HW News Marathi
नवरात्रोत्सव २०१८

शिवरायांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ

राजमाता जिजाऊ या हिंदवी स्वराज्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाऊंचे वडील व म्हाळसाबाई या त्यांच्या आई. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. दौलताबाद येथे डिसेंबर इ.स. १६०५ साली जिजाबाईंचा शहाजीराजांशी विवाह झाला.शिवरायांच्या जन्मानंतर शहाजीराजांनी जिजाऊंच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्द केली होती. कुशल अधिकार्‍यांसमवेत शिवरायांना सोबत घेऊन त्यांना घडवत जिजाऊ ही जहागीर सांभाळत होत्या. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वार्‍यांमुळे त्याकाळी पुण्याची अवस्था अतिशय भीषण झाली होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील जिजाऊंनी दादोजी कोंडदेव यांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला आणि स्थानिक लोकांना अभय दिले.

शिवरायांची संपूर्ण जबाबदारी जिजाऊंनी समर्थपणे सांभाळली. जिजाऊंनी शिवरायांना लहानपणापासून तत्कालीन भयावह वस्तुस्तिथीची हळूहळू जाणीव करून द्यायला सुरुवात केली होती. जिजाऊंनी रामायण, महाभारतातील गोष्टी सांगत शिवरायांना घडविले. सीतेचे हरण करणार्‍या दुष्ट रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता. हे सर्व काही जिजाऊ शिवरायांना सांगत असत. जिजाऊंच्या संस्कारांमुळेच शिवाजीराजे घडले.

शिवरायांच्या पत्नी सईबाई यांच्या निधनानंतर संभाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाऊंनी उचलली होती. शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्‍नी सईबाई यांचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटविण्यात आले होते. त्यांना हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, शिवाजी महाराजांचाही त्यांना पाठिंबा होता. प्रत्येकवेळी धर्मराजकारणात जिजाऊ राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. जिजाऊ राजांच्या सर्व स्वार्‍यांचा, लढायांचा तपशील ठेवत असत. शिवरायांच्या खलबतांत आणि सल्ला मसलतीत जिजाऊ भाग घेत असत. शिवाजी राजे आग्र्याला कैदेत असताना राज्याची संपूर्ण जबाबदारी जिजाऊंनी कौशल्याने निभावून नेली होती.

जिजाऊंच्या संस्कारात शिवरायांची जडणघडण झाली. शिवरायांच्या त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव करून देताना जिजाऊंनी त्यांना राजनीती देखील शिकविली. समान न्याय, अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस त्यांनी शिवरायांना दिले. शिवराय जेव्हा शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घेत होते तेव्हा जिजाऊ स्वतः त्यावर बारकाईने लक्ष ठेवत असत. शिवरायांच्या आयुष्यातील प्रत्येक आव्हानात्मक समयी शिवरायांनी जिजाऊंचेच मार्गदर्शन घेतले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. पण त्याचबरोबर त्यांचे शिवराय सुखरूप, योग्य स्थळी आहेत ना याची खडानखडा माहिती जिजाऊंना गडावर मिळत असे.

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पाहून राज्याभिषेकानंतर अवघ्या बारा दिवसांनी इ.स. १६७४ रोजी जिजाऊंनी त्यांच्या स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ८० व्या वर्षी जिजाऊंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले. राजमाता जिजाऊ या आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन कौशल्य व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता होत्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवरात्रीनिमित्त दांडिया आणि घागरा-चोलीची बाजारात विक्री

Gauri Tilekar

आजचा रंग पिवळा, ‘ब्रम्हचारीणी’ रूपात घ्या देवीचे दर्शन

News Desk

महाराष्ट्रातील पहिल्या महिला लोकशाहीर सीमा पाटील

Gauri Tilekar