HW News Marathi
महाराष्ट्र

खानवडीच्या आदर्श निवासी शाळेसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही! – अजित पवार

पुणे । महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृती जतन करण्यासाठी ३० कोटी खर्च करून खानवडी येथे मुलींची आदर्श शाळा उभारण्यात येत आहे. या शाळेत ६ वी ते १२ वी च्या विद्यार्थीनींसाठी शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार असून आदर्श शाळेसाठी कुठल्याहीप्रकारे निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे फियाट इंडिया ऑटोमोबाईल्सच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून उभारण्यात येणाऱ्या ज्योती-सावित्री आंतरराष्ट्रीय शाळेच्या आणि महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक सभागृहाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, फियाट उद्योगाचे राकेश बावेजा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ.दिगंबर दुर्गाडे, माजी आमदार अशोक टेकवडे, सरपंच स्वप्नाली होले, महात्मा फुले स्मारक समितीचे सुदाम इंगळे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सवित्रीबाई फुले यांच्यासारख्या महान व्यक्तींचा विचार घेऊन आपण पुढे जायला हवे. यावर्षी ९६ कोटी रुपये शाळा सुधार कार्यक्रमासाठी देण्यात येत आहे. त्यात जिल्ह्यातील ४१० शाळांमध्ये दर्जेदार सुविधा देण्यात येणार असून त्यात जिल्ह्यातील ४० टक्के विद्यार्थी कार्यक्रमात समाविष्ट होत आहे. टप्प्याटप्प्याने इतरही शाळांमधून हा कार्यक्रम राबविण्यात येईल.

शाळांमधील गुणवत्ता वाढीसाठी खाजगी संस्थांची मदत घेण्यात येईल. ग्रामस्थांनीदेखील हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे. शासनातर्फे निवासी शाळेच्या संरक्षक भिंतीचे काम करण्यात येईल. गावातील १ ली ते ५ वीची शाळाही भविष्यात आदर्श शाळेशी जोडण्यात येईल.

पुरंदरच्या विकासासाठी आवश्यक निधी देणार असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले, अर्थसंकल्पात जेजुरी आणि परिसराच्या विकासासाठी तरतूद करण्यात आली आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी विकासकामे गतीने होणे गरजेचे आहे. खानवडी पाझर तलावाचा उपयोग गावाच्या पाणी पुरवठ्यासाठी होण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील. खानवडीच्या विकासासाठी गरजेच्या बाबींची पूर्तता करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

पुण्यातील महात्मा फुले वाड्यासाठीही १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे, स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या वढू बुद्रुक येथील स्मारकासाठी २५० कोटी, पुरंदर रिंगरोडच्या जमीन संपादनासाठी १५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती पवार यांनी दिली.

खासदार सुळे म्हणाल्या, मराठीचा अभिमान बाळगताना इंग्रजीतून शिक्षण उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. शिक्षणात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यासोबत शाळेतील सुविधांबाबत ग्रामस्थांचेही सहकार्य गरजेचे आहे.

पुरंदरची ओळख चांगल्या शिक्षक आणि फळांसाठी आहे. इथे फळप्रक्रिया व्यवसाय विकसीत होत आहे. तालुक्याला जोडणाऱ्या वाहतूक सुविधा वाढविण्याचा प्रयत्न होत आहे. उत्तम प्रशासकीय इमारती उभ्या रहात आहेत. तालुक्यातील स्वच्छतेवर अधिक भर देण्याची गरज आहे.

आमदार जगताप म्हणाले,शासनाच्या सहकार्यामुळे महात्मा फुले यांच्या गावी सीबीएसई अभ्यासक्रमाची मुलींची निवासी शाळा सुरू होणार आहे. भविष्यात मुलींसाठी उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील.

यावेळी बावेजा यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. आदर्श शाळेमुळे ग्रामीण मुलींना शिक्षणाच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रास्ताविकात शाळेच्या कामाविषयी माहिती दिली. गोरगरीब कुटुंबातील मुलींना विविध क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळावी यासाठी शासनाच्या धोरणानुसार आदर्श शाळा उभारण्यात येत आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी १२ एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. उत्तम शैक्षणिक संस्थासोबत करार करून सुरुवातीस ३०० आणि नंतर १२०० पर्यंत विद्यार्थिनींना उत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध शैक्षणिक उपक्रम राबवून दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती जतन करण्यासाठी महात्मा फुले यांचे मुळगाव असलेल्या खानवाडीत मुलींची आदर्श निवासी शाळा उभारण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने केला आहे. या शाळेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अनाथ, निराधार आणि अत्याचारग्रस्त मुलींना प्राधान्याने प्रवेश देण्यात येणार आहे. १२ एकर जमिनीवर सामाजिक उत्तरदायित्व निधीतून ही शाळा उभारण्यात येणार आहे. शाळेत सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून अध्यापनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सचिन वाझेंचा NIA कोर्टात जामिनासाठी अर्ज

News Desk

पोलिस मेगा भरती करुन जखमेवर मीठ चोळत आहात का? नितेश राणेंचा सरकारला सवाल

News Desk

‘तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, तुमच्या कार्याला सलाम’, राजेश टोपेंचं डॉक्टरांना भावनिक पत्र

News Desk