HW News Marathi
मनोरंजन

आचार्य अत्रे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व

गौरी टिळेकर | आचार्य प्रल्हाद केशव अत्रे ! महाराष्ट्रातील अत्यंत नावाजलेले निर्भीड लेखक, पत्रकार, संपादक, कवी, नाटककार, हिंदी-मराठी चित्रपटांचे निर्माते, राजकारणी व प्रभावी वक्ते ! संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदान अत्यंत लक्षणीय आहे. आपल्या धारदार लेखणीने – वाणीने त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आपले मोलाचे योगदान दिले. अत्र्यांची भाषणे आणि अग्रलेख विशेष लोकप्रिय आणि प्रभावी आहेत.

अत्र्यांची निर्भीड पत्रकारिता आणि वक्तृत्त्व हे त्यांचे विशेष. त्यांच्यातील स्पष्टवक्त्या पत्रकाराने आणि लेखकाने कधीही कुणाची भीती बाळगली नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या दरम्यान त्यांनी लिहिलेले अग्रलेख आणि त्यांची भाषणे म्हणजे त्यांच्या ह्या निर्भीड आणि स्पष्टवक्तेपणाचे उत्तम उदाहरण आहेत. अत्र्यांचे समाजातील प्रत्येक लहान-मोठ्या महत्त्वाच्या गोष्टींकडे विशेष लक्ष असे. त्यांनी सर्व सामान्यांच्या समस्या समजून घेऊन त्या समस्या सोडविण्याचे आपल्या परीने अफाट प्रयत्न केले. निवडणुकीच्या रिंगणात दोन वेळा विधानसभेवर आमदार म्हणून ते निवडून आले. तिथेही त्यांनी विविध सामाजिक-राजकीय प्रश्नांवर आवाज उठवला.

पुणे जिल्ह्यातील सासवडजवळच्या क-हा नदीच्या काठावर वसलेल्या कोडीत या गावी १३ ऑगस्ट १८९८ साली आचार्य अत्रेंचा जन्म झाला. बापू हे अत्र्यांचे लहानपणचे टोपणनाव. त्यांचे घराणे शिवकालीन ऐतिहासिक घराण्यांपैकी एक वतनदार घराणे होते.अत्र्यांचे प्राथमिक शिक्षण सासवड इथे झाले. सासवड आणि परिसरातील सामाजिक-सांस्कृतिक वातावरण, ऐतिहासिक पार्श्वभूमी त्यांच्या बालपणाच्या जडणघडणीस अत्यंत उपयोगी ठरले.

दिग्गजांचा सहवास :

अत्र्यांना फार कमी वयात अतिशय दिग्गज व्यक्तिमत्त्वांचा सहवास लाभला. भावे हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला तेव्हा तिथे काशिनाथ नारायण पटवर्धन, चिपळूणकर, पुरुषोत्तम लेले, विद्याधर वामन भिडे असे काही दिग्गज लेखक अत्र्यांना शिक्षक म्हणून होते. त्या वातावरणामुळेच अत्र्यांना रंगभूमीविषयी आवड निर्माण झाली. शालेय वयातच त्यांना राम गणेश गडकरी, बालकवी, तात्यासाहेब कोल्हटकर, गोविंद बल्लाळ देवल, टिळक अशा दिग्गज साहित्यिकांचा सहवास लाभला. रंगभूमी आणि सिनेमा क्षेत्रातील कामगिरी महाविद्यालयीन काळातच राम गणेश गडकरी या थोर नाटककारांचा सहवास त्यांना लाभल्यामुळे त्यांना नाट्यलेखनकलेचे रहस्यही उमगले. नाटकांच्या बरोबरीने त्यांनी विनोदी लेखनही भरपूर केले. तो मी नव्हेच, मोरूची मावशी, बुवा तेथे बाया, मी मंत्री झालो, डॉक्टर लागू, प्रीतिसंगम, ब्रम्हचारी ही त्यांची नाटके मराठी रंगभूमीवर अजरामर झाली. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची कला त्यांच्या नाटकांत होती. १९४० साली मुंबईत स्थायिक झाल्यानंतर त्यांनी स्वत:चीच ‘अत्रे पिक्चर्स’ ही कंपनी सुरू केली. ‘श्यामची आई’, ‘महात्मा फुले’ असे काही दर्जेदार चित्रपट त्यांनी निर्माण केले. या चित्रपटांना ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले “सुवर्ण कमळ” मिळाले होते.

