HW News Marathi
मनोरंजन

‘मनाला दार असतंच’ काव्यसंग्रहाचं प्रकाशन

मुंबई | मनाला दार असतंच या काव्यसंग्रहामध्ये कुटुंबातील नाती-गोती या विषयावर काव्य आहे. स्त्रीची एक वेगळी ओळख उलगडणारे काव्य आहे. त्याचप्रमाणे माणसाला माणूस म्हणून समजावून घेण्याचा प्रयत्न या कवितांमधून करण्यात आला आहे. एक संवेदनशील महिला आणि कार्यकर्ती या दोन्ही भूमिकेतून व्यक्त होत, एकत्रितपणे हा काव्यसंग्रह मांडण्यात आला आहे. त्यामुळे वर्षा पवार-तावडे यांनी प्रथमच केलेला प्रयत्न हा नक्कीच कौतुकास्पद आहे, असे उद्गार आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा कवयित्री, ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे यांनी म्हटले आहे.

वर्षा पवार-तावडे यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये लिहिलेल्या ५० कवितांचा संग्रह कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे रविवारी प्रकाशित करण्यात आला. रविंद्र नाटय मंदिर येथील पु.ल.देशपांडे कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे यांच्या हस्ते आणि भारतीय स्त्री शक्तीच्या निर्मला आपटे यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुस्तकाचे आगळ्या वेगळ्या कल्पक सोहळ्यामध्ये प्रकाशन करण्यात आले.

विचार, कल्पना म्हणजे कविता नव्हे तर शब्द म्हणजे कवितांच्या खूणा असतात. मात्र वर्षा पवार-तावडे यांनी आपल्या पहिल्या काव्य-संग्रहाची निर्मिती करताना यापलिकडे जाऊन वेगळा विचार केला असल्याचे त्यांच्या कवितांमधून जाणवते. या काव्य संग्रहात तिचे मन, तिचा विचार एका वेगळया कल्पनांच्या मांडणीतून उलगडण्यात आला आहे, असे मत अरुणा ढेरे यांनी उपस्थितांशी हृदय संवाद साधताना व्यक्त केले.

‘स्त्रीच्या मनाशी जवळीक साधणाऱ्या या कविता अत्यंत साध्या सोप्या भाषेत लिहिल्या आहेत. साधे लिहिणे आणि साधे राहणे हे कठीण असते. त्यातही स्वतःशी संवाद साधणे आणखी कठीण असते. त्यात अडचणी असतात. या कवितांमधून वर्षा पवार-तावडे यांनी मुखवट्यांशिवाय विचार केला आहे’, या शब्दात ढेरे यांनी त्यांचे कौतुक केले.

यावेळी निर्मला आपटे यांनी वर्षा पवार-तावडे यांचे कार्यकर्ता म्हणून केलेल्या कार्याचे विवेचन केले. त्यांनी स्त्री शक्तीमध्ये काम करताना त्या कशा सजग असतात हे नमूद केले. तर, काव्यवाचनासाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी, ‘हे सुसंवाद साधणारे सोपे लेखन आहे’, म्हणत या कवितांचे सार सांगितले. या कविता दृक्-श्राव्य पद्धतीने काव्यवाचनातून उलगडत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आल्या. मृणाल कुलकर्णी यांच्या जोडीने अभिनेते कवी किशोर कदम यांनीसुद्धा या कवितांचे मनाला भावणारे वाचन केले. काव्यसंग्रहाच्या प्रकाशनासाठी व्यासपीठावर नेपथ्याचीही रचना करण्यात आली होती. काव्यसंग्रहाच्या नावाला साजेसा असा एक दरवाजा उभारून हा दरवाजा उघडून काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

‘कार्यकर्ता म्हणून जग अनुभवताना मी लिहित होते, मात्र कविता करावेसे वाटले नव्हते’, असे सांगत वर्षा पवार-तावडे यांनी आपल्या प्रवासाबद्दल उपस्थितांशी गप्पा मारल्या. ‘आलेले फॉरवर्ड वाचता वाचता अस्वस्थपण आले, त्याला उत्तर देण्यासाठी कवितांचा पर्याय समोर आला. लेख कमी वाचले जातात, या प्रश्नांची उत्तरे थोडक्यात पोहोचावी म्हणून हे घडत गेले’, असे त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. निवेदिका उत्तरा मोने या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. कॉन्टीनेन्टल प्रकाशनाच्या देवयानी कुलकर्णी-अभ्यंकर यांनी या काव्यसंग्रहाबद्दल बोलताना वर्षा पवार-तावडे यांच्या कवितांमध्ये आक्रस्ताळीपणा नाही, तर स्त्री म्हणून आत्मभान देणारी आणि स्त्रीचे भावविश्व उलगडून दाखविणाऱ्या कवितांचा समावेश आहे, असे मत व्यक्त केले.

संगीत संयोजक कमलेश भडकमकर यांनी वर्षा पवार-तावडे यांच्या काही कवितांना संगीतबध्द केले आहे. आजच्या प्रकाशनाच्या निमित्ताने श्री. भडकमकर यांनी संगीतबध्द केलेल्या निवडक कविता सादर करण्यात आल्या. या कार्यक्रमामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनच्या अध्यक्षपदी अरुणा ढेरे यांची बिनविरोध निवड झाल्याच्या निमित्ताने ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक अशोक पानवलकर, ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, मृणाल कुलकर्णी, किशोर कदम, मुंबई भाजपचे अध्यक्ष व आमदार आशीष शेलार, आमदार पराग अळवणी यांच्या हस्ते पुस्तक देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. उत्तरा मोने व अन्वी तावडे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलेले. तर सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोपामुद्राने बनविला मातीचा गणपती!

News Desk

विंकवर 2018 मध्ये लोकप्रिय ठरलेल्या मराठी गाण्यांची यादी जाहीर

News Desk

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटासंदर्भात बॉलिवूडमध्ये दोन गट; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Aprna