HW News Marathi
संपादकीय

ठाकरे बंधू एकत्र आले तर…

पूनम कुलकर्णी | शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळात शिवसेना पक्षाचा महाराष्ट्रात प्रादेशिक राजकीय पक्ष म्हणून विस्तार झाला. परंतु सर्व काही अलबेल असताना सेनेला राजकारणात पुन्हा एकदा एका राजकीय फुटीचा सामना करावा लागला. स्वबळावर शिवसेना उभी केल्यानंतर कालांतराने बाळासाहेबांची प्रकृती सतत खालावत असल्यामुळे शिवसेनेला कार्यकारी अध्यक्षाची आवश्यकता होती. अशा वेळी बाळासाहेबांनी राजकारणात सक्रीय असलेल्या राज ठाकरे यांना संधी न देता कधीच राजकारणाचा भाग नसलेल्या उद्धव ठाकरे यांना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून घोषित केले. बाळासाहेबांनी पुत्र प्रेमापोटी घेतलेल्या निर्णयामुळे दुखावलेल्या राज ठाकरेंनी पक्षातून बंडखोरी करत १९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. महाराष्ट्राला नवनिर्माणाचे स्वप्न दाखवत एका नव्या राजकीय पक्षाची महाराष्ट्रात मुहूर्तमेढ रोवली गेली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर शिवसेना मनसे राजकीय पटलावर स्वतंत्र पद्धतीने लढणार हे महाराष्ट्रातील अनेकांना रुचणारे नव्हते. सेना मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनी दोन राजकीय पक्षांमधील वितृष्ट दूर व्हावे यासाठी प्रयत्न देखील केले. परंतु सत्तेच्या हव्यासापोठी दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढविणे पसंत केले. मनसेला निवडणुकीत घवघवित यश न मिळाल्यामुळे सर्वसामान्यांनी राज ठाकरे यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत देखील सेना मनसे युती होईल, अशी अनेकांना अपेक्षा होती परंतु मनसेच्या पडत्या काळात देखील उद्धव यांनी मनसेला टाळी देणे पसंत केले नाही. परंतु जनतेला आजही या दोन भावांनी एकत्र यावे अशी इच्छा आहे. त्यामुळे २०१९ च्या आगामी निवडणुकांमध्ये सेना-मनसेने एकत्र येऊन निवडणूक लढणार का? लढल्यास नक्की काय चित्र असेल.

  • पक्षातील नेत्यांचा श्रेयवाद…

आगामी २०१९ च्या निवडणुकांमध्ये उद्धव आणि राज यांना एकत्रित लढायचे असल्याचे मनसेला शिवसेनेत विलीन व्हावे लागेल. त्यामुळे मनसेतील नेत्यांना कायम दुय्यम स्थान मिळेल. म्हणजेच मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांसारख्या नेत्यांना मनसे सेनेत विलीन झाल्याच कधीही संजय राऊत यांसारख्या नेत्यांचा दर्जा मिळू शकणार नाही. यावर मनसेमधील नेते नक्कीच नाखुश असतील. जागावाटपावरुन देखील मनसेला नेहमी दुय्यम दर्जा मिळेल. त्यामुळे या बाबींचा विचार केल्यास दोन पक्षांचे विलनीकरण होणे तुर्तास अशक्य आहे.

  • उत्तम वक्तृत्वामुळे लोकप्रियता मिळेल…

उद्धव ठाकरे यांना वंशपरंपरेन जरी पक्ष अध्यक्ष पद मिळाले असले तरीही राज ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांची वक्तृत्व शैलीचा वारसा लाभला आहे. गर्दीचे लक्ष वेधणारा आवाज नसल्यामुळे बाळासाहेब आणि राज ठाकरे यांच्या भाषणांच्या तुलनेत उद्धव ठाकरे मागे पडल्याचे दिसून येते. राज ठाकरे यांचे भाषण म्हणजे विरोधकांवर थेट हल्लाच असतो. राज ठाकरे यांच्या भाषणाला युवकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. बहुतांशवेळा मनोरंजनापलिकडे फारसे काही हाती लागत नाही. मात्र अनेकदा खळखट्याकची भूमिका घेतल्यामुळे राज यांनी अनेकांना आपल्याकडे आकर्षित केले. त्यांच्या या भुमिकेमुळे अनेकदा ते टिकेचे धनी झालेत.

बाळासाहेबांची वक्तृत्वशैली उद्धव यांच्या भाषणात कुठेच जाणवत नाही. परंतु उद्धव ठाकरे यांचे भाषण गंभीर असले तरीही भाषणात मुद्देसुद विषयांची मांडणी असते. युतीनंतर अनेकदा उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना केल्याला वक्तव्याचा अभ्यास त्यांनी खरंच केला असेल का असा प्रश्न अनेकदा पडतो. अनेक मुद्यांवर उद्धव ठाकरे यांची शांत प्रतिक्रीया सुद्धा अनेकांना पेचात पाडणारी असते.

स्वभाव आणि निर्णय परस्पर विरोधाभासी असलेल्यामुळे यांची युती झाल्यास कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजेच या युतीची अवस्था एका दिशेने जाणा-या पण दोन विरुद्ध दिशेने खेचणा-या रेल्वे इंजिनसारखी असेल यात शंका नाही.

  • …मग उत्तराधिकारी कोण ?

असे म्हटले जाते इतिहासाची पुनरावृत्ती नेहमीच होते. या सिद्धांतानुसार सेना मनसे एकत्र झाल्यास सेनेचा उत्तराधिकारी कोण ? राज ठाकरे यांचे सुपुत्र की युवासेना अध्यक्ष अदित्य ठाकरे. आगामी २०१९ च्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आपल्या मुलांना राजकारणात उतरविणार असल्याची चिन्हे आहेत. युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे हे राजकारणात सक्रीय असल्यामुळे आगामी काळात शिवसेनेचा उत्तराधिकारी अदित्य ठाकरे असतील ही शक्यता नाकारता येत नाही.

  • राजकारणावर काय होईल परीणाम…

२०१४ साली विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला १९.८० टक्के इतक्या मताधिक्याने ६३ जागा मिळाल्या. तर मनसे ४.१८ टक्के इतके मताधिक्य मिळवत अवघ्या १ जागेवर विजयी झाले. या आकड्यांवरून अनुमान काढल्यास या आकडेवारीनुसार राज आणि उद्धव यांनी एकत्र निवडणूक लढविल्यास जवळपास महाराष्ट्रातील ९० जागांवर विजय प्राप्त होऊ शकतो. म्हणजेच राज उद्धव एकत्र आले तरीही महाराष्ट्रात एकहाती सत्ता प्राप्त करु शकणार नाहीत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विरोधकांनी प्रभावी नेतृत्व दिल्यास भारत सत्ता बदलास इच्छूक | HW न्यूज सर्वेक्षण

swarit

मुंबईत २६ जुलैची पुनारावृत्ती होऊ शकते ?

swarit

भावी मुख्यमंत्री शिवसेनेचाच ?

swarit