HW News Marathi
मनोरंजन

जगण्यापलिकडचं जगणं

रोज ऑफिससाठी घरातून बाहेर पडतो, प्रवास तसा ट्रेनचा हा ठरलेलाच असतो कितीतरी सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी ट्रेन प्रवासात अनुभवायला मिळतात. त्यात थोडीशी जागा मिळाली की बसायला मिळत.गरजेपुरती हवा देणाऱ्या पंख्याखाली बसल्या बसल्या कुठल्यातरी स्टेशनवर टाळी वाजवत एक दोन पात्र ट्रेनमध्ये चढतात. त्यांना पाहिल्यानंतर लगेचच सगळ्यांचे चेहरे पडले असल्याचं जाणवत.

‘किन्नर’ म्हणून हिनवण्यापलिकडे आपण माणूस म्हणून त्यांच्याकडे कधी पहिलच नाही. दिवसेंदिवस यांची संख्या वाढत आहे आणि पोटासाठी म्हणून मग नाईलाजाने भीक मागावी लागते. या भीक मागायला पण काही कारणे आहेत ती कारणे म्हणजे एकतर सहजासहजी त्यांना कुठे काम मिळत नाही आणि मिळाल तरी हपापलेल्या वासनांच्या डोळ्यांचे बळी पडल्याशिवाय ते राहत नाहीत हे वास्तव आहे जे सगळ्यांनी मान्य करायलाच हवं.मानसिक,शारीरिक आणि अनेक प्रकारचे त्रास सहन करत समाजाविरुद्ध हा ‘किन्नर’ लढा देतो आहे.

लोकांनी भरलेल्या या धावपळीच्या मुंबईत अनेक रेल्वे स्टेशनवर ट्रेनमध्ये चढून हात पसरणारे किन्नर आपल्याला दररोज दिसतात साधारण एक वर्ष झालं असेल मुंबईत येऊन मला.व पहिल्यांदा हे माझ्यासाठी नवखं होत पण आता सवय झालीय. सुरुवातिला या लोकांबद्दल जरा वेगळीच भावना मनात होती पण रोजच्या ट्रेनच्या प्रवासात यांचं जगण मी पाहत गेलो आणि आता त्याची स्थिती समजू लागतोय.ट्रेनच्या एखाद्या सीटवर बसून कधीतरी यांच्याकडे काळजीपूर्वक पाहातो सुरुवातीला जवळ येऊन हात पसरतात मागून लगेच मिळत नसेल तर हाताने हलवून समोरच्या माणसाला पैसे देण्यासाठी जाग करून बघतात आणि तरीदेखील जर कोणतीच प्रतिक्रिया येत नसेल तर मात्र पुढच्या व्यक्तीकडे जाणं त्यांना भाग असत. पण ते ज्या ज्या वेळी लोकलमध्ये पैसे मागण्यासाठी लोकांच्या गराड्यात हात पसरत असतात तेंव्हा सगळ्यांच्या नजरा या त्यांच्यासाठी सहानुभूतीचा नसतात हे तुम्हाला नक्कीच जाणवेल.

काही दिवसांपूर्वी प्रवासादरम्यान एक गोष्ट लक्षात आली. एक ‘किन्नर’ नेहमीप्रमाणे लोकलमध्ये महिला आणि पुरुषांकडे पैसे मागत होता. काहीजण पैसे काढून देतही होते पण काहीजण असेही होते की नुसते डोळे वटारून त्याला पुढे जाण्यासाठी सांगत होते तर त्यातल्याच काहीजणांच्या वखवखलेल्या नजरा त्याच्या शरीराकडे पाहत होत्या दोन स्टेशन्स गेली असतील तो उतरण्याच्या तयारीत दरवाजाकडे जाण्यासाठी निघाला दोन चार मिनिट का होईना पण त्याच्याशी बोलायचं असं ठरवलं होतं. हाक मारल्या मारल्या तो फिरकला आणि जवळ आला आणि बोलायला, काय “बोल क्या हुआ”.

त्याला विचारलं तुला मराठी येते का त्यावर त्याच उत्तर अपेक्षेप्रमाणे मिळालं होतं तो महाराष्ट्रीयन च होता. त्याला विचारायला सुरुवात केली कधीपासून करतोस हे काम?? हे काम करताना लाचारीचा अनुभव येत असेल ना?? माणसांच्या वागण्याचा बदल हि जाणवत असेल?? असे दोन चार प्रश्न आपुलकीने विचारल्यावर मात्र त्याच्या चेहऱ्यावर थोडस समाधान दिसत होतं.

  • त्याने दिलेली उत्तर त्याच्याच शब्दात..

“साधारण चार वर्षांपूर्वी मी मुंबईत आले. मुंबई माझ्यासाठी नवीन होती माझ्या शरीरात झालेले बदल आणि हे जगण पूर्णपणे नवखं होत पण दुसरं काही काम करूही शकत न्हवते.सुरुवातीला किन्नर लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न केला पण जड जात होत म्हणून ते लोकलमध्ये ज्या ज्या वेळी मागायला जात त्यावेळी मी त्यांच्यासोबत फिरू लागले ते कसे मागतात लोकांशी कसे वागतात ते अनुभवत गेले आणि हळूहळू माझ्यात हिम्मत अली. मनाला पटत नसतानाही मजबुरीपोटी लोकांसमोर हात पसरायला लागले. कधीकधी हातात पैसे पडत होते तर कधी रिकाम्या हातापोटीच राहावं लागतं होत.

