HW News Marathi
संपादकीय

…म्हणून शेतक-यांना दूध रस्त्यावर ओतावे लागते

पूनम कुलकर्णी | राज्यात १६ जुलै २०१८ पासून दूध आंदोलनाला सुरुवात झाली. या आंदोलनात प्रमुख्याने गाईच्या दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान मिळावे अशी मागणी करण्यात आली. अद्याप या आंदोलनाची झळ तितकीशी जनसामान्यांना लागलेली नाही. परंतु माध्यमांवर दिसणा-या दृश्यांवर काही विद्यवानांनी दूध रस्त्यावर ओतू नका, अन्नाची नासाडी करु नका असे सल्ले सोशल मिडीयाद्वारे शेतक-यांना दिले. हे दूध डेअरी मध्ये दिले तर शेतक-यांना खरचं फायदा होतो का ? आकडेवारी पाहिली तर नक्कीच थक्क व्हायला होते…

दूध दरवाढ प्रामुख्याने गाईच्या दुधाकरीता मागण्यात आली आहे. गाईच्या दुधाला प्रति लिटर ५ रुपये महाराष्ट्र सरकारने अनुदान द्यावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन छेडले या आंदोलनाला सरकार दरबारी जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरु रहाणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे.

  • गाईच्या दूध दरात का झाली घसरण ?

महाराष्ट्रातील दूध उत्पादनातील ६० टक्के दूध हे दुग्धजन्य पदार्थ बनविण्यासाठी वापरण्यात येते, तर केवळ ४० टक्के दूध रोजच्या वापरात येते. ९ महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात गाईचे दुध २४ ते २७ रुपये लिटर दराने दुधसंघ दुधउत्पादकांकडून खरेदी करत होते. परंतु सध्या महाराष्ट्रात १७-१८ रुपये दर गाईच्या दुधाला दिला जात आहे. महाराष्ट्रात १.२४ करोड लिटर दूध दररोज सहकारी संस्था आणि खाजगी संस्थांच्या माध्यमातून एकत्रित केले जाते. यापैकी ६० टक्के दूध खाजगी तर ४० टक्के दूध सहकारी संस्थांच्या माध्यमातून गोळा केले जाते. आंतराष्ट्रीय बाजारपेठेत गेल्या ९ महिन्यात दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्याने भारतीय कंपन्यांना कमी नफा होऊ लागला. त्याचा थेट परीणाम दुधाच्या खरेदी दरावर झाला.

  • नॅशनल डेअरी बोर्डच्या आकडेवारी नुसार…

नॅशनल डेअरी बोर्डच्या आकडेवारीनुसार देशात दूध उत्पादनात महाराष्ट्राचा सातवा क्रमांक लागतो. तर उत्तर प्रदेश पहिल्या व गुजरात चौथ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात ६.३ टक्के, गुजरात ७.७ टक्के, उत्तरप्रदेश १७ टक्के दूध उत्पादन घेतले जाते. तरीही जून २०१८ च्या आकडेवारी नुसार गुजरात २९.५० रुपये प्रति लिटर, उत्तर प्रदेश २५.६० रुपये प्रति लिटर तर महाराष्ट्रात केवळ १८.५० रुपये प्रति लिटर दर दिला जातो. इतर राज्यातील दूध उत्पादकांच्या तुलनेत महाराष्ट्रातील दूध उत्पादन घेणारा शेतकरी प्रचंड तोट्यात असल्याचे पहायला मिळते. सरकारच्या नाकर्तेपणाचा थेट परीणाम शेतक-यांच्या उत्पादनावर आणि अर्थिक बजेटवर होत असल्याचे सध्या महाराष्ट्रात चित्र आहे.

  • महाराष्ट्रातले शेतकरी का आहेत तोट्यात ?

महाराष्ट्रातले दूध उत्पादक शेतकरी का आहेत तोट्यात हे जाणून घेण्यासाठी जरशी गाई पाळणा-या शंकर घोडके या शेतक-याशी बातचीत केल्या नंतर प्राप्त झालेली माहिती आवाक करणारी आहे. शंकर घोडके यांनी दिलेल्या माहिती नुसार जरशी गाईवर दरदिवशी ३००-३५० रुपये इतका खर्च होतो परंतु १८ रुपये लिटर प्रमाणे दूध विकल्यास दिवसाला केवळ २८० रुपये इतकेच पैसे मिळतात नफा नाही झाला तरी चालेल पण मिळालेल्या पैशांत गाईंचा खर्च देखील भागत नाही असे चित्र आहे.

तर एका भारतीय प्रजातीच्या गाईवर दरदिवशी १२० इतका खर्च येतो ही गाय किमान ३-४ लिटर दुध देते त्यातून मिळणारे उत्पन्न केवळ ७२-७५ रुपये इतके असते. त्यामुळे गाईसाठी लागणारे खाद्य तसेच औषधांचा खर्च जर दूध विक्रीतून निघत नसेल तर या आंदोलनात शेतक-यांनी दूध रस्त्यावर ओतले तर शेतक-यांचे काय चुकले असा सवाल शेतक-यांनी यावेळी एच डब्लू मराठी शी बोलताना उपस्थित केला.

  • बीफ बंदीमुळे गाई पाळणे अपरीहार्य

तोंड दाबून बुक्यांचा मार अशी एकूणच अवस्था महाराष्ट्रातील शेतक-यांची झालेली आहे. गाईंना जगविण्यासाठी लागणारे अनुदान सरकार देत नाही. गाईंवर होणारा खर्च आणि दूध दर यांचा ताळमेळ लागत नसल्यामुळे वयस्कर गाईंना कसायाला देखील देऊ शकत नाही. भाजप सरकारच्या काळात गोहत्या बंदी असल्यामुळे शेतक-यांना या गाई सांभाळणे अपरीहार्य झाले आहे. सरकारच्या नाकर्तपणा तसेच असंवेदनशील धोरणामुळे आज दूध उत्पादक शेतक-याला आज दूध महाराष्ट्रातील रस्त्यांवर ओतावे लागत आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महिलांची सुरक्षा नक्की आहे तरी काय ?

swarit

‘आधार’ला न्यायालयाचा आधार

News Desk

जिओ इन्स्टिट्यूटचा दर्जा एफटीआयआय (FTII) पेक्षा मोठा ?

swarit