HW News Marathi
क्राइम

मजबुरी का नाम कोण?

समकालीन / सचिन परब

पंतप्रधान नरेंद्र मोदी चरखा चालवत खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या डायरी, कॅलेंडरवर आरूढ झाले आणि एकच गदारोळ झाला. गेले दोन महिने सुरू असलेली नोटाबंदीवरची चर्चा अचानक थांबली. राजकीय पुढारी कोणत्याही पक्षाचे असोत, ते असे खेळ खेळत असतात. त्यांना ते खेळावे लागतातच. आपण सर्वसामान्य माणसं त्या खेळातल्या सोंगट्या बनून पटावर धावत राहतो.

मोदींना खादीबदद्ल आकर्षण तर आहेच. गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते दरवर्षी गांधी जयंतीच्या दिवशी खादी विकत घेण्यासाठी स्वतः खादी ग्रामोद्योगच्या दुकानात जात असत. गांधीजींचं जन्मगाव पोरबंदरमध्ये त्यांनी खादीवरचं भव्यदिव्य प्रदर्शन भरवलं होतं. गुजरातमध्ये आज खादीची चळवळ जिवंत नसली तरी खादी व्यवसाय म्हणून जिवंत आहे. फक्त सौराष्ट्रातच गोव्याच्या तीन लाख लोकांना थेट खादीचं कापड बनवून रोजगार मिळतो. त्यामुळे खादीवरच्या त्यांच्या प्रेमाला मताचं कारण होतं. पण पंतप्रधान बनल्यानंतर ते कमी झालं नाही. त्यांनी चीनच्या अध्यक्षांना साबरमती आश्रमात नेलं. खादीच्या गुंड्या देऊन त्यांचं स्वागत केलं. ‘मन की बात’मधूनही खादीचं गुणगान केलं. आता तर ते थेट मॉडेल बनून खादीच्या कॅलेंडरवरच अवतरले आहेत.

मोदींनी कुठे मॉडेल बनावं हा त्यांचा प्रश्न आहे. अखेर राज्य त्यांचंच आहे. मुकेश अंबानींनी जिओ मोबाइल लॉन्च केला. तेव्हाही मोदींची छबी अशीच पेपर, टीव्ही आणि पोस्टरांवर मॉडेल म्हणून अवतरली होती. पंतप्रधानांना मॉडेल बनवलं म्हणून अंबानींना पाचशे रूपये दंडही झाला. त्यातून देशाच्या पंतप्रधानाची किंमत ठरली. वाईट झालं. अंबानींच्या जिओचं मॉडेल बनण्यापेक्षा खादीचं म़ॉडेल बनणं केव्हाही चांगलंच. तरीही त्यावर टीका झाली. तसं होणं स्वाभाविकच होतं. कारण अनेकांच्या मते ते खादीमागच्या उदात्त मूल्यांचं अवमूल्यन होतं.

खादी म्हणजे नुसतं कापड नाही. स्वातंत्र्य चळवळीतलं ते एक यशस्वी शस्त्र होतं. कोणतीही दळवळणाची साधनं नसताना केवळ महात्मा गांधींच्या शब्दाखातर देशभरातल्या लाखो लोकांनी खादीला आपल्या जगण्याचा भाग बनवला. लेंगे स्वराज्य लेंगे, चरखा चला चला के, असा त्यांचा नारा होता. लाखो लोक स्वतः चरख्यावर सूत कातत आणि त्याचेच कपडे घालत. मोदी आज ज्यांचा उंचचउंच पुतळा बनवत आहेत, ते सरदार वल्लभभाई पटेलही त्यापैकीच एक. स्वातंत्र्यसंग्रामापासून दूर राहणाऱ्या हिंदुत्ववाद्यांना चरख्याचं हे महत्त्व कळलंच नाही. त्यामुळे ते चरख्याला हिणवत राहिले. चरखा फिरवून स्वातंत्र्य मिळवता येतं का, असे कुजकट प्रश्न विचारण्यात त्यांना वैचारिक धन्यता वाटत असे. हिंदुत्ववाद्यांकडून होणाऱ्या अशाच हेटाळणीची परिणती म्हणून त्यांच्यातल्या एका अतिरेक्याने गांधीजींचा खून केला.