पैसे कमवण्याचा दुसरा कोणता पर्याय सुद्धा न्हवता मग रोज लोकलच्या गर्दीत मन मारून घुसू लागले हळू आवाजात,आणि नम्रतेने पैसे विचारल्यावर लोक जवळ उभसुद्धा करून घेत नाहीत म्हणून थोड्या चढ्या आवाजात भीक मागायची वेळ आली. आकर्षक दिसण्यासाठी लिपस्टिक आणि तोंडभरून पावडर आणि कपडे घालायची पद्धत सुद्धा बदलावी लागली. पण आता सवय झालीय पण या रोजच्या प्रवासात सगळेच लोक प्रामाणिक आणि समजूतदार मनाने कधी पैसे देतात असहि नाहीये वेळेनुसार आम्हाला स्वभाव बदलावा लागतो. कधीतरी कोणीतरी भेटत विचारपूस करतात कुठली आहेस,कधीपासून हे काम करते,वैगेरे वैगेरे पण नशिबाला आलेलं जगण कोणी काढून घेणार आहे का ते तर मलाच भोगावं लागणार आहे.

हे सगळे अनुभव मनाला स्पर्श करणारे आहेत. साधारण तीन वर्षांपूर्वी मुंबईत दाखल झालेल्या “परीला” आता या गोष्टींची सवय पडलीय अश्या भरपूर पऱ्या आहेत ज्या पोट भरण्यासाठी बरेवाईट सगळे अनुभव रिचवत सुखदुःखे भोगत मुंबईच्या लोकलमध्ये जगताना दिसतील. पण मुंबईच्या लोकलमध्ये भीक मागता मागता आलेल्या न विसरणाऱ्या क्षणांची आठवण सुद्धा परीने करून दिली.

“कधीकधी आमचं असं चढ्या आवाजात लोकांकडे पैसे मागणं कित्येकजणांना आवडत नाही म्हणून आम्हाला फटकारतात पण याच लोकांमध्ये कितीतरी कामपिपासू चेहरे सुद्धा लपलेले आहेत जे आमच्या या कमजोरीचा फायदा घेऊन आपली भूक शमवतात.. एक दोन रुपयांच्या चिल्लरसाठी सुद्धा आम्हाला कधीकधी या लोकांपुढे झुकावं लागत आणि हे वास्तव आहे जे मी एकटिच नाही तर माझ्या समुदायाचे सगळेच अनुभवत आहेत”

हे सगळं ऐकल्यानंतर किन्नर लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा वाटतो. पण काही अशाही गोष्टी आहेतच कि लोकलमध्ये हजारो प्रवाशनमध्ये हात पसरल्यावर काहीजणांना अवडतही नसेल. सोबत आपलं कुटुंब असलं की अश्या लोकांपासून आपण लांब राहिलेलं बरं अश्या दृष्टिकोनातून पाहणाऱ्या लोकांचीसुद्धा काही कमी नाहीये. पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर मुंबई ही मायानगरी आहे इथे पोट भरणं मुश्किल नाही पण काम करून हातात पैसे कमवणे तिथे बरीच मेहनत करावी लागते. म्हणून किन्नर लोकांत राहून लोकलमध्ये आयती भीक मागणाऱ्या बोगस ‘किन्नर’ लोकांची संख्याही काही कमी नाहीये.

‘बऱ्याच वेळा किन्नर लोकांचा प्रवाशांना त्रास होतो त्यामुळे तुम्ही ट्रेनमध्ये पुन्हा मागायचे नाही हे कारण पुढे करत पोलीस आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात, आम्ही मागू नये म्हणून कित्येक वेळा शिवीगाळ केली जाते, धक्काबुक्की सुद्धा होते पण आमच्याकडे मागण्याशिवाय दुसरा पर्याय सुद्धा नाहि त्यामुळे त्यांना न जुमानता आम्ही पुन्हा लोकल ट्रेनची पायरी चढतोच.. पण कित्येकदा प्रवाशांना त्रास होऊ नये आणि प्रवासादरम्यान गोंधळ होऊ नये म्हणून तैनात केलेले पोलीस सुद्धा निर्दयी भावनेने आमचा छळ करायला मागेपुढे पाहत नाही कित्येकजण तर आमचा गैरफायदा सुद्धा घेतात..

आपल्या प्रत्येकासाठी आयुष्य खूप मोठं आहे पण कित्येक जणांचं आयुष्य हे दुखांनी भरलेलं असत अगदी बोचऱ्या काट्याप्रमाणे क्षणाक्षणाला आठवण करून देणार….पण आम्ही आमच्या आयुष्यातल्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींना मोठं करून रडत बसतो. म्हणून म्हटलं याच विषयावर लिहू.. जगण्यापलिकडंच जगणं जगणारा ‘किन्नर’…….

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पायल रोहतगीचे शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त ट्वीटनंतर माफी, म्हणे भारतात स्वातंत्र्यच नाही

News Desk

Gandhi Jayanti : राजघाटावर महात्मा गांधी यांना मोदींनी वाहिली आदरांजली

swarit

महिला दिनी या पुरूषाला मिळणार,’सर्वोत्कृष्ट आई’चा सन्मान…

Arati More