HW News Marathi
नवरात्रोत्सव २०१८

कर्तबगार वीरांगणा महाराणी ताराबाई भोसले

भारतीय इतिहासाला पराक्रमाच्या वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले ते कित्येक वीरांगणांनी. त्यापैकीच एक म्हणजे महाराणी ताराबाई भोसले होत्या. महाराणी ताराबाई ह्या छत्रपती राजाराम महाराजांच्या दुसर्‍या पत्‍नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते ह्यांच्या कन्या होत्या. त्यांचा जन्म १६७५ साली झाला होता . छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापासून ते मराठ्यांचे पानिपत या सर्व गोष्टी महाराणी ताराबाईंनी आपल्या डोळ्यांनी पाहिल्या होत्या. मराठ्यांच्या इतिहासातील ताराबाईं एक कर्तबगार राजस्त्री होत्या. शिवाजीराजे आणि संभाजीराजांच्या मागे कणखरपणे तिने राज्याची धुरा सांभाळली. संताजी, धनाजी यांना बरोबर घेऊन मुघलांना सळो की पळो करून सोडणारी ही रणरागिणी म्हणजे महाराष्ट्रातल्या कर्तृत्ववान स्त्रियांमधील एक मानाचे पान होय.

उत्तर, पूर्व आणि दक्षिण भागावर आपले वर्चस्व राखून असणाऱ्या मुघल बादशहा औरंगजेबाची नजर जेव्हा पश्चिम भारताकडे वळली, तेव्हा त्यांच्या मनसुब्यांना सुरंग लावायचे काम महाराणी ताराबाईंनी केले. मराठे शाहीतील गांभीर्य समजावून देऊन शेवटपर्यंत या सगळ्यांबरोबर एकजुटीने राहून तिने शत्रू थोपवून धरला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्याच्या कित्येक सेनापतींकडून मार खाल्लेल्या औरंगजेबाला पुन्हा अद्दल घडवून स्वराज्याच्या स्त्रिया या देखील पुरुष योद्ध्यांपेक्षा कमी नाही हे त्यांनी दाखवून दिले. मोगलांना कर्दनकाळ वाटावेत असे कर्तृत्ववान सरदार त्यांच्या समोर उभे केले.

पश्चिम भारतामध्ये कितके वर्षांपासून आपला दबदबा कमावून ठेवणाऱ्या मराठा साम्राज्याची ताकद काहीशी कमी होत चालली होती. स्वराज्याला कोणीही खंदे नेतृत्व नाही असा विचार करून औरंगजेबाने पुन्हा एखादा स्वराज्याची संपत्ती असलेले गड-कोट काबीज करण्यास सुरुवात केली. इतरही शत्रू टपून बसले होतेच. अशा वेळेस महाराणी ताराबाईंनी सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली आणि मराठा साम्राज्याची पताका पुन्हा उंचावली.

राजकीय परिस्थिती

सन १७०० साली जिंजी मोगलांच्या ताब्यात आली. पण तत्पूर्वी राजाराम जिंजीहून निसटून महाराष्ट्रात परतले. ताराबाई व इतर लोक मात्र मोगलांचा सेनापती जुल्फिखारखान यांच्या तावडीत सापडले. पण जुल्फिखारखानने सर्वांची मुक्तता केली. २ मार्च १७०३ रोजी छत्रपती राजाराम यांचा सिंहगड किल्ल्यावर मृत्यू झाल्यानंतर मराठी साम्राज्याची सूत्रे ताराबाईंच्या हाती आली. त्यांच्या सैन्यामध्ये बाळाजी विश्वनाथ, उदाजी चव्हाण, चंद्रसेन जाधव, कान्होजी आंग्रे आदी मात्तबर सेनानी होते. त्यांनी मोगलांची पळता भुई थोडी अशी अवस्था केली. सन १७0५ साली त्यांनी मोगलांच्या ताब्यातील पन्हाळा किल्ला जिंकून कारंजा ही राजधानी बनविली.

कारकीर्द

छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतली. मराठा सैन्यातले शूर सरदार संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव ह्यांच्या साथीने महाराणी ताराबाईंनी औरंगजेबाच्या मोगल सैन्याला सतत हुलकावणी दिली. सन १७०५ मध्ये मराठी फौजा नर्मदा ओलांडून माळवा प्रांतात शिरल्या आणि मोगल फौजांना त्यांनी खडे चारले. त्या जिंकलेल्या प्रांतांमधून चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करून स्वराज्याची तिजोरी आर्थिकदृष्ट्या बळकट केली.

विशाळगडच्या वेढ्यात बादशहाचे फार मोठे नुकसान् झाले. मराठ्यांसोबत, सह्याद्री व पाऊस ह्यांनी त्याला हैरान केले. शेवटी बेदारबख्तच्या मध्यस्थीने मराठ्यांना २ लाख रुपये दिले व किल्ला ताब्यात घेतला. अनेक किल्ले मराठ्यांनी मोगलांकडुन पैसे घेऊन सोडुन दिले व त्या पैशातुन फौज भरती सुरु केली. विशाळगडाच्या मोहीमेत बादशहाची ६,००० माणसे कामास आली ह्यावरुन मराठ्यांनी केवढा प्रतिकार केला हे लक्षात येऊ शकते. ह्या लढ्यामुळे हैरान होऊन बादशहा बहादुरगडास गेला पण तिथे त्याला नेमाजी शिंद्यानी गाठले. बादशहाला बगल देऊन नेमाजी शिंदे माळव्यात घुसले, उत्तरेत घुसण्याचा पहिला मान नेमाजी शिंदेंचा. ३०,००० मराठ्यांनी खुद्द बादशहा दक्षिणेत असताना उत्तरेत हल्ला केला. भोपाळच्या उत्तरेला मोठी गडबड नेमाजींनी ऊडवली.

माळव्यात झालेला प्रकार पाहून बाद्शाहाने रागात येऊन आणखी सैन्य आणले व एकाच वेळेस सिंहगड, तोरणा व राजगडला वेढा घातला. सिंहगडाने ३ महीने तोंड दिले. पण मराठ्यांनी नंतर ५०,००० रुपये घेऊन किल्ला सोडला. बादशहाने सिंहगड किल्ल्याचे बक्षिंदाबक्ष असे नामकरण केले व पुण्यास येऊन सहा ते आठ महीने राहीला. फेब्रुवारी, मार्च व एप्रिल १७०३ मध्ये अनुक्रमे वरील किल्ले बादशहाकडे गेले. अनेक किल्ले लढत होते, जिथे माणूसबळ कमी पडत होते ते किल्ले पैसे घेऊन मोगलांना दिले जात होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आजचा रंग लाल, ‘कालरात्री’ रूपात घ्या देवीचे दर्शन

Gauri Tilekar

महाराष्ट्रातील पहिल्या महिला लोकशाहीर सीमा पाटील

Gauri Tilekar

समाजसुधारक रमाबाई रानडे

News Desk