अत्र्यांची काही प्रसिद्ध नाटके :

घराबाहेर (१९३४), उद्याचा संसार (१९३६), पराचा कावळा (१९३८), वन्दे मातरम (१९३७), मी उभा आहे(१९३९), जग काय म्हणेल(१९४०), पाणिग्रहण(१९४६), कवडीचुंबक(१९५०), आणि शेवटच्या काळात (१९६२ ते १९६९) ‘तो मी नव्हेच’ (१९६२).

अत्र्यांचे विनोदी कथासंग्रह :

साखरपुडा (१९४२), ब्रॅंन्डीची बाटली (१९४४), वामकुक्षी (१९४९) हे त्यांचे विनोदी कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांची चांगुणा (१९५४)

अत्र्यांची प्रसिद्ध काव्य :

गीतगंगा, झेंडूची फुले

शिक्षण क्षेत्रातील कार्यकाळ

अत्र्यांनी शिक्षण क्षेत्रातही बरेच काम केले. पुण्यातील कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत अत्रे तब्बल १८ वर्षे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी त्यांच्या या कार्यकाळात शाळेचा मोठा विस्तार केला. ही शाळाच अत्र्यांच्या नाट्यलेखनाची, समाजसेवेची प्रयोगशाळा ठरली. जातिभेदाविरुद्ध बंड करण्याचा विचार त्यांना इथूनच मिळाला. पुढे त्यांनी पुण्यात राजा धनराज गिरजी व आगरकर हायस्कूल या शाळांची स्थापना केली. अत्र्यांनी प्राथमिक वर्गांसाठी ‘नवयुग वाचनमाला’ व माध्यमिक वर्गांसाठी ‘अरुण वाचनमाला’ ह्या दोन क्रमिक पुस्तकमाला लिहिल्या.

मासिके आणि साप्ताहिकांचे संपादन

अत्र्यांनी अनेक वृत्तपत्रे, मासिके आणि साप्ताहिके सुरु केली. १९२३ साली त्यांनी ‘अध्यापन’ हे मासिक सुरू केले. त्यानंतर १९२६साली ‘रत्‍नाकर’ आणि पुढे १९२९ साली ‘मनोरमा’ हि मासिके काढली. २१ जानेवारी १९४० ला अत्र्यांनी नवयुग हे वृत्तपत्र सुरु केले. त्यावेळी अत्रे काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे काँग्रेसची विचारसरणी या वृत्तपत्रातून स्वातंत्र्य मिळेपर्यंत मांडली जात होती. १९५६ रोजी त्यांनी ‘मराठा’ हे दैनिक सुरू केले. ते त्यांच्या हयातीनंतरही काही काळ प्रकाशित होत होते.

‘मी कसा झालो’ (१९५३) आणि ‘कर्हेचे पाणी’ हे अत्र्यांचे आत्मचरित्र सहा खंडात प्रसिद्ध झाले. इतक्या विविध क्षेत्रात, विविध पातळ्यांवर काम करून त्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपला एक वेगळा ठसा उमटवला. अत्र्यांना ‘विष्णुदास भावे पुरस्कारासह’ अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. ज्या पुण्याने अत्र्यांना खऱ्या अर्थाने घडवले त्याच पुण्यातील अनेक संस्था या आज आचार्य अत्रेंच्या नावाने पुरस्कार देतात. त्यांच्यासारख्या व्यक्तीमत्ववामुळे महाराष्ट्र अधिक संपन्न झाला. महाराष्ट्राला त्यांच्या या अमूल्य कामगिरीचा विसर कधीही पडणार नाही.असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Vijay Diwas :भारत – पाक युद्धाची पार्श्वभूमी

News Desk

मराठी कलावंतांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

Aprna

तिन्ही दलांमध्ये समन्वय साधण्यासाठी ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ पदाची स्थापना

News Desk