HW News Marathi
मनोरंजन

थंडावा देणारा ताडगोळा

उन्हाळा सुरु झाला की, बहुधा सगळ्यांनाच थंडगार पेयांचा, आइस्क्रीमचा मोह अनावर होतो आणि आशा मोहाच्या आहारी गेल्यास हमखास सर्दी – खोकल्याचा त्रास होतो. अशा वेळी आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होणार नाही, याची काळजी घेत शरीराचा दाह कमी करणारे आणि जीभेचे चोचलेही पुरवणारे फळ म्हणजे ताडगोळा.

उन्हाचा दाह कमी करण्यासाठी उसाचा रस, लिंबू सरबत, कैरीच पन्हे, शहाळे, असे अनेक पर्याय उन्हाळ्यात लोक निवडतात. परंतु सध्या मुंबईत उन्हाचा दाह वाढताना मुंबईकर ताडगोळ्यावर ताव मारताना पहायला मिळत आहे. पाल्म किंवा ताडाच्या झाडाला येणारे फळ म्हणजे ताडगोळा हे होय. याचे शास्त्रीय नाव बोरासस फ्लॅबिलिफर असे आहे. हे फळ महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. समुद्रकिनारी प्रामुख्याने ताडाची लागवड केली जाते. बंगालमध्ये‘ताल’, तेलगूमध्ये ‘ताती मुंजलू’, तामिळमध्ये ‘नुन्गू’, इंग्रजीमध्ये ‘आइस अॅंपल’ तर हिंदीमध्ये ‘तारी’ या नावाने ताड ओळखले जाते. या झाडाची पाने सदाबहार हिरवीगार आणि आकाराने मोठी असतात.

मे महिना सुरु झाल्यापासून गरमीचे प्रमाण अधिक वाढल्यामुळे शहरातल्या बाजारपेठेत अनेक ठिकाणी ताडगोळ्याच्या विक्रीला उधान आले आहे. ताडगोळे हे उष्णतेचा दाह कमी करतातच सोबत ते आरोग्यासाठी खूप लाभदायी असतात. ताडगोळ्याचे कठीण आवरण चाकूने किंवा कोयत्याने फोडून त्यातून नरम व गोड पाणीदार फळ काढले जाते. शाहळ्यासारख्या दिसणा-या कठीण आवरणात दोन-तीन ताडगोळे असतात. एकाही ताडगोळ्याला धक्का लागणार नाही, याची काळजी घेत ते बाहेर काढणे, हे कौशल्याचे काम असते.

परंतु एकदा हा ताडगोळा आवरणातून बाहेर काढला की, फार काळ टिकत नाही. काही वेळाने त्याची साल काळी पडते आणि गर आंबट होतो. या ताज्या ताडगोळ्यावर असलेली फिकट बदामी रंगाची साल हळुवार हाताने काढली की, आत अर्धपारदर्शक रंगाचा गर असतो. हा गर एकदम कोवळा असतो तेव्हा त्याच्या आतमध्ये चमचाभर गोड पाणी असते. ताडगोळ्याच्या गराची चव कोवळ्या शहाळ्यासारखी असते. ताडगोळा हळुवार सोलून खाण्यात वेगळीच मजा असते. कोवळा ताडगोळा खायला चवदार लागतो. ताडगोळा जून झाला की, त्यातले पाणी नाहीसे होते. शिवाय, गराची चवही बदलते.

ताडगोळा हे फळ पाणीदार असून ते कापायची गरज भासत नाही. हे फळ थंड असल्यामुळे उन्हाळ्यात खाणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. ताडगोळ्यात खनिज, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस आणि ए, बी, सी या जीवनसत्त्वांचा भरपूर साठा असल्यामुळे एकंदरीतच शरीराला ते अतिशय उपयुक्त ठरते. नाजूक दिसणार आणि चवदार असणार हे फळ उन्हाळ्यात बाजारपेठेत विक्रीसाठी ठेवलेले दिसून येते. रणरणत्या उन्हात मुंबईत अनेक मुंबईकर या ताडगोळ्यावर मनसोक्त ताव मारताना दिसून येतात. कोकणातून येणा-या आणि बाजारपेठेत सहज उपलब्ध होणा-या या फळाची किंमत मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडणारी असल्यामुळे सर्वच स्तरातील लोकांची उन्हाळ्यात ताडगोळ्याला विषेश पसंदी असलेली पहायला मिळते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तिन्ही दलांमध्ये समन्वय साधण्यासाठी ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ पदाची स्थापना

News Desk

संस्कृतभारतीने आंतरराष्ट्रीय संस्कृत लघुपट महोत्सव २०२३ ची केली घोषणा

News Desk

सरकारने आमचा अपमान केला – प्रसाद ओक

swarit