हिंदुत्ववाद्यांनी त्यांचा जीव घेतला. गांधीवाद्यांनी त्यांना आध्यात्मिक बुवाच बनवलं आणि त्यांच्या क्रांतीला कर्मकांड. काँग्रेसने त्यांना सरकारी बनवून संपवलं. मुसलमानांसाठी ते कट्टर हिंदू होते. कम्युनिस्टांसाठी भांडवलदारांचे हस्तक. आंबेडकरवाद्यांसाठी मनुवादी. सगळ्यांनी वारंवार मारूनही गांधीजी मेले नाहीत. उलट ते जगभर पसरत गेले. प्रबळ सत्तेविरोधात सर्वसामान्य माणूस जिथे लढत होता, तिथे तिथे जगाच्या कानाकोपऱ्यात गांधीजी संघर्षाचा साथीदार बनून उभे ठाकले. ते भारताच्या गुणसूत्रांमध्येच होते. ते काढणं कुणालाच काही केल्या जमलं नाही.

मारूनही संपत नाही म्हणून हिंदुत्ववाद्यांनी गांधीजींना हरप्रकारे बदनाम केलं. वर्षानुवर्षं शाळा कॉलेजांत त्यांच्यातल्या शिक्षकांनी टकल्या म्हणून विद्यार्थ्यांच्या मनात द्वेष पेरला. त्यांच्यामुळे फाळणी झाल्याचं खोटंच सांगितलं गेलं. ते सरदार भगतसिंग आणि नेताजी सुभाषचंद्र बोसांचा शत्रू असल्याचं ठसवलं गेलं. एकीकडे प्रार्थनेत त्यांचं नाव घेताना दुसरीकडे त्यांना लिंगपिसाट ठरवण्यापर्यंत मजल गेली. त्यांच्या खुन्यांचं उदात्तीकरण केलं. गोडसेवर कीर्तन केली. नाटकं सादर झाली. ‘एबीसीडी इएफजी त्यातून निघाले गांधीजी’, अशी गाणी खेळांच्या नावाने एकत्र आणलेल्या मुलांना शिकवण्यात आली. त्याच सुरात एक म्हण तयार केली, ‘मजबुरी का नाम महात्मा गांधी’.

गोव्यात फार प्रचलित नसलं तरी देशभर ‘मजबुरी का नाम महात्मा गांधी’ हे वाक्य सर्रास वापरलं जातं. एक गाल पुढे केला की दुसरा गाल पुढे करायला सांगणारा म्हातारा अशी बापूंची बापुडवाणी प्रतिमा तयार करण्यात आली. प्रत्यक्षात तेजाचं आणि त्यागाचं धगधगतं संघर्षकुंड म्हणजे गांधीजी. पण त्यांना नेभळट ठरवण्यात आलं. त्यातून अगतिकते तुझं दुसरं नाव गांधी, असं सांगणारी ही म्हण रूढ झाली.

कधीतरी अचानक रिचर्ड अटनबरो आले, त्यांनी ‘गांधी’ सिनेमा बनवून या म्हणीला धक्का दिला. जगाने डोक्यावर घेतलेले नेल्सन मंडेला, आँग स्यान स्यू की, दलाई लामा या सगळ्यांनी तेच केलं. ‘लगे रहो मुन्नाभाई’नेही या मानसिकतेला हादरवूनच टाकलं. बराक ओबामांनी तर आपल्या ऑफिसातल्या भिंतीवर गांधीजींचा फोटो लावला. हे कमी होतं म्हणून भारतात येऊन त्यांनी सांगितलं की मी अमेरिकेचा अध्यक्ष बनलो त्याचं कारण महात्मा गांधी. वारंवार अशा धडका बसल्यामुळे हादरलेल्या हिंदुत्ववाद्यांनी मोदी बहुमताने पंतप्रधान बनल्यावर समाधानाचा सुस्कारा सोडला. मोदींमुळे गांधी खरंच मजबुरी का नाम बनतील, अशी त्यांना खात्रीच होती. हिंदुत्ववाद्यांच्या सोशल साइट्सवरच्या पोस्टमध्ये त्याचं प्रतिबिंब उमटलं होतं.

