HW News Marathi
Covid-19

जम्बो हॉस्पिटलचे व्यवस्थापन काटेकोरपणे करा – अजित पवार

पुणे | जम्बो हॉस्पिटलबाबत नागरिकांची विश्वासार्हता वाढविण्यासाठी येथील परिस्थिती व व्यवस्थापन सुरळीत असणे आवश्यक आहे. जम्बो हॉस्पिटलबाबतच्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे सांगून येथील बेडच्या उपलब्धतेची माहिती पोहोचविण्यात तसेच उपचारात हलगर्जीपणा झाल्यास दोषींवर कारवाई करण्यात येईल असे स्‍पष्‍ट निर्देश उपमुख्यमंत्री आणि जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज (११ सप्टेंबर) दिले.

पुणे आणि पिंपरी चिंचवडसह ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

संपूर्ण महाराष्ट्रातून पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी कोरोना बाधित रुग्ण दाखल होत आहेत. कोरोनाच्या रुग्णांना वेळेत व योग्य ते वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी शासकीय यंत्रणेने पूर्ण क्षमतेने काम करावे. कोरोना परिस्थती नियंत्रणासाठी राज्य शासन सर्व प्रकारे मदत करत असून दोन्ही महापालिकेच्या आरोग्य विभागाने देखील सक्रियपणे काम करावे. पुण्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर या जिल्ह्यांमध्ये देखील ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी विभागीय आयुक्तांनी नियोजनबध्द कार्यवाही करावी.

विभागातील पाचही जिल्ह्यात कोरोनाविषयक काम करताना एकाच अधिकाऱ्यावर कामाचा ताण येऊ नये तसेच कामात गतीमानता येण्याच्यादृष्टिने विषयनिहाय जबाबदाऱ्या सोपवून कामाचे विकेंद्रीकरण करावे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.विभागातील कोणत्याही रुग्णाला ऑक्सिजन अभावी जीव गमवावा लागू नये, यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे. ऑक्सिजन टँकरचा वाहतुकी दरम्यानचा वेळ वाचवण्यासाठी तसेच रुग्णालयात जलदगतीने ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी ऑक्सिजन टँकरला ॲम्ब्युलन्स प्रमाणे सायरनची व्यवस्था करुन घ्यावी. तसेच पोलीस विभागाने ऑक्सिजन टँकर मार्गस्थ होण्यासाठी प्रयत्न करावेत, जेणेकरुन हे टँकर वाहतूक कोंडीतून जलदगतीने बाहेर पडतील असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा वार्षिक योजनेतील ५० टक्के निधी कोविड नियंत्रणाच्या उपाययोजनांसाठी वापरुन कोरोना रोखण्‍यासाठी प्रभावीपणे काम करावे असे सांगून ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत उपचार मिळवून देण्याचे नियोजन करावे तसेच आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोना रुग्णांवर उपचार होत असल्याची खात्री करावी असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

रुग्णालयांमध्ये उपलब्ध असणाऱ्या बेडची माहिती लोकप्रतिनिधींसह रुग्ण व सर्वसामान्यांना मिळण्यासाठी संगणकीय प्रणालीमध्ये अद्ययावत नोंदी करण्याबरोबरच बेड उपलब्ध करुन देण्याचे नियोजन दोन्ही महापालिकांनी करावे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १५ सप्टेंबरपासून राज्यभर ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ ही जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेला सर्व लोकप्रतिनिधी, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, गावांमधील दक्षता समित्या व स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य करावे. हे अभियान सर्वांनी मिळून प्रभावीपणे राबवूया असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुणे विभागातील कोरोना परिस्थिती नियंत्रणासाठी तसेच ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. जमाबंदी आयुक्त तथा ससूनचे समन्‍वय अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी ससून रुग्णांलयातील व्यवस्थापन व उपचार पध्दतीची माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ग्रामीण भागातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी तसेच बेड व्यवस्थापनाच्या दृष्टीने तालुकानिहाय नियोजन करण्यात आल्याची आणि तपासण्या वाढविण्यात आल्याची माहिती दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील जनतेने कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आवाहन

Aprna

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना केले रुग्णालयात दाखल

News Desk

१६७७ त्रिस्तरीय उपचार व निगा केंद्रे कार्यरत, राज्यात पावणे दोन लाख आयसोलेशन खाटांची उपलब्धता

News Desk