HW News Marathi
महाराष्ट्र

‘केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि देवेंद्र फडणवीस भेटीकडे’, राजकीय वर्तुळाचं लक्ष!

मुंबई। विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या आठवड्यात दिल्लीत होते. यावेळी त्यांनी केंद्रातील अनेक नव्या मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. मात्र, केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांची फडणवीस यांनी घेतलेली भेट अधिकच चर्चेचा विषय ठरते आहे आता या भेटीचे चार फोटो कराड यांनी ट्विट केले आहेत. यातून फडणवीस आणि कराड अत्यंत जवळ आल्याचं दिसून येत असून दोघांमध्ये काय चर्चा झाल्या असतील या चर्चांना राजकीय वर्तुळात वेग आलाय.

कराड आणि प्रीतम दोघेही वंजारी समाजातून येतात

गेल्या आठवड्यात केंद्र सरकारचा विस्तार करण्यात आला. नव्या विस्तारात भाजप नेत्या खासदार प्रीतम मुंडे यांना संधी मिळेल अशी चर्चा होती. मात्र, भाजपने डॉ. भागवत कराड यांना मंत्रिपद दिलं. विशेष म्हणजे भागवत कराड हे राज्यसभेचे सदस्य आहेत. ते लोकसभेवर कधीही निवडून आलेले नाहीत. शिवाय त्यांची राज्यसभेची ही पहिलीच टर्म आहे. तर प्रीतम या लोकांमधून निवडून आलेल्या आहेत. त्या लोकसभेच्या खासदार असून त्यांची दुसरी टर्म आहे. शिवाय त्याही उच्च शिक्षित आणि मास लीडर आहेत. कराड आणि प्रीतम दोघेही वंजारी समाजातून येतात. तरीही त्यांना डावलून कराड यांच्या पारड्यात मंत्रिपद टाकल्याने मुंडे भगिनी नाराज होत्या. पंकजा मुंडे आणि प्रीतम यांनी कराड यांच्या अभिनंदनाचं ट्विटही केलं नव्हतं. त्यामुळे या नाराजीला बळ मिळत होतं. त्यातच पंकजा मुंडे यांनी दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन आपण नाराज नसल्याचं जाहीर केलं. यावेळी त्यांनी प्रीतम मुंडे मंत्रिपदासाठी कशा योग्य होत्या हे देखील सांगायला पंकजा मुंडे विसरल्या नाहीत.

कराड फडणवीस फोटोंवरून अनेक चर्चांना ऊत

कराड यांनी आज एकूण चार फोटो पोस्ट केले आहेत. एका फोटोत फडणवीस कराड यांचं गुच्छ देऊन अभिनंदन करताना दिसत आहेत. दुसऱ्या फोटोत फडणवीस कराड यांच्या कुटुंबीयांसोबत दिसत आहेत. पण या दोन फोटोपेक्षा दुसरे दोन फोटो महत्त्वाचे आहेत. यातील एका फोटोत कराड आणि फडणवीस खुर्चीवर बसलेले आहेत. कराड आदबशीर बसलेले दिसत आहेत. त्यातून त्यांचा फडणवीसांप्रतींचा आदर दिसून येतोय. तर फडणवीस अत्यंत आरामात बसलेले दिसत आहेत. या फोटोत कराड यांच्या तोंडाला मास्क आहे. दोघेही समोर बघून दिलखुलास हसताना दिसत आहेत. त्यामुळे या ठिकाणी कुणी तरी उपस्थित असावं आणि काही तरी विनोद झाला असावा त्यामुळे दोघेही या तिसऱ्या व्यक्तीकडे बघून हसताना दिसत आहेत.

तर, शेवटच्या फोटोत कराड आणि फडणवीस अत्यंत गंभीर विषयावर चर्चा करताना दिसत आहेत. या फोटोत कराड यांच्या तोंडावरचं मास्क त्यांच्या हातता दिसतंय. तर फडणवीस खाली मान घालून काही तरी सांगतानाच दिसत आहेत. दोघांचेही चेहरे धीरगंभीर आहेत. त्यामुळे भेटीत बरीच गंभीर चर्चा झाली असावी असं दिसत आहे. या भेटीत नेमकं काय झालं? हे कराड आगामी काळात महाराष्ट्रात काय रोल निभावतात त्यातूनच यथावकाश स्पष्ट होईल, असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.

पंकजा काय म्हणाल्या होत्या?

खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी राजीनामा सत्रं सुरू केलं आहे. त्यानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांनी समर्थकांशी संवाद साधला. मी लालची नाही. मला सत्तेची लालसा नाही. मला कुणालाही राजकारण संपवून राजकारण करायचं नाही, असं सांगतानाच मी तुमच्या सर्वांचे राजीनामे फेटाळून लावत आहे, असं पंकजा मुंडे यांनी जाहीर केलं.

पंकजा मुंडे यांनी आज वरळीत पक्षव कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करतानाच दिल्लीत नेमकं काय घडलं याचीही माहिती दिली. मी लालची नाही. मला सत्तेची लालसा नाही. मी असुरक्षित नाही. मला कुणालाही संपवून राजकारण करायचं नाही. त्यामुळे मी तुमच्या सर्वांचे राजीनामे नामंजूर करत आहे, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ जागतिक दर्जाचे व्हावे! – देवेंद्र फडणवीस

Aprna

‘फाईव्ह जी’ तंत्रज्ञानाने शिक्षणासह सर्वच क्षेत्रात होणार क्रांती! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

रतन टाटा यांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट

Aprna