HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीस नाही तर फसणवीस सरकारः खा. अशोक चव्हाण

मुंबईत शेती होते, आणि शेतकरी आहेत सरकारचा महान शोध !

सरकारने कर्जमाफीचे दिलेले आकडे चुकीचे

मुंबई राज्य सरकारने कर्जमाफीचे खोटे आकडे जाहीर करून राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले आकडे हे चुकीचे आहेत अशी कबुली राज्याच्या सहकारमंत्र्यांनीच दिली आहे. मुंबईत शेती होते आणि शेतकरी आहेत असा महान शोध राज्य सरकारने लावला आहे. यावरून राज्यात फडणवीस नाही तर फसणवीस सरकार आहे हे स्पष्ट झाले आहे. अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

मुंबईतील टिळक भवन येथे पत्रकारपरिषदेत बोलताना खा. चव्हाण यांनी कर्जमाफी संदर्भात सरकारने जाहीर केलेल्या खोट्या आकडेवारीचा जोरदार समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या लाभार्थ्यांच्या यादीत वर्धा जिल्ह्याचे नावच नाही पण मुंबईत मात्र 813 शेतकरी असल्याचा शोध सरकारने लावला आहे. मुंबईत शहरात नेमकी कुठे शेती होते? याची माहिती सरकारने जाहीर करावी असे खा. चव्हाण म्हणाले.सरकारने थकबाकीदार शेतक-यांचे आकडे 2008 ते मार्च 2017 पर्यंतचे दाखवले, पण कर्जमाफी मात्र फक्त एप्रिल 2012 ते 30 जून 2016 या चार वर्षासाठी केली आहे. राज्य बँकिंग समितीच्या अहवालानुसार बुलढाण्यामध्येही एकूण कर्जधारक शेतक-यांची संख्या 2 लाख 35 हजार 839 असताना केवळ दीड लाखांपेक्षा कमी कर्ज असलेले शेतकरी 2 लाख 49 हजार 818 आहेत असे मुख्यमंत्री म्हणतात. एकूण कर्जदार शेतक-यांपेक्षा मुख्यमंत्र्यांनी लाभार्थी शेतक-यांची दिलेली संख्या ही जास्त आहे त्यावरून मुख्यमंत्र्यांनी दिलेले आकडे असत्य आहेत हे स्पष्ट आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या आकड्यांची परिस्थिती ही अशीच आहे. यातच राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेली आकडेवारी चुकीची आहे हे स्वतःच सांगितले आहे. राज्यातील जनतेला खोटी आकडेवारी सांगून जनतेची फसवणूक केल्याबद्दल त्यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी अशी मागणी खा. चव्हाण यांनी केली.

सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी 34 हजार कोटींची नाही तर फक्त 5 हजार कोटींची आहे. तसेच 89 लाख शेतक-यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नसून केवळ 15 लाख शेतक-यांनाच लाभ मिळणार आहे. हे राज्यस्तरीय बँकींग कमिटीने सरकारला दिलेले आकडेवारीवरून दिसून येते. शेतक-यांना खरीप हंगामासाठी 10 हजारांची उचल देण्याच्या निर्णयाचा सरकारने मोठा गाजावाजा केला होता. 12 जूनपासून शेतक-यांना 10 हजार रूपयांच्या रकमेचे वाटप सुरु होईल अशी घोषणा सरकारने केली होती. मात्र सरकारच्या घोषणेनंतर आतापर्यंत तीन आठवड्यात राज्यभरातील 1 कोटी 36 लाख खातेदार शेतक-यांपैकी फक्त 1082 शेतक-यांनाच 10 हजाराची उचल मिळाली आहे. हे भयंकर आहे. कर्जमाफीच्या संदर्भात सरकारने खोटेपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत असे खा. चव्हाण म्हणाले.

संपूर्ण सरसकट कर्जमाफीची काँग्रेस पक्षाची मागणी कायम आहे. सरकार खोटे आकडे जाहीर करून जनतेची दिशाभूल करित आहे. सोमवारी 10 जुलै रोजी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक होणार असून या बैठकीत कर्जमाफीची वस्तुस्थिती आणि खरी आकडेवारी जनतेपर्यंत नेऊन जनजागृती करण्याबाबतची रणनिती ठरवली जाणार असून त्यानंतर राज्यस्तरीय आंदोलनाची आखणी केली जाईल असे खा. चव्हाण म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपच्या उपमहापौरांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वापरले अपशब्द

News Desk

ST कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्तेंना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले

Aprna

योगीजी पहिले उत्तरप्रदेश भयमुक्त करा मग व्यापाऱ्यांना, फिल्म अभिनेत्यांना बोलवा – महेश तपासे

News Desk