HW News Marathi
Covid-19

महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत नियमांचे कठोर पालन करावे; डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

मुंबई। महाविद्यालयीन विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरणात शिक्षण घेता आले पाहिजे. यासाठी सर्व विद्यापीठ व महाविद्यालयांतील विद्यार्थिनींची सुरक्षा ही संबंधित शैक्षणिक संस्थांची जबाबदारी आहे. शैक्षणिक परिसर, वसतिगृह, ग्रंथालय, उपहारगृहे तसेच ऑनलाईन शिक्षणामुळे सायबर सुरक्षेबाबत पुरेशा उपाययोजना करुन सुरक्षिततेबाबत नियमांचे कठोर पालन करावे, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले.

विधानभवनात राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालये परिसरात विद्यार्थिनींच्या छेडछाडीच्या तक्रारींच्या अनुषंगाने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती.

उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, ज्ञान, विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान याचा उपयोग महाविद्यालयांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी करावा. विद्यार्थिनींच्या तक्रारी आल्यानंतर त्यांना तत्काळ प्रतिसाद देऊन सहानुभूतीपूर्वक न्याय दिला पाहिजे. अनेकवेळा तक्रारींकडे दुर्लक्ष केले जाते. त्याचे विपरित परिणाम होतात. अनेकवेळा महिला तक्रारीसाठी धाडसाने पुढे येत नाही. यासाठी संवाद समिती सुद्धा गठित करावी. त्यामुळे महिला आपल्या अडचणी मोकळेपणाने सांगतील. या समितीमध्ये प्राध्यापक महिला, प्रशासकीय महिला, स्थानिक पोलीस प्रशासनातील प्रतिनिधी, सायबर संबंधातील प्रतिनिधी अशी सर्वसमावेश समिती असावी, अशा सूचनाही गोऱ्हे यांनी केल्या.

महाविद्यालयांना गेल्या दोन वर्षांपूर्वी किती तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, प्रलंबित किती आहेत, ऑफलाईन आणि ऑनलाईनचे प्रमाण याचा अहवाल तयार करावा. या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी उपाययोजना करुन हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा हे एक साधन आहे. या कायद्याच्या माध्यमातून महिलांना सुरक्षेची हमी मिळणार आहे. पीडित महिलांच्या बाबतीत तत्काळ दखल घेत सक्षम तपास आणि कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे, असेही डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

विद्यार्थींनींच्या सुरक्षिततेसाठी नियमावली तयार करणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

सर्व विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनींची सुरक्षितता महत्त्वाची असून छेडछाडमुक्त, सायबरमुक्त परिसर राहिण्यासाठी महिलांच्या सुरक्षिततेच्यासंदर्भात सर्वसमावेशक अशी नियमावली तयार करणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी असलेले नियम, कायद्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे. 90 दिवसांचा कालावधी गृहित धरुन ही नियमावली तयार करण्यात यावी. यामध्ये शहरी भाग, छोटी शहर, ग्रामीण भाग, या परिसरातील शैक्षणिक संस्थांचा अभ्यास करुन सर्वसमावेशक अशी नियमावली तयार करावी. ही नियमावली खासगी महाविद्यालये, विद्यापीठांनासुद्धा लागू राहील. तसेच विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी मोबाईल ॲप तयार करावे. संबंधित महाविद्यालयांचे प्रमुख, विद्यार्थी-विद्यार्थिनी, त्यांचे पालक यांचा समावेश असेल यामुळे या अशा प्रवृत्तीला आळा घालण्यास मदत होईल, असेही सामंत यांनी सांगितले.

यावेळी उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने, तंत्रशिक्षण संचालक डॉ.अभय वाघ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.नितिन करमळकर, कुलसचिव अनघा तांबे,नागपूर विद्यापीठाचे संचालक डॅा.सोपानदेव पिसे, अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.भाले, डॉ.तुषार देशमुख नांदेड विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ.भिसे, कुलसचिव डॉ.खंदारे, सोलापूर विद्यापीठाचे संचालक डॅा.वसंत कोरे,मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.सुधीर पुराणिक, कोल्हापूर विद्यापीठ कुलसचिव डॅा.वि.एन शिंदे, कुलगुरू डॅा.डि.टी शिर्के, संचालक डॅा. आर.वी. गुरव, गडचिरोली विद्यापीठाचे डॅा.प्रशांत बोकाडे, जळगाव विद्यापीठाचे संचालक डॅा.पंकज ननावरे उपस्थित होते तसेच मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य व महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ सुधारणा समिती सदस्य शितल देवरुखकर-शेठ, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य सुप्रिया कारंडे, मुंबई विद्यापीठ WDC चे पंड्या मॅडम, युवासेना सचिव दुर्गा भोसले-शिंदे, युवासेना कार्यकारणी सदस्य सुप्रदा फातर्पेकर, युवासेना कार्यकारणी सदस्य साईनाथ दुर्गे याबैठकीत उपस्थित होते.

बैठकीमध्ये कुलसचिव, महिला सुरक्षिततेसाठी काम करणाऱ्या संघटनांचे महिला प्रतिनिधी यांनी विद्यार्थिनींच्या अडचणी, तक्रारींनंतर मिळणारा प्रतिसाद, महाविद्यालयांची कार्यवाही, महाविद्यालयीन परिसरात सीसीटीव्ही, स्थानिक पोलीस प्रशासनाचा प्रतिसाद, महाविद्यालयांमध्ये सुरक्षिततेबाबत केलेल्या उपाययोजना याबाबत सविस्तर चर्चा केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणे शहरात ५ ऑगस्टपासून हॉटेल, मॉल सुरू होणार, जाणून घ्या नियम !

News Desk

२१ मेपर्यंत भारतातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणार?

News Desk

ग्रंथालय सुरू करण्यासाठी राज्य सरकारचा आदेश; मेट्रो देखील १५ऑक्टोबरपासून सुरु होणार  

News Desk