HW News Marathi
मुंबई

कोस्टल रोडमुळे मुंबई अधिक सुविधायुक्त

मुंबई | बृहन्मुंबई पालिकेसाठी प्रतिष्ठेचा असलेल्या आणि मुंबईकरांसाठी बहु-उपयोगी ठरणा-या प्रस्तावित सागरी किनारा रस्त्यासाठी (कोस्टल रोड) उपलब्ध होणा-या भराव क्षेत्रापैकी २२ टक्के क्षेत्रात सागरी किनारा रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. तर उर्वरित सुमारे ७८ टक्के क्षेत्रात म्हणजेच ७५ लाख ३४ हजार ७३० चौरस फूट परिसराचा उपयोग हा लॅंडस्केपिंगसह विविध नागरी सुविधांसाठी करण्यात येणार आहे. ज्यामध्ये प्रसाधन गृह, जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, फुलपाखरु उद्यान, सागरी पदपथ, खुले नाट्यगृह, लहान मुलांसाठीची उद्याने व खेळाची मैदाने, पोलीस चौकी, बस थांबे, रस्ता ओलांडण्यासाठी भूमीगत पदपथ, जेट्टी इत्यादींचा समावेश असणार आहे. याव्यतिरिक्त १ हजार ६२५ एवढी वाहन क्षमता असलेल्या ३ भूमीगत वाहनतळांचाही यात समावेश असणार आहे. यात ‘लॅण्डस्केपिंग’ प्रत्यक्ष स्वरुपात आकारास येण्यापूर्वी ते अधिकाधिक सुविधापूर्ण करण्याच्या दृष्टीने नागरिकांकडून सूचना मागविण्यात येणार आहेत, अशी माहिती मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्पाचे प्रमुख अभियंता मोहन माचिवाल यांनी दिली आहे.

मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्पांतर्गत ‘लॅण्डस्केप’ व संबंधित कामांची माहिती देताना माचिवाल यांनी सांगितले या प्रकल्पासाठी ९६ लाख ८७ हजार ५१० चौरस फुटांचे भराव क्षेत्र उपलब्ध होणार आहे. यापैकी सुमारे २२ टक्के क्षेत्रात म्हणजेच २१ लाख ५२ हजार ७८० चौरस फुटांमध्ये सागरी किनारा रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. तर उर्वरित ७८ टक्के जागेत म्हणजेच ७५ लाख ३४ हजार ७३० चौरस फुटांमध्ये नागरी सुविधा उभारण्यात येणार आहेत श्यामलदास गांधी उड्डाणपूल (प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर) ते राजीव गांधी सागरी सेतूच्या (वरळी वांद्रे सी लिंक) वरळी बाजुच्या दरम्यान ‘मुंबई सागरी किनारा रस्ता’ बांधण्याची कार्यवाही आता सुरु झाली आहे. या सागरी किनारा रस्त्यासाठी उपलब्ध होणा-या एकूण भराव क्षेत्रापैकी ७८ टक्के जागेत म्हणजेच ७५ लाख ३४ हजार ७३० चौरस फुटांमध्ये उभारण्यात येणा-या विविध नागरी सुविधां उपलब्ध होणार आहेत

काय आहेत सुविधा जाणून घ्या :

३ भूमीगत वाहनतळ

प्रस्तावित सागरी किनारा रस्त्यालगत असणा-या धार्मिक स्थळांना व पर्यटन स्थळांना नागरिक मोठ्या संख्येने भेट देत असतात. हे लक्षात घेऊन, या स्थळांच्या जवळच्या परिसरात ३ मोठी भूमीगत वाहनतळे उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यापैकी एक वाहनतळ हे महालक्ष्मी मंदिर व हाजीअली दर्गा यांच्या जवळ असणार आहे. तर दुसरे वाहनतळ हे ‘अमर सन्स गार्डन’ जवळ असणार आहे. तर मोठ्या प्रमाणात शालेय सहली येणा-या वरळी डेअरी व वरळी सी-फेस येथे तिसरे वाहनतळ उभारण्यात येणार आहे. या तिन्ही वाहनतळांची एकूण वाहनक्षमता ही १ हजार ६२५ एवढी असणार आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही वाहनतळ भूमीगत असणार असून त्यांच्या छतावरती उद्यान वा खेळाचे मैदान विकसित करण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे.

