावर राहुल गांधी काय आकाशातून सूर्य-चंद्रही आणून देतील, अशी टीका मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली. 2014 साली मोदी यांनी हेच

सूर्य-चंद्र जनतेला आणून द्यायचे

वचन दिले होते. पण जनतेच्या हातात दगडधोंडेही पडले नाहीत. मोदी यांचाच प्रचार मार्ग राहुल गांधी यांनी स्वीकारला तर काय बिघडले! महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला असून जणू राज्यातील सर्व देवदेवतांचाच कोप झाला की काय असे दिसत आहे. शेतकरी-कष्टकर्‍यांचा चंद्र हा त्याच्या कोरड्या भाकरीत होता. दुष्काळामुळे हा चंद्रही लोप पावला आहे. राज्याचे विधानसभा अधिवेशन दुष्काळप्रश्नी कामी लागावे व शेतकर्‍यांना दिलासा द्यावा असे आम्हाला वाटते. सरकार आणि विरोधी पक्षांनी एकमेकांची उणीदुणी काढत बसण्यापेक्षा दुष्काळावर काय उपाययोजना करता येईल, गुरांचा चारा, पाणी, कडबा, शेतकर्‍यांचे सुरू झालेले स्थलांतर यावर काय तोडगा काढता येईल ते पाहावे लागेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बाजूच्या राज्यात प्रचाराचे निमंत्रण आहे. संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ, राज्याराज्याचे मुख्यमंत्री, आमदार, खासदार, धनिक समर्थक यांना भाजपने चार राज्यांत प्रचार कामात जुंपले आहे. एखादे राज्य जरी हातचे गेले तरी आकाश कोसळेल असे सत्ताधार्‍यांना वाटणे हा संसदीय लोकशाहीचा पराभव आहे. फक्त निवडणुकांमागून निवडणुका जिंकायच्या व त्यातच समाधान मानायचे ही एक प्रकारे भांगेची नशा आहे. त्या भांगेसाठी प्रचंड काळा पैसा ओतला जात आहे. मग नोटाबंदीचे काय झाले व सर्वच काळा पैसा खतम करू या घोषणेचे काय झाले? सभा यशस्वी करण्यासाठी गर्दी विकत घेतली जाते. तसे विजयही तराजूत तोलून विकत घेतले जातात. हे आणखी किती काळ चालणार? धर्माचे म्हणाल तर या

देशाला एकमेव धर्म

आहे तो हिंदू धर्म. याचा अर्थ येथे इतर धर्मांना स्थान किंवा महत्त्व नाही असे आम्ही म्हणत नाही. हिंदुत्व ही संस्कृती असून या देशाला मातृभूमी मानणारे सगळेच जण हिंदू संस्कृतीचे घटक आहेत. मग ते मुसलमान, ख्रिश्चन, पारशी, जैन आणि आमचे शीख बांधव तर आहेतच आहेत. प्रत्येक धर्माचे हा देश घडविण्यात योगदान आहे. 2014 पर्यंत देशात गवताची काडीही उगवली नाही व सुई धाग्याची निर्मितीही झाली नाही, हे आम्ही तरी मान्य करणार नाही. पण जात, प्रांत, पंथात फाटलेला देश हिंदुत्वाच्या वज्रमुठीनेच एकत्र राहू शकतो हेच आमचे मत आहे. संपूर्ण देशात जातीय मतमतांतराचा जो धुरळा उडाला आहे व त्यातून मने कलुषित झाली आहेत. त्यामुळे देशाला भोके पडत आहेत. त्या भोकांची भगदाडे होऊ नयेत यासाठीच हिंदू म्हणून एकत्र येणे ही काळाची गरज आज तरी आहे. लोक जातीपातीचे झेंडे घेऊन मागण्यांसाठी रस्त्यावर उतरतात. हा आजपर्यंत ज्यांनी राज्य केले त्यांच्या धोरणांचा, योजनांचा व अर्थकारणाचा पराभव ठरतो. काँग्रेसने मागच्या काळात काही केले नाही म्हणून तुमच्या पाच- दहा वर्षांच्या कालखंडात काही करायचे नाही किंवा आज जे बरे झाले नाही त्याचे खापरही मागच्यावर फोडायचे ही राजकीय संस्कृतीच देशाला घातक, मारक ठरत आहे. जात, धर्म, गोत्र, आई-वडील हेच प्रचाराचे मुद्दे ठरत आहेत. नोकर्‍या, भूक, महागाई, दहशतवाद यावर बोलावे असे कुणाला वाटत नाही. आता सत्ताधार्‍यांना हिंदुत्व आणि राममंदिरही नको झाले आहे. यालाच म्हणतात गोंधळाकडून गोंधळाकडे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सूर्य, चंद्र, तारे असेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आमचे आदर्श असणार”, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

Aprna

‘ये दोस्ती आगे भी चलती रहेगी’, तेजस्वी यादव यांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Aprna

विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने कशी असतील राज्यातील समीकरणे ?

News Desk