पूनम कुलकर्णी | महाराष्ट्रात गेल्या २५ वर्षांहून अधिक काळापासून भाजप आणि शिवसेनेची युती आहे. युतीच्या संख्या बळाच्या आधारावर २०१४ साली राज्यात भाजपाने सत्ता प्रस्थापित केली. परंतु या दोन पक्षांची युती असली आणि संयुक्त सरकार असले तरीही सरकार सत्तेत आल्यापासून दोन्ही पक्षातील बड्या नेत्यांमध्ये मत भिन्नता असल्याचे वारंवार पहायला मिळते. पालघर लोकसभेच्या मे २०१८ ला झालेल्या पोटनिवडणुकीत दिवंगत भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या जागेवर त्यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांना लोकसभेची सीट देण्यावरुन महाराष्ट्रातील राजकारण तापल्याचे पहायला मिळाले होते. सत्तेत आल्यापासून अनेकदा दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकमेकांवर अनेक आरोप प्रत्यारोप केले होते. सेना भाजपात असलेल्या अंतर्गत वादावरुन अनेकदा शिवसेनेचे नेते सत्तेत असताना मिळालेल्या मंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची धमकी देखील भाजपाला देतात. सध्या राज्यात शिवसेनेचे ६३ आमदार भाजपाचे १२२ आमदार असे संख्यांबळ आहे. जास्त आमदार भाजपाचे आहेत त्यामुळे महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपाचे आहेत. विधानसभेच्या २८८ जागांपैकी १४५ आमदार ज्या पक्षाकडे आहेत त्या पक्षाला सत्ता प्रस्थापित करता येते. शिवसेनेच्या पाठबळामुळे सध्या महाराष्ट्रात युतीचे सरकार आहे.
२०१४ च्या निवडणुकीनंतर मंत्र्यांचे राजीनामे असोत किंवा अजून काही बाबी त्यामुळे मधल्या काळात अनेकदा सेना भाजपचे बीनबनावर आल्याच्या वावड्या सोशल मिडीयावर उठल्या होत्या. परंतु २५ वर्षांची युती तुटल्यानंतर निवडणुक स्वतंत्र लढूनही सत्ता स्थापनेसाठी २०१४ साली सेना भाजपने पुन्हा युती केली त्यामुळे सध्या सुरु असलेल्या सेना भाजपाच्या लुटूपुटू च्या भांडणाचे विश्लेषण करने केवळ निर्थक ठरेल. मे २०१८ ला झालेल्या पालघर पोट निवडणुकीनंतर सेना भाजपातील वादाने टोक गाठले होते. तेव्हा युती तुटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना अध्यक्ष युती तोडणार असे राजकीय जाणकारांनी ग्राह्य धरले होते. परंतु शिवसेनेच्या अध्यक्ष महोदयांनी मात्र यावर बोलणे टाळले तसेच हा शिवसेनेचा पराजय नसून निसटता विजय असल्याचे घोषित केले. त्यानंतर सेना भाजपाचे अंतर्गत वाद मिटविण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबईत येऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे जाऊन भेट घेतली. यानंतर युती मध्ये सर्व अलबेल होईल अशी अपेक्षा असलेल्यांचा त्यानंतर दणदणीत अपेक्षाभंग झाला. त्यावेळी खासदार संजय राऊत यांनी एकला चलो चा नारा दिल्यामुळे पुन्हा एकदा अभंग युती दुभंगण्याची शक्यता दिसून आली.
सध्या राजकीय पक्ष आगामी निवडणुकीच्या तयारीत असल्यामुळे अमित शहा यांच्या महाराष्ट्र वा-या वाढल्याचे चित्र आहे. शिवसेनेला सोबत घेण्याची तयारी असल्याची भाषा भाजपा नेते करत असले तरी स्वबळावर निवडणूक जिंकण्याचा आराखडा भाजपाने सध्या तयार केल्याचे पहायला मिळत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी मुंबई दौऱ्यात प्रदेश निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन नेत्यांना तसेच कार्यकर्त्यांना केले आहे. मित्रपक्ष सोबत आले तर उत्तमच, पण नाही आले तरी सारखेच मन लावून काम करा.पक्षाची ताकद वाढविण्यासाठी दिलेली जबाबदारी चोख पार पाडा, अशा सूचना देतानाच आपण दोन महिन्यांनी पुन्हा येऊ, असेही सांगितले आहे. यावेळी अमित शहा यांनी भाजप कार्यकर्त्यांना सांगितलेल्या २३ सुत्री कार्यक्रमांमुळे भाजप सध्या एकला चलो रे च्या भूमिकेत असल्याचे पहायला मिळत आहे.
तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सामना या मुखपत्रासाठी दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्राच्या राजकारणावर बोलताना भाजपावर चौफेर टिका केली राजकारणातील चाणक्यनीती म्हणजेच साम-दाम-दंड-भेद यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या एकाधिकारशाहीला लक्ष्य केले आहे. तसेच, निवडणुका जिंकण्यासाठी आता नीतिमत्तेची आवशक्यता उरली आहे काय ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पालघर निवडणुकांवेळी मुख्यमंत्र्यांनी चाणक्यनीती समजावून सांगितली होती. साम-दाम-दंड-भेद यांचा वापर करुन जिंकणे हीच नीती असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या चाणक्यनीतीचा खरपूस समाचार घेतला. केवळ सरकारच्या बाजूने बोलणारे, सरकारला समर्थन करणारे देशप्रेमी आणि सरकारविरुद्ध बोलणारे देशद्रोही, अशी नवी नीती देशात उदयास आली आहे. जर, सरकारविरुद्ध बोलल्याने आम्ही देशद्रोही ठरत असू तर आम्हीही देशद्रोही आहोतच. कारण, आम्हीही सरकारी धोरणांवर टीका करतो .तसेच शिवसेना भारतीय जनतेचा मित्र आहे कोणत्याही पक्षाचा मित्र नाही असेही ते आवर्जून म्हणाले.
आगामी २०१९ च्या निवडणुकीत सेना भाजपाच्या युतीचे नक्की काय चित्र असेल? तसेच आपल्या विधानावरुन सतत कोलांट्या उड्या मारणारे दोन्ही पक्ष २०१९ साली स्वंतत्र निवडणुक लढवून पुन्हा एकदा आपली ताकत आजमावून सत्ता स्थापनेसाठी एकत्र येतील का हे पहाण येत्या काळात औत्सुक्याचे ठरणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.