HW News Marathi
मनोरंजन

व्रत हरतालिकेचे

“सखी पार्वती, तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे. अखंड सौभाग्य लाभू दे”

गौरी टिळेकर | गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका असे म्हणतात. हरिता म्हणजे जीला नेले ती, आणि आलि म्हणजे सखी. देवी पार्वती शंकरासाठी केलेल्या तपश्चर्येला आपापल्या सखीला घेऊन गेली म्हणून पार्वतीला ‘हरितालिका’ असे म्हणतात. आपले सौभाग्य अखंड राहावे यासाठी हिंदू कुमारिका आणि सुहासिनी हरतालिकेचे व्रत केले करतात. श्रावण शुद्ध तृतीयेला सुवर्णगौरी (मधुश्रावणिका), श्रावण कृष्ण तृतीयेला कज्‍जली गौरी आणि भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिका ही व्रते करून सौभाग्यवती स्त्रियांनी अशी तीनदा गौरी पूजा करावी, असे शास्त्र आहे. दक्षिण भारतातदेखील शंकरासारखा पती आपल्यालाही मिळावा म्हणून अनेक कुमारिका हे व्रत करतात. तमिळनाडूमध्ये माघ शुद्ध द्वितीयेपासून तीन दिवस गौरी उत्सव चालतो. गुजरात आणि बंगालमध्ये मात्र हरितालिका नसते.

हरतालिकेची कथा

हिमालयाचा राजा हिमवान याची पार्वती ही कन्या. पार्वती उपवर झाली. एकदा नारदमुनी हिमवानाकडे आले आणि त्याला म्हणाले, “हे राजा हिमवान तुझ्या या सुस्वरुप मुलीला मागणी घालण्यासाठी भगवान विष्णूंनी मला तुझ्याकडे पाठविले आहे.” ते ऐकून राजा हिमवानाला आनंद झाला. पार्वतीने मात्र मनोमन शंकराला वरले होते. परंतु त्यावेळी हे प्रत्यक्ष आपल्या पित्याला सांगण्याचे धैर्य पार्वतीला झाले नाही. तिने आपल्या मैत्रिणींमार्फत आपल्या पित्याला निरोप पाठवला की, “तुम्ही जर माझा विवाह दुसऱ्या कोणाबरोबरही करून दिलात तर मी प्राण त्याग करेन.”

त्यानंतर पार्वती आपल्या सखींसह अरण्यात जाऊन तिने घोर तपश्चर्या केली. नदीकाठी वाळूचे शिवलिंग तयार करून ती त्याची पूजा करू लागली. प्रथम ती फक्त झाडाची कोवळी पाने खाऊन राहत होती काही काळाने तिने तेही सोडून दिले. यावरूनच पार्वतीला “अपर्णा’ असे नाव पडले. तिच्या तपश्‍चर्येने भगवान श्रीशिवशंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला वर मागायला सांगितले. तेव्हा पार्वती म्हणाली, “तुम्ही जर माझ्या तपश्‍चर्येमुळे खरोखर प्रसन्न झाला असाल, तर माझे पती व्हा.” यावर शंकराने “तथास्तु’ म्हटले. पार्वतीचा शोध घेत हिमवान त्या अरण्यात आले तेव्हा पार्वतीने आपला निश्चय सांगितला. पार्वतीची श्रद्धा पाहून हिमवानाने तिचा विवाह भगवान श्री शंकराशी करून दिला. पार्वतीच्या शंकरावरील निष्ठेमुळे आणि प्रेमामुळे शंकराला ‘पार्वतीपती’ असे नाव पडले.

हरतालिका पूजन

हरतालिकेच्या दिवशी कुमारिका व सुहासिनी सुवासिक तेल लावून स्नान करतात. स्नान केल्यानंतर एका स्वच्छ जागी चौरंग ठेऊन त्याभोवती रांगोळी काढतात. त्यानंतर चौरंगाला चारही बाजूंनी केळीच्या खांबांनी सुशोभित करून त्यावर वाळू आणून पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापित करतात. उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडतात आणि समोर पाच विडे मांडून तेथे सुपारी, खारीक, बदाम, नाणे, फळ ठेवतात. धूप-दीप, नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री आणि सुगंधित फुले वाहून हरतालिकेची पूजा केली जाते. पार्वतीने भगवान शंकराशी लग्न करण्यासाठी हे व्रत केले होते, असे म्हटले जाते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अबू धाबीत पार पडला दिमाखदार गणेशोत्सव

News Desk

अभिनेता शहारूख खानची मुलगी रँम्पवर

News Desk

लोककला जिवंत ठेवण्यासाठी अनोखा उपक्रम

News Desk