ठाणे। ठाणे आणि दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेमुळे अथकपणे धावणाऱ्या मुंबईकरांच्या जीवनाला अधिक गती येईल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला तर पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम करताना अडचणींचा सामना करीत राज्य आणि केंद्र शासनाच्या समन्वयातून हा प्रकल्प पूर्ण झाल्याचे सांगत एका अर्थाने ‘दिवा’स्वप्न पूर्ण झाल्याची भावना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. दूरदृष्यप्रणालीद्वारे प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते आज ठाणे आणि दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे लोकार्पण आणि उपनगरीय नवीन रेल्वेसेवांचा शुभारंभ झाला. यावेळी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री ठाकरे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.
ठाणे रेल्वे स्थानक येथे झालेल्या सोहळ्यात केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार राजन विचारे, डॉ.श्रीकांत शिंदे, विनय सहस्त्रबुध्दे, मनोज कोटक, आमदार संजय केळकर, प्रमोद पाटील, निरंजन डावखरे, महापौर नरेश म्हस्के, रेल्वे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.के.त्रिपाठी, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मध्य रेल्वेमार्गावर ३६ नवीन लोकल
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शुभेच्छा देऊन प्रधानमंत्री मोदी म्हणाले, अथकपणे धावणाऱ्या मुंबईकरांच्या जीवनाला गती देण्यासाठी रेल्वेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. या नवीन मार्गिकांमुळे लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका असतील. या दोन्ही मार्गिकांसोबतच मध्य रेल्वेच्या मार्गावर आज पासून ३६ नवीन लोकल सुरु होणार असून त्यामध्ये वातानुकुलित लोकलचा समावेश असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.
अनेक आव्हानांचा सामना करत ठाणे – दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्याचे समाधान आहे. या मार्गिकांवर डझनभर पूल बांधण्यात आले असून फ्लायओव्हर आणि बोगद्यांची निर्मिती करण्यात आली आहे. याकामासाठी कामगार, अभियंते यांनी दिवसरात्र मेहनत करुन राष्ट्रनिर्माणाच्या कामात भरीव योगदान दिल्याचे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले.
आगामी वर्षभरात ४०० नवीन वंदे भारत रेल्वे सेवा सुरु करणार
मुंबई उपनगरीय सेवेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात येत असून सुमारे ४०० कि.मी. लांबीची अतिरिक्त मार्गिका उपनगरीय रेल्वे सेवांसाठी वाढतील असे प्रयत्न असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. भारतीय रेल्वेला आधुनिक करण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून कोरोना काळात गेल्या दोन वर्षात माल वाहतुकीमध्ये रेल्वेनी विक्रमी कामगिरी केली आहे. कोरोना काळत किसान रेल्वेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना बाजारपेठांशी जोडण्याचे काम करण्यात आले. आगामी वर्षभरात ४०० नवीन वंदे भारत रेल्वे सेवा सुरु करण्यात येतील, असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.
‘दिवा’स्वप्न पूर्ण झाले- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईत ज्या सेवेची सुरुवात होते. त्याचं जाळ देशभर पसरतं. मुंबईवरुन सुरुवातीला ठाणे पर्यंत रेल्वे सेवा सुरु झाली आणि त्याचा विस्तार देशभर झाला. काल नवी मुंबईतून देशातील पहिल्या वॉटर टॅक्सीचा शुभारंभ झाला. ठाणे दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम करताना अडचणींचा सामना करीत राज्य आणि केंद्र शासनाच्या समन्वयातून हा प्रकल्प पूर्ण झाल्याचे सांगत एका अर्थाने ‘दिवा’ स्वप्न पूर्ण झाल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. या नवीन मार्गिकांमुळे लाखो बांधवांना फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दळणवळणाच्या विविध सुविधा ‘विकास वाहिन्या’
रस्ते, रेल्वे, मेट्रो, जल वाहतूक यांच जाळ जेवढं घट्ट तेवढी विकासाला गती मिळते. मुंबईतून सुरू होणाऱ्या सेवांचे देशभर जाळे विणले जाते असे सांगतानाच दळणवळणाच्या या विविध सुविधा शरीरातील रक्त वाहिन्यांप्रमाणे ‘विकास वाहिन्या’ असल्याचा उल्लेख मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला. खासदार श्रीकांत शिंदे यांनी या पाचव्या, सहाव्या रेल्वे मार्गिकेच्या कामासाठी केलेला पाठपुरावा आणि अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर परिसराचा विकास कामांचा विशेष उल्लेख मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. ब्रिटिशांनी मुंबई-ठाणे रेल्वे सुरु केली होती. त्या काळी या रेल्वे मधून प्रवास करताना लोक कसे घाबरायचे याबाबतची आठवण मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितली.
वर्षभरात साडे तीन कोटी प्रवाशांना लाभ – केंद्रीय रेल्वे मंत्री
पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेमुळे एका वर्षात सुमारे साडे तीन कोटी प्रवाशांना लाभ होईल असे रेल्वेमंत्री श्री. वैष्णव यांनी सांगितले. रेल्वे सेवेचे उन्नतीकरण करतानाच नवीन स्थानकांचे निर्माण देखील केले जात आहे. हे नवीन स्थानक देशातील शहरांचे आर्थिक जीवन वाहिनी बनत असल्याची भावना रेल्वे मंत्र्यांनी व्यक्त केली. यावेळी रेल्वे मंत्र्यांनी रेल्वे सेवांचा विस्तार करताना देशभरातील सुमारे दीड लाख टपाल कार्यालय आणि रेल्वे सेवा यांना एकमेकांशी जोडल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रेल्वे मंत्र्यांनी तत्कालीन दिवगंत खासदार रामभाऊ म्हाळगी आणि राम कापसे यांच्या कार्याचा उल्लेख करीत त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.
१६५ वर्ष जुन्या ठाणे रेल्वे स्थानकाचा पुर्नविकास करावा- मंत्री एकनाथ शिंदे
पालकमंत्री श्री.शिंदे यावेळी म्हणाले, नव्या मार्गिकांमुळे रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये वाढ होणार असून ठाणे, दिवा, कल्याण या गर्दीच्या स्थानकांना त्यांचा फायदा होईल. ठाणे रेल्वे स्थानक १६५ वर्ष जुने असून त्याचे पुर्नविकास होणे गरजेचे असल्याचे श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले. कळवा-ऐरोली उन्नतमार्ग प्रकल्पाचे काम करताना त्या भागातील नागरिक विस्थापित होणार नाहीत याची दक्षता घेतानाच केंद्र आणि राज्य सरकार मिळून त्यांचे पुनर्वसन केले जाईल अशी ग्वाही श्री.शिंदे यांनी दिली.
गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी रेल्वेने राज्य शासनाला सहकार्य करत एसआरएच्या माध्यमातून विस्थापितांसाठी गृहनिर्माण करण्याची मागणी आव्हाड यांनी यावेळी केली.
केंद्रीय राज्यमंत्री पाटील यांनी नव्या मार्गिकेमुळे केवळ रेल्वे सेवांचीच नव्हे तर मुंबई महानगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवनाला गती मिळेल अशी आशा व्यक्त केली. यावेळी खासदार डॉ.शिंदे, विचारे यांनी मनोगत व्यक्त केले. रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी आभार मानले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.