डोक्यावर भरजरी फेटा, कपाळी चंद्रकोर, करारी नजर आणि आपल्या पहाडी आवाजासह संपूर्ण व्यासपीठावर आपली हुकूमत गाजवत पोवाडा सादर करणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या लोकशाहीर सीमा पाटील यांना ऐकून अंगावर शहारे आले नाहीत तर नवलच. पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या एका क्षेत्रात एखादी स्त्री जेव्हा पदार्पण करते तेव्हा निश्चितच तिला अनेक आव्हानांचा,अडचणींचा सामना करावा लागत असतो. पण ती स्त्री या सर्व अडचणी-आव्हानांचा सामना करीत, प्रवाहविरुद्ध जाण्याची हिंमत दाखवते आणि त्या क्षेत्रात आपला ठसा उमटवीते. याचे अत्यंत आदर्श उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील पहिल्या महिला लोकशाहीर सीमा पाटील होय.
महाराष्ट्राला लोककला आणि लोकपरंपरांचा अतिशय समृद्ध असा वारसा लाभला आहे. एका पेक्षा एक प्रतिभावंत लोककलावंतांची महाराष्ट्राला मोठी परंपरा लाभली आहे. या लोककलाप्रकारांमध्ये भारुड, कीर्तन, पोवाडा (शाहिरी), लावणी या कलांचा समावेश होतो. यांतील विशेष प्रसिद्ध असलेली कला म्हणजे शाहिरी. महाराष्ट्राला पठ्ठे बापूराव, शाहीर साबळे यांसारख्या दिग्गज शाहिरांची परंपरा लाभली आहे. वीररसात मोडणारा शाहिरी हा लोककलाप्रकार अत्यंत ताकदीने सादर केला जातो. पहाडी आवाज ही या कलेची ओळख. त्यामुळे वर्षानुवर्षे शाहिरी ही कला केवळ पुरुषांनीच सादर करायची कला आहे असे मानले जात होते. मात्र जितक्या ताकदीने एखादा पुरुष ही कला सादर करू शकतो तितक्याच ताकदीने एखादी महिला देखील ही कला सादर करू शकते हे लोकशाहीर सीमा पाटील यांनी सिद्ध केले.
कराडसारख्या एका छोट्याशा शहरात सीमा पाटील यांचे बालपण गेले. सीमा यांना लहानपणापासूनच कलेची आवड होती. त्यांचे वडील काशीनाथ गुरव हे स्वतः लोकनाट्य कलावंत आणि शाहीर होते. सीमा पाटील या देखील सुरुवातीच्या काळात लोकनाट्य आणि मराठी मालिकांमध्ये काम करीत होत्या. सीमा यांचे १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचा विवाह मुंबईत राहणाऱ्या रमेश पाटील यांच्याशी झाला. लग्नानंतर आपली कला जोपासण्याचे आपले स्वप्न अधुरेच राहणार कि काय, अशी भीती सीमा पाटील यांना होती. त्यावेळी साकीनाका येथील एका मंडळाच्या कार्यक्रमात सीमा यांनी लावणी नृत्य सादर केले. त्याच क्षणी कलेची जाण असलेल्या निवृत्ती पाटील यांनी आपल्या सुनेच्या अंगी असलेल्या कलेची दखल घेतली. त्यानंतर सीमा या स्थानिक कार्यक्रमात आपली कला सादर करू लागल्या.
अशाच एका कार्यक्रमात रवींद्र मोरे यांनी सीमा यांचे सादरीकरण पाहिले. सीमा पाटील या कोणत्याही व्यावसायिक कलाकारापेक्षा कमी नव्हत्या. त्यामुळे त्यांना एक उत्तम व्यासपीठ मिळवून देण्याचे रवींद्र मोरे यांनी ठरविले. सीमा पाटील यांना संगीताची उत्तम जाण होती. पुढे १९९५ साली सीमा पाटील यांच्या शाहिरीच्या प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. सुरुवातीला पोवाडा सादर करताना त्या वीररसात आणि त्या ताकदीने आपण ही कला सादर करू शकू का याबद्दल त्यांच्या मनात शंका होती. परंतु त्यांना ही कला सादर करण्याची प्रेरणा आणि विश्वास त्यांच्याच घरातून मिळाला. निवृत्ती पाटील यांना सीमा पाटील या ही कला उत्तम सादर करू शकतात, याबद्दल संपूर्ण विश्वास होता.
सीमा पाटील यांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध शाहीर कृष्णाजी साबळे यांची भेट घेतली. शाहीर साबळे यांनी सीमा यांच्यातील कलागुण ओळखून त्यांच्या पहिल्या पत्नी भानुश्री साबळे यांनी ५० वर्षांपूर्वी लिहिलेला एक पोवाडा सीमा यांना सादर करण्यास सांगितले. खरेतर हा पोवाडा अत्यंत कठीण मानला जातो. २००५ साली पार पडलेल्या कुलू महोत्सवात सीमा पाटील यांनी तो पोवाडा सादर केला. त्यांच्या या पहिल्याच सादरीकरणात त्यांना अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. त्या प्रतिसादाने त्यांचा आत्मविश्वास दुणावला. सीमा पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून बाळासाहेब ठाकरेंपर्यंत सर्वांचे पोवाडे सादर केले आहेत. सीमा पाटील यांनी केवळ राष्ट्रपुरुषच नव्हे तर राजमाता आई जिजाऊ, सावित्री, रमाई, यशोधरा यांसारख्या राष्ट्रमातांचेही पोवाडे गायले आहेत. विशेष आतापर्यंत महिला लोकशाहीर सीमा पाटील यांचे पोवाड्यांचे तब्बल ६००० हुनही अधिक प्रयोग झाले आहेत. ही लोककला अशी अखंडित सुरु राहावी, अशी त्यांची इच्छा आहे. म्ह्णूनच कला जोपासण्यासण्यासाठी सीमा पाटील यांनी ‘कलाविष्कार नृत्य संगीत अकादमी’ची स्थापना केली आहे.
आतापर्यंत मिळालेले पुरस्कार
मुंबई महापौर पुरस्कार (८ मार्च, २००८)
जिजाऊ पुरस्कार (१६ डिसेंबर, २०१५)
महाराष्ट्र रत्न पुरस्कार ( ४ एप्रिल, २०१६)
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.