HW News Marathi
मनोरंजन

गुरू ठाकूरने ‘कृतांत’साठी गायले गाणे

मुंबई | मागील काही वर्षांपासून गीतकार गुरू ठाकूर हे नाव केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर भारताबाहेरही चांगलंच गाजत आहे. गुरूच्या लेखणीतून अवतरलेली मराठमोळी गाणी सातासमुद्रापार रसिकांचं मनोरंजन करीत आहेत. गुरूने लिहिलेलं एखादं गाणं अमेरिकेतील रेडिओ स्टेशनवर वाजणं आणि तिथल्या मराठी बांधवांनी ताल धरणं ही मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब आहे. शब्दांवर प्रभुत्व असल्याने रसिकांचा आवडता गीतकार बनलेला गुरू आता पार्श्वगायनाकडे वळला आहे. ‘कृतांत’ या आगामी मराठी सिनेमासाठी गुरूने पार्श्वगायन केलं आहे.

मुख्य भूमिकेतील अभिनेता संदिप कुलकर्णाच्या काहीशा वेगळया गेटअपमुळे चर्चेत आलेला ‘कृतांत’ हा आगामी सिनेमा गुरू ठाकूरच्या पार्श्वगायनामुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. ‘रेनरोज फिल्म्स’च्या बॅनरखाली मिहीर शाह यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन दत्ता मोहन भंडारे यांनी केलं आहे. फर्स्ट लूकवरून ‘कृतांत’ हा काहीसं वेगळं कथानक असलेला सिनेमा असल्याची ग्वाही देणा-या या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादलेखनही दत्ता भंडारे यांनीच केलं आहे. गीतलेखनापासून पटकथालेखनापर्यंत लेखनाच्या सर्वच बाजू शैलीदारपणे मांडणा-या गुरूने या सिनेमाच्या निमित्ताने प्रथमच एखाद्या सिनेमातील नवं कोरं गीत गायलं आहे.

कोणत्याही गीतकारासाठी गायन ही नवखी गोष्ट नसतेच. काव्यवाचनासाठी जो लहेजा लागतो त्या आधारे गीतकार सहजपणे गायनही करू शकतो. याच न्यायाने गुरूनेही यापूर्वा स्टेजवर परफॉर्म करत एखाद दुसरं गीत गात रसिकांची दाद मिळवली आहे, पण सिनेमासाठी पार्श्वगायन करण्याची गुरूची ही पहिलीच वेळ आहे. या सिनेमाचं प्रमोशनल साँग गुरूच्या आवाजात ध्वनीमुद्रीत करण्यात आलं आहे. गुरूने स्वतःच हे गीत लिहिलं आहे. “थांब, किंचित थांब…’’ असा मुखडा असलेल्या या गीताला संगीतकार विजय नारायण गवंडे यांनी संगीत दिलं आहे. पार्श्वगायनाचा हा पहिला वहिला अनुभव बरंच काही शिकवणारा असल्याची भावना नम्रपणे व्यक्त करीत गुरू म्हणाला की, ‘कृतांत’ या चित्रपटाचा विषय खूपच वेगळा आहे. अशा प्रकारच्या सिनेमाच्या निमित्ताने पार्श्वगायनात पदार्पण करण्याची संधी मिळाली हे खूप महत्त्वाचं मानतो. आम्ही हे ठरवून केलं नसून, प्रथम मी गीतलेखन केलं आणि नंतर अगदी सहजपणे पार्श्वगायन करण्याचाही योग जुळून आला. रसिकांना हे गीत नक्कीच आवडेल अशी आशाही गुरूने व्यक्त केली.

मराठीसह हिंदीतही विविधांगी भूमिका साकारणा-या संदिप कुलकर्णीच्या वेगळया लूकमुळे ‘कृतांत’बाबत उत्सुकता वाढलेली असताना गुरू ठाकूरच्या आवाजातील गीतही ऐकायला मिळणार असल्याने चित्रपट चाहत्यांसाठी या सिनेमाच्या निमित्ताने दुग्धशर्करा योगच जुळून आल्याची भावना दिग्दर्शक दत्ता भंडारे यांनी व्यक्त केली आहे. ‘कृतांत’ची कथा वर्तमान काळातील लाईफस्टाइलवर भाष्य करणारी आहे. जगण्याच्या तत्त्वज्ञानाची आजच्या जीवनशैलीशी अचूक सांगड घालत दत्ता भंडारे यांनी एक असं कथानक लिहिलं आहे, जे आजच्या पिढीतील सर्वांनाच आपलं प्रतिबिंब दाखवणारं ठरेल. आजच्या धकाधकीच्या, स्पर्धेच्या, इंटरनेटच्या आणि नातेसंबंधांपासून दूर नेणा-या व्यावहारिक जीवनातील तात्त्विकतेचा संबंध या सिनेमात अधोरेखित करण्यात आला आहे. या चित्रपटात संदिप कुलकर्णा, सुयोग गो-हे, विद्या करंजीकर, सायली पाटील, वैष्णवी पटवर्धन यांच्या भूमिका आहेत. कॅमेरामन विजय मिश्रा यांनी ‘कृतांत’चं छायालेखन केलं असून, दत्ताराम लोंढे यांनी कार्यकारी निर्मात्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“शेतकऱ्यांनी हे स्वातंत्र्य लढून मिळविलं, भीक मागून नाही!”, राऊतांचा कंगना-गोखलेंना टोला

News Desk

ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे काळाच्या पडद्या आड

News Desk

“महाराजांचा असा चुकीचा इतिहास समोर आणत असाल तर याद राखा” संभाजीराजेंचा निर्माते आणि दिग्दर्शकांना इशारा

Aprna