मुंबई | बेस्टच्या ताफ्यात २०० दुमजली इलेकट्रीक बसगाड्यांचा प्रस्ताव आणून प्रत्यक्षात बेस्ट समितीने मे कोसिस ई मोबिलीटी प्रा. लि. आणि मे स्विच मोबीलिटी ऑटोमोटिव्ह या व्यवसाय संस्थांना भाडेतत्त्वावर परस्पर ९०० बसगाड्यांचा पुरवठा करण्याची मुभा दिली आहे. बसगाड्यांची संख्या वाढविल्यानंतर कुठल्याही प्रकारची नवीन निविदा प्रक्रिया न राबवता २०० बसगाडयांच्या निविदेसाठी आलेला प्रति कि.मी. ५६.४० रुपयांच्या दरातच ९०० बसगाड्या पुरविण्याचे कंत्राट देऊ केले आहे. यामुळे पालिकेतल्या सत्ताधाऱ्यांनी आपल्या मर्जीतल्या ठेकेदाराला खुश करण्यासाठी सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप मनसे नेते केतन नाईक यांनी केला आहे.
दरम्यान, या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं शिष्टमंडळ जनरल मॅनेजर लोकेश चंद्रा यांना भेटलं. यावेळी लोकेश चंद्रा यांनी नवीन टेंडर आणल्याने बेस्टचं नुकसान होऊ शकतं म्हणून परस्पर काम दिल्याचे सांगितले. परंतु मुळात बेस्ट समिती अश्या प्रकारचा बेकायदेशीर व भविष्यातील निविदा प्रक्रियांना छेद देणारा निर्णय कसा काय घेऊ शकते हा प्रश्न अनुत्तरित आहे.
काय म्हणाले केतन नाईक?
निवडणुका म्हणजे सर्वकाही नसतं. चांगल्याला चांगलं म्हणायला हवं ही राज साहेब ठाकरेंची शिकवण. मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्ष जे काही करतात ते निवडणुका डोक्यात ठेऊनच. निवडणुका जवळ आल्या की यांना उर्दू भवन, टिपू,मराठी पाट्या हे सर्व काही सुचतं.याचेच उत्तम उदाहरण म्हणजे नव्याने मागवण्यात आलेल्या डबल डेकर बस गाड्यांचे टेंडर अशी जहरी टीका केतन नाईक यांनी केली.
२०० व्यतिरिक्त इतर बसगाड्यांचा खर्च माननीय पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या महाराष्ट्र शासनाच्या शुद्ध हवा …विभागाकडून देण्यात येणार असला तरी हा निधी कुठल्याही निविदा प्रक्रियेविना परस्पर वापरण्याचा घाट त्यांच्याच पक्षाच्या बेस्ट समितीने घातला आहे.जनतेच्या करातून उत्पन्न झालेल्या निधीचा असा गैरवापर मनसे कदापी खपवून घेणार नाही असे शिष्टमंडळाचे लोकेश चंद्रा यांना सांगितले असून निवेदनानंतरहि बेस्ट प्रशासनाने निविदा प्रक्रियेतील त्रुटी दूर न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन उभारेल व सोबतच लोकायुक्त आणि कोर्ट याठिकाणी देखील दाद मागेल अशी माहिती केतन नाईक यांनी दिली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.