मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतचा आगामी सिनेमा ‘क्वीन ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ वादात सापडला आहे. ‘मणिकर्णिका’मध्ये काही ऐतिहासिक घटना चुकीच्या पध्दतीने दाखविण्यात आल्याचा आरोप करणी सेनेने केला आहे. त्याचबरोबर या सिनेमात झाशीच्या राणीचे एक नृत्य आहे, जे अत्यंत चुकीचे आहे, असे सेनेने म्हटले आहे. या गंभीर मुद्दयावरून कंगनाने माफी मागावी, अशी मागणी करणी सेनेने केली होती. परंतु करणी सेनेने कंगनाच्या मुंबईतील घराबाहेर घेराव घातला. माफी मागण्यावरून कंगना भडकली.
‘मी कुणाचीही माफी मागणार नाही. माझी चूक असेपर्यंत मी कुणाचीही माफी मागत नाही. माझ्या चित्रपटात काहीही चुकीचे नाही. याबद्दल आम्ही सर्वांनाच आश्वस्त केले आहे. करणी सेनेनेही या चित्रपटाला सहकार्य केले पाहिजे. फुकटचा माज मला कुणीही दाखवू नये. मी इथे कुणाची माफी मागण्यासाठी नाही,’ असे कंगनाने म्हटले आहे.
हा सिनेमा २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. परंतु, सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी करणी सेनेने घेतलेल्या आक्षेपामुळे मोठा वादळ निर्माण झाले होते. मुंबई करणी सेनेने कंगनाला धमकी दिल्यानंतर तिच्या घरासमोर पोलिस तैनात करण्यात आले. आज (२४ जानेवारी) सकाळी करणी सेनेने कंगनाला माफी मागितली नाही तर घराबाहेर आंदोलन करणार’ अस धमकी वजा इशारा दिला होता. परंतु पोलिसांनी आंदोलन करण्यास परवानगी नाकारली आहे. करणी सेनेने आंदोलन करत कायदे तोडण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे मुंबई पोलिसांनी सांगितले.
उल्लेखनीय म्हणजे, दोन दिवसांपूर्वी जुहू पोलिसांनी कोर्टाच्या आदेशानंतर करणी सेनेच्या सात सदस्यांवर तडीपारीची कारवाई केली आहे. हा सिनेमा प्रदर्शित होईपर्यंत या सात जणांना शहरात प्रवेश करण्यावर बंदी घातली आहे. तसेच राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय महासचिव आनंदसिंग ठोके यांनी मात्र, आपल्याला ‘मणिकर्णिका‘ या सिनेमावर कोणताही आक्षेप नसल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु कंगनाने करणी सेनेबद्दल वापरलेल्या ‘धुळीस मिळवून टाकेन’ या वाक्यावर आक्षेप असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबद्दल कंगना आपली माफी मागणार नाही तेव्हापर्यंत तिच्याविरुद्ध आंदोलन करणार असल्याचे करणी सेनेने म्हटले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.