HW News Marathi
मनोरंजन

डेक्कन क्वीन व पंचवटी एक्सप्रेसमध्ये फिरते ग्रंथालय

मुंबई | भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी, दि. १५ ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यात वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. गेल्या ३ वर्षांत या दिवसाला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. यंदाच्या वर्षापासून रेल्वेमध्ये लायब्ररी ऑन व्हिल्सची (फिरते ग्रंथालय) अभिनव संकल्पना सुरु करण्यात येत असून, याचा शुभारंभ १५ ऑक्टोबर पासून होणार आहे. मध्ये रेल्वेच्या डेक्कन क्वीन व पंचवटी एक्सप्रेस या दोन गाडयांमध्ये रेल्वेच्या सहकार्याने हा उपक्रम सुरु होत असून प्रवाश्यांना आता प्रवासातच वाचनांचा आनंद मिळणार आहे. अशी माहिती राज्याचे मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी एका पत्रकाद्वारे दिली.

मध्य रेल्वेच्या डेक्कन क्वीन (पुणे-मुंबई-पुणे) आणि पंचवटी एक्स्प्रेस (मनमाड-मुंबई-मनमाड) या दोन गाड्यांमध्ये लायब्ररी ऑन व्हिल्सचा (फिरते ग्रंथालय) उपक्रम सुरु होत असून, दि. १५ ऑक्टोबर, २०१८ रोजी रेल्वे मंत्रालयाच्या सहकार्याने या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन होत आहे. दि. १५ ऑक्टोबरपासून या दोन्ही रेल्वे गाड्यांमधील मासिक पासधारकांसाठी आरक्षित असलेल्या डब्यांमध्ये मराठी भाषा विभागाच्या राज्य मराठी विकास संस्थेने नेमलेले वाचनदूत प्रवाशांना विनाशुल्क वाचनसेवा देण्यास सुरुवात करणार आहेत, ही माहिती विनोद तावडे यांनी दिली. संबंधित प्रवाशांनी या उपक्रमास सुयोग्य प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही तावडे यांनी केले. १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी मुंबई सीएसटीएम मधून सायंकाळी ५.१० मिनिटांनी पुण्याला जाणारी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस आणि ६.१५ मिनिटांनी सीएसटीएम वरुन नाशिककडे जाणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसमध्ये ही वाचन सेवा सुरु होणार आहे.

पुस्तकांच्या गावी, भिलार येथेही वाचनध्यास या सलग वाचनाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वाचन प्रेरणा दिनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार दि. १३ व रविवार दि. १४ ऑक्टोबर या दोन दिवसांत ७५ वाचक, आपल्या आवडत्या पुस्तक-घरात एकूण १२ तास पुस्तक-वाचन करणार आहेत. संगणक अभियंते, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, एस. टी. वाहक अशा विविध प्रकारचे चोखंदळ वाचक सलग वाचनासाठी भिलारला आवर्जून येणार आहेत. भिलार येथेच ‘पाऊसवेळा’ हा साहित्यिक-सांगीतिक कार्यक्रमही दि. १४ रोजी सायं. ५.०० वा. योजण्यात आला आहे. या कार्यक्रमात डॉ. वंदना बोकिल आणि अपर्णा केळकर यांसह दर्जेदार कलाकार आपल्या गायन व अभिवाचनाच्या माध्यमातून ‘मराठीतील नव्या-जुन्या साहित्यिकांच्या शब्दांतून झरणाऱ्या’ पावसाबद्दलचे सादरीकरण करणार आहेत.

राज्य मराठी विकास संस्थेच्या सहकार्याने आणि ग्रंथालय संचालनालयाच्या माध्यमातून राज्यातील ‘अ’ वर्गाच्या एकूण ३३४ ग्रंथालयांमध्ये वाचनध्यास (सलग वाचनाचा उपक्रम) या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या सर्व ग्रंथालयांमधील वाचक-सभासद सलग काही तास वाचनाचा आनंद घेणार आहेत. यांपैकी अनेक ग्रंथालयांतून, डॉ. गो. ब. देगलुरकर, डॉ. अरुणाताई ढेरे, डॉ. गो. मा. पवार, अच्युत गोडबोले,कवी दासु वैद्य, श्रीमती निलिमा बोरवणकर, श्याम भुरके, डॉ. विनय काळीकर, रझीया सुलताना, अमृत देशमुख, वैभव जोशी, लक्ष्मीकांत धोंड असे मान्यवर साहित्यिक व ज्येष्ठ दिग्दर्शक प्रमोद पवार वाचकांशी संवाद साधणार आहेत, असे तावडे यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने येत्या १५ ऑक्टोबर रोजी सायं. ५.०० वा. ‘मला उमगलेले राम गणेश गडकरी, बाबूजी,गदिमा व पुलं’ हा विशेष कार्यक्रम रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात प्रवीण दवणे, अरुण म्हात्रे या सुप्रसिद्ध कवींसह दर्जेदार कलाकार सहभागी होत आहेत. हा कार्यक्रम सर्व रसिंकांना विनाशुल्क पाहता येणार आहे. तसेच, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळातर्फे वाई व सातारा परिसरातील शाळा व महाविद्यालयांमध्ये विश्वकोश कसा वाचावा, या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याच्या भाषा संचालनालयातर्फे वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात विविध शासकीय व खाजगी प्रकाशनांच्या ग्रंथांचे प्रदर्शन व विक्री चे आयोजन करण्यात आले आहे.

मंत्रालयातील सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी ‘वाचनतास’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दि. १५ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत प्रत्येकाने किमान एक तास त्रिमूर्ती प्रांगण, मंत्रालय येथे जाऊन आवडेल ते पुस्तक घेऊन वाचण्याचे आवाहनही शासनातर्फे करण्यात आले असल्याची माहिती तावडे यांनी दिली.

याशिवाय राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, ग्रंथालये, साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था वाचन प्रेरणा दिना निमित्त आनुषंगिक कार्यक्रमाचे आयोजन करणार असल्याची माहिती तावडे यांनी दिली. वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित केलेल्या त्या-त्या ठिकाणच्या उपक्रमांत सहभागी होऊन, वाचन संस्कृती संवर्धनासाठी आपापले योगदान द्यावे, असे आवाहन विनोद तावडे यांनी या वेळी राज्यातील जनतेला केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘आम्ही बेफिकर’चे टीजर पोस्टर लाँच

News Desk

अभिनेत्री मधुबाला यांच्या जयंतीनिमित्ताने गुगलकडून मनमोहक डुडल

News Desk

Kargil Vijay Diwas : राज्यातील ३०० चित्रपटगृहात युवकांसाठी ‘उरी’चे फ्री शोज  

News Desk