पण झालं भलतंच. पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर मोदी सर्वात आधी गांधीजींच्या समाधीवर म्हणजे राजघाटाला गेले. आपल्या ऑफिसात गांधीजींचा फोटो लावून त्याला नमस्कार करत असतानाचे फोटो छापून आणले. त्यांनी स्वच्छ भारत मोहीम आणली. त्याला महात्मा गांधींचं नाव दिलं. त्या मोहिमेच्या लोगोतही गांधीजींचा चष्मा घेतला. काँग्रेसच्या काळात योजनांना दिलेली गांधी, नेहरूंची नावं कायमची संपणार अशी स्वप्न बघणाऱ्यांना हा धक्काच होता. मोदी जगभर जिथे कुठे गेले, त्या प्रत्येक भाषणात त्यांनी गांधीजींचं नाव घेतलं. मी बुद्ध आणि गांधीजींच्या देशातून आलोय, हे पालुपद त्यांनी परदेशातल्या प्रत्येक भाषणात सांगितलं. आता फक्त हेडगेवार, गोळवलकर, सावरकर यांचंच नाव मोदींच्या तोंडून ऐकू येणार, या अपेक्षा पूर्ण झाल्याच नाहीत. जगाच्या पाठीवर सांगता येतील, अशी सन्माननीय नावं मोदींच्या पक्षाकडे आणि मातृसंस्थेकडे नव्हतीच. त्यांना गांधीजींशिवाय पर्याय नव्हता.

मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही स्वतःमध्ये गोळवलकर ते देवरस असं स्थित्यंतर घडवलं ते गांधीजींचीच कॉपी करत. आदिवासी आश्रमांपासून गोसेवेपर्यंत, स्वदेशीपासून निसर्गोपचारापर्यंत आणि मातृभाषेतून शिक्षणापासून एकात्म मानवतावादापर्यंत, गांधीप्रेरणेतून उभ्या राहिलेल्या प्रयोगांच्या पॅटर्नच्या झेरॉक्स कॉप्या काढत संघाने सेवाकार्याचं जाळं देशभर पसरवलं. ज्यांचा खून झाल्यावर पेढे वाटले होते, त्यांनाचा प्रातःस्मरणात स्वीकारण्याची पाळी संघावर आली.

संघाच्याच मुशीत तयार झालेल्या मोदींना गांधींविषयी खरंच आदर आहे की अगतिकता की गांधी हायजॅक करण्याचं कारस्थान? या प्रश्नाचं उत्तर ज्याचं त्याने शोधावं. तरीही मोदींना गांधी सोडता येत नाहीत, हे खरंय. चरखा कसा चालवतात हे त्यांना माहीत नाही. कारण मोदींच्या फोटोत दिसलाय, तसा तो एका हाताने चालवता येत नाही. तरीही त्यांना चरख्यासमोर पोझ देऊन झळकावं लागतं. यात मजबुरी कोणाची आहे? गांधीजींची मजबुरी कधीच नव्हती. गांधीजी तर मजबुतीचं प्रतीक आहे. मजबुरी असली तर ती मोदींची आहे. मजबुरी का नाम महात्मा गांधी नाही. मजबुरी का नाम नरेंद्र मोदी आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पद्मावत पाहण्यास गेलेल्या तरुणीवर बलात्कार

News Desk

तक्रार दिल्यानंतर परत शहरात फिरण्याची काय आवश्यकता? याचा अर्थ तुम्ही पब्लिसिटी स्टंट करत आहात- सतेज पाटील

News Desk

नगर दारूकांडातील बळींची संख्या सात वर

News Desk