HW News Marathi
महाराष्ट्र

लोकसभा आणि विधानसभेमध्ये चुकलात तशी चुक पुन्हा करु नका- अजित पवार

प्रचंड मोटारसायकली रॅलीने राष्ट्रवादीच्या नेत्यांचे माजलगावात स्वागत…

बीड ( माजलगाव ) लोकसभा आणि विधानसभेमध्ये चुकलात तशी चुक पुन्हा करु नका. या सरकारला वठणीवर आणण्यासाठी नव्या उमेदीने कामाला लागा आणि जे अपयश आले आहे ते धुवून काढण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी माजलगावच्या जाहीर सभेमध्ये माजलगाववासियांना केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनातील दुसरी सभा माजलगावच्या तुंबा मैदानावर प्रचंड जनसमुदायासमोर पार पडली. गेवराई येथून निघाल्यानंतर माजलगावच्या हद्दीमध्ये अजित पवार,प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे,विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांच्या ताफ्यासमवेत हजारो तरुणांनी युवा नेते जयसिंग सोळंके यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोटारसायकल रॅली काढली. आज दिवसातील ही दुसरी सभाही प्रचंड प्रतिसादामध्ये पार पडली.

या सभेच्या सुरुवातीला राष्ट्रवादी पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, आमदार विदया चव्हाण, आमदार जयदेव गायकवाड, ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांची भाषणे झाली. या सभेला विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, आमदार अमरसिंह पंडीत ,महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार विक्रम काळे, आमदार सतिष चव्हाण, आमदार रामराव वडकुते, आमदार विदया चव्हाण, आमदार जयदेव गायकवाड, आमदार राजेश टोपे, माजी मंत्री प्रकाश सोळंके, माजी आमदार संजय वाकचौरे, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील, विदयार्थी अध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनावणे, युवक जिल्हाध्यक्ष जयसिंग सोळंके, महिला जिल्हाध्यक्षा रेखा फड, ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष गफार मलिक, सुरेखा ठाकरे, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, आदींसह अनेक नेते,पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

८ लाख कोटीचा कर्जाचा डोंगर उभा करुन तुमचं माझं राज्य कंगाल करण्याचे काम या सरकारने केले आहे. तुमच्या शेतातील सोयाबीन, हरभरा, तुरीला योग्य भाव नाही, दुधाला दर नाही या समस्यांसाठीच राष्ट्रवादीने हे हल्लाबोल आंदोलन केले आहे. या बीड जिल्हयात साडेतीन वर्षीत एक तरी नवीन प्रकल्प आला का ? काय करतात इथले मंत्री, काय करतात मुख्यमंत्री, विदर्भ जसा तुमचा तसा मराठवाडा तुमचा नाही का ?मराठवाडयाला निधी देत नाही. काय करतात मराठवाडयातील मंत्री, सरकारला त्यांना जाब विचारता येत नाही असा संतप्त सवाल करत अजित पवार यांनी मराठवाडयावर अन्याय होवू देणार नाही असे स्पष्ट केले.

अहो जनतेबद्दल आस्था असावी लागते. ती आस्था इथल्या पालकमंत्र्याला आहे का, राज्याचे बालविकास खातं त्यांच्याकडे आहे. परंतु त्यांच्या कारकीर्दीमध्ये ६७ हजार लहान बालकांचा पोषण आहाराअभावी मृत्यु झाला हा यांचा विकास असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.

चार दिवस सासूचे असतात तसे सुनेचेही असतात. आम्ही सत्तेत असताना कुणालाही त्रास दिला नाही. उलट आम्ही विरोधकांनाही जवळ करत काम केले. परंतु आत्ताचे सरकार विरोधकांना संपवण्यासाठी काम करत आहे. हे सत्ताधाऱ्यांमधील काहींना सोडून विरोधकांना धरत आहेत. हे चालणार नाही. करायची कारवाई तर दोघांवरही करा असे सांगतानाच अजित पवार यांनी थांबा आमची सत्ता येवू दया, त्रास कुणाकुणाला देत होतात ते…सत्ता आल्यावर बघतोच असा दमही अजित पवार यांनी सरकारमधील चुकीच्या पध्दतीने धोरण राबवणाऱ्या लोकांना दिला.

सभेमध्ये माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी इथल्या स्थानिक आमदाराच्या कारभारावर टिकेची झोड उठवली. साडेतीन वर्षात इथल्या आमदाराने लोकाभिमुख काम केलेले नाही की कोणता मोठा प्रकल्पही आणलेला नाही अशी टिका केली.

समय को बदलते देर नही लगती- धनंजय मुंडे

त्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची मुलुखमैदान तोफ धडाडली. त्यांनी मराठवाडयामध्ये कायदा आणि सुव्यवस्था काय आहे. मुख्यमंत्री काय कायमस्वरुपी राहणार नाहीत हे लक्षात ठेवा.समय को बदलते देर नही लगती हे लक्षात ठेवा आणि त्यापध्दतीने कायदा व सुव्यवस्था ठेवा. आमचा हा संघर्ष सर्वसामान्य माणसांसाठी आहे त्यामुळे त्यामध्ये पडू नका असा सल्ला सरकारला धनंजय मुंडे यांनी दिला. पावलोपावली शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या सरकारचा बदला घेण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन धनंजय मुंडे यांनी माजलगाववासियांना केले.

 

*हल्लाबोलमधील विशेष…*

हल्लाबोल आंदोलनाच्या सुरुवातीपासूनच धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांचे भाषण आणि अजित पवार यांचे आणि धनंजय मुंडे यांचे भाषण ऐकण्यासाठी या आंदोलनामध्ये तरुणांचा मोठा सहभाग दिसत आहे. विशेष म्हणजे अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी तरुणाईची झुंबड पाहायला मिळत होती. आज स्वतः धनंजय मुंडे यांनी मोटार सायकल ( बुलेट ) चालवून रॅलित सहभाग घेतला तर स्वतः दादांनी स्वतः गाडी बाहेर येत जनतेचे स्वागत स्वीकारल. या वेळी प्रचंड उत्साह होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यभर पावसाचा कहर, नद्यांना पूर, धरणे फुल्ल..

News Desk

भाजपाच्या कार्यकारिणीत अजित पवारांच्या चौकशीच्या ठरावावरुन संजय राऊत संतापले, म्हणाले…

News Desk

पद्म पुरस्कार समितीच्या अध्यक्षपदी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची नियुक्ती

News Desk