फुलपाखरु उद्यान –

सागरी किनारा रस्त्याची उभारणी करण्यासाठी विविध शासकीय संस्थांची मंजूरी आवश्यक असते. यामध्ये केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाची परवानगी ही एक महत्त्वाची परवानगी आहे. मुंबई सागरी किनारा रस्ता उभारण्यासाठी ही परवानगी यापूर्वीच प्राप्त झाली आहे. तथापि, ही परवानगी देताना केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने ‘बॉटॅनिकल बटरफ्लाय गार्डन’ उभारण्याची अट घातलेली आहे. त्यानुसार उपलब्ध होणा-या भराव क्षेत्रामध्ये बृहन्मुंबई महापालिकेद्वारे एक ‘फुलपाखरु उद्यान’ विकसित करण्यात येणार आहे. यासाठी १० कोटी रुपयांची प्राथमिक तरतूद देखील महापालिकेद्वारे करण्यता येत आहे.

जॉगिंग ट्रॅक व सायकल ट्रॅक –

आजच्या धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनात आणि बदलत्या जीवनशैलीमध्ये आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी नियमित व्यायामाची आवश्यकता असते. हे लक्षात घेऊन सागरी किनारा रस्त्यालगत स्वतंत्र ‘जॉगिंग ट्रॅक’ व ‘सायकल ट्रॅक’ उभारण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे. या दोन्ही ट्रॅकची लांबी प्रत्येकी ६.२० किमी एवढी प्रस्तावित करण्यात आली आहे

सागरी पदपथ –

नेताजी सुभाष मार्ग (मरीन ड्राईव्ह) व खान अब्दुल गफार खान मार्ग (वरळी सी-फेस) या दोन्ही ठिकाणी बृहन्मुंबई महापालिकेद्वारे बसण्याची सुविधा असणा-या कट्ट्यांसह सागरी पदपथ तयार करण्यात आले आहेत. याच धर्तीवर सागरी किनारा रस्त्याच्या निमित्ताने मुंबईतील सर्वात मोठा सागरी पदपथ विकसित करण्यात येणार आहेत. याठिकाणी सुशोभिकरणाच्या अनुषंगाने देशी झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच नागरिकांना बसण्यासाठी कट्ट्यांचे बांधकामही करण्यात येणार आहे.

उद्याने व खेळांची मैदाने –

‘देशातील महापालिकांमध्ये सर्वाधिक उद्यानांची चांगली देखभाल करणारी एक महापालिका’ असा लौकिक असणा-या बृहन्मुंबई महापालिकेची बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात साधारणपणे ७५० उद्याने व ३१८ खेळांची मैदाने आहेत. सागरी किनारा रस्त्याच्या निमित्ताने उपलब्ध होणा-या भराव क्षेत्रातही महापालिकेद्वारे उद्याने व मैदाने विकसित करण्यात येणार आहेत. यामध्ये लहानमुलांसाठी घसरगुंडी, सी-सॉ फळी, झोके यासारख्या बाबीही असणार आहेत. तसेच यापैकी काही उद्याने वा मैदाने ही भूमिगत सुविधांच्या छतावरच उभारण्यात येणार आहेत.

बसथांबे व भूमिगत पदपथ –

सागरी किनारा रस्त्यालगत १४ ठिकाणी बसथांबे उभारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या बस थांब्यापर्यंत प्रवाश्यांना सहजपणे पोहचता यावे, यासाठी सागरी किनारा मार्गाखाली ‘भूमिगत पदपथ’ देखील तयार करण्यात येणार आहेत. या भूमिगत पदपथांमुळे सागरी किनारा रस्ता अधिक सहजपणे ओलांडणे शक्य होणार आहे.

प्रसाधन गृह –

सागरी किनारा रस्त्यालगत नागरिकांच्या सुविधेसाठी प्रसाधनगृहे बांधण्यात येणार आहे. पुरेशा प्रमाणात व ठराविक अंतरानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ही अद्यावत प्रसाधन गृहे बांधण्यात येणार आहेत. दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष सुविधा देखील या प्रसाधन गृहांमध्ये असणार आहेत.

खुले नाट्यगृह –

नागरिकांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात महापालिकेची अनेक नाट्यगृहे व खुली नाट्यगृहे आहेत. प्रस्तावित सागरी किनारा रस्त्यालगत देखील महापालिकेद्वारे एक खुले नाट्यगृह उभारण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या ‘त्या’ वक्तव्याचे ब्राह्मण समाजात पडसाद

News Desk

आज मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

News Desk

पासपोर्ट डिस्पॅच करण्याच्या नावाखाली अभिनेते धर्मेश व्यास यांची फसवणूक; ओशिवरा सायबर सेल पुन्हा अॅक्शन मोडवर

Chetan Kirdat