मुंबई | कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु असल्यामुळे ठप्प झालेली चित्रपटसृष्टीतील कामे पुन्हा सुरु झाली आहेत. राज्य शासनाने काही अटी -शर्तींच्या अधीन राहून चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी मालिकांच्या चित्रीकरणास मान्यता दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे मनोरंजन, चित्रपट क्षेत्राला मोठा दिलासा मिळाल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले.
कोविड – १९ च्या पार्श्वभूमीवर चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी यांच्या चित्रीकरणासंदर्भात राज्य शासनाने ३० मे २०२० रोजी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करताना संबंधित संस्था/संघटना यांना येत असलेल्या काही अडचणींमुळे सांस्कृतिक विभागामार्फत ३० मे २०२० रोजी निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांबाबतचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. संबंधित संस्थांनी या स्पष्टीकरणात्मक सूचनांनुसार कार्यवाही करावी. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा सांकेतांक २०२००६२४११०९३७८२३ असा आहे.
आशी आहेत मार्गदर्शक तत्वे
१. चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी यांना ३० मे २०२० च्या शासन निर्णयानुसार चित्रीकरणासाठी परवानगी देण्यात आली आहे. सदर चित्रीकरणाची परवानगी राज्य शासनाने तयार करून दिलेल्या एसओपी (मार्गदर्शक तत्वे) नुसार असेल. लॉकडाऊन पूर्वी चित्रीकरणासाठी शासनाची परवानगी घेण्याची पद्धत यापुढेही तशीच असणार आहे.
२. लॉकडाऊन पूर्वी ज्या पद्धतीने आरक्षण आणि चित्रीकरणाची परवानगी घेण्यात येत होती आताही तीच पद्धत असणार आहे. चित्रीकरण करत असताना संबंधित निर्मात्याने आवश्यक त्या परवानग्या, स्व-घोषित पत्र, चित्रीकणासंबंधित सर्व माहिती चित्रनगरीला लिखित स्वरूपात कळविणे आवश्यक आहे.
३. प्रतिबंधित क्षेत्र नसलेला आणि निषीद्ध क्षेत्र नसलेला भाग यामध्येच चित्रीकरणाला परवानगी आहे. केंद्र शासन व राज्यशासन यांनी लॉकडाऊनबाबत दिलेल्या निर्णयाचे पालन करणे आवश्यक राहील.
४. मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारीही पूर्णपणे संबंधित निर्मिती संस्था/निर्माते यांची असेल. चित्रीकरणादरम्यान सुरक्षेचे व स्वच्छतेचे नियम पाळले जात आहे की नाही याची खातरजमा वेळोवेळी परवाना अधिकारी (लायसेन्स ऑथॉरिटी) यांच्यामार्फत करण्यात येईल.
५. चित्रीकरणादरम्यान कलाकार, तंत्रज्ञ सामाजिक अंतर ठेवून चित्रीकरण करू शकतात, संबंधित निर्मात्यांनी कमीत कमी मनुष्यबळात चित्रीकरण करणे आवश्यक आहे. संबंधित निर्मात्यांनी केंद्र व राज्य शासनाचे लॉकडाऊन संदर्भातील नियम पाळणे आवश्यक आहे.
६. थर्मल स्क्रिनिंग, स्वच्छतेची काळजी चित्रिकरणाच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. चित्रीकरणाच्या स्थळी जवळील कोविड – 19 रुग्णालये याची माहिती दूरध्वनी क्रमांक निर्मिती संस्थेला असणे आवश्यक आहे. तसेच निर्मिती संस्थेने एक स्वतंत्र वाहन आरक्षित करुन ठेवणे आवश्यक आहे, जेणे करुन जर एखादा संशयित रुग्ण चित्रीकरणा ठिकाणी आढळल्यास त्याला रुग्णालयात नेणे सोयीस्कर होईल. तसेच या वाहनात प्रथमोपचार पेटी, पल्स ऑक्सिमीटर, ब्लड प्रेशर मॉनिटर, शुगर टेस्टिंग किट असणे आवश्यक आहे.
७. राज्य शासनामार्फत जारी करण्यात आलेल्या या मार्गदर्शक सूचना कलाकार/ तंत्रज्ञ/मदतनीस यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून करण्यात आल्या आहेत. चित्रिकरण स्टुडिओ आणि एडिटिंग कक्षात कोविड-१९ विषाणूचा धोका टाळण्यासाठी पुरेशा उपाययोजना करणे, सर्व संबंधितांना, कर्मचाऱ्यांचे कोरोना विषाणूच्या संदर्भात प्रबोधन करून दक्षता घेण्याच्या सूचना देणे, चित्रीकरणस्थळी गर्दी टाळणे, कमीत कमी तंत्रज्ञांमध्ये चित्रिकरण स्टुडिओ आणि एडिटिंग कक्षात कोरोना विषाणूचा धोका टाळण्यासाठी पुरेशा उपाययोजना करणे, सर्व संबंधितांना, कर्मचाऱ्यांचे कोरोना विषाणूच्या संदर्भात प्रबोधन करून दक्षता घेण्याच्या सूचना देणे, चित्रीकरणस्थळी गर्दी टाळणे, कमीत कमी तंत्रज्ञांमध्ये काम करणे, मोबाईलमध्ये आरोग्यसेतू ॲप इन्स्टॉल करणे, साधनसामुग्रीची हाताळणी, चित्रीकरणाच्यावेळी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, कार्यालयांचे, चित्रिकरण स्थळांचे सॅनिटायझेशन आदी बाबींवर भर देण्याच्या अटी-शर्ती टाकण्यात आल्या असून या अटी शर्तींचे, शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वे, निर्बंधांचे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पालन करणे गरजेचे आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.