रायगड | राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अनलॉकसंबंधी काल (३ जून) घोषणा केल्यानंतर झालेल्या गोंधळावरुन विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील १८ जिल्ह्यांतील सर्व निर्बंध हटवल्याची घोषणा केली आणि काल एकच गोंधळ उडाला. यामुळे सगळे निर्बंध शिथिल झाले, असं चित्र निर्माण झालं. पण असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाने दिलं. दरम्यान या सर्व गोंधळावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. ते रायगडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
लॉकडाऊनवरुन सावळा गोंधळ
“अनलॉकबाबत पूर्णपणे सुसंवाद आहे. ज्या दिवशी कोरोना आला तेव्हापासून राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून लोकांसमोर येत आहेत. त्यानंतर मग अनेकदा राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे भूमिका मांडत असतात. विजय वडेट्टीवार यांनी एक शब्द राहून गेला होता त्यामुळे गैरसमज झाला होता असं स्पष्ट केलं आहे. . शेवटी सरकार कोणाचंही असलं तरी राज्याचे मुख्यमंत्री सांगतील तो अंतिम निर्णय असतो,” असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.
विजय वडेट्टीवारांचं त्या गोंधळावर स्पष्टीकरण
राज्यातील काही जिल्ह्यांत लॉकडाउन काढण्याचा प्रस्ताव असून त्यास आपत्ती व्यवस्थापन बैठकीत तत्त्वत: मान्यता देण्यात आली. परंतु मुंबईहून नागपूरला येण्याच्या गडबडीत प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना तत्त्वत: हा शब्द विसरून गेलो असं स्पष्टीकरण विजय वडेट्टीवार यांनी काल दिलं होतं. त्यानंतर पुन्हा आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “अंतिम प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला असून त्यांची संमती मिळाल्यानंतर अधिसूचना निघेल. जिल्ह्यातील परिस्थितीनुसार ते लागू होईल”. फडणवीसांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, “विरोधक म्हणून त्यांची भूमिका योग्य असून त्यांना ती मांडावीच लागते. पण यामध्ये श्रेयवादाचा कोणताही विषय नाही. सरकार म्हणून जे काही करावं लागतं ते आम्ही करत असतो”.
देवेंद्र फडणवीसांची टीका
“ज्या मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे त्यांच्याकडून कोणतंही वक्तव्य येत नाही आणि त्याआधी पाच मंत्री बोलतात. प्रत्येक मंत्री जाहीर करतो आणि ही घोषणा मुख्यमंत्री करतील असं सांगतो. प्रत्येक गोष्टीचं श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. काम करुन तरी ते श्रेय घ्यावं. त्यामुळे कालचा गोंधळ जरा जास्तच झाला आहे. याआधीही अनेकदा गोंधळ झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावली पाहिजे. बोलण्यावर बंधनं आणू नये पण किमान मोठ्या धोरणात्मक निर्णयावर सरकारचं म्हणणं आहे ते स्पष्टपणे आणि थेट जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे,” अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
“गोंधळ इतका निर्माण झाला आहे की, लॉकडाउन आहे की नाही यासंदर्भात अनेकांचे फोन आले. आमच्याकडेही त्याचं उत्तर नव्हतं. लॉकडाउनमुळे सध्या लोकांमध्ये संभ्रम, उत्कंठा, निराशा आहे. त्यामुळे काल घोषणा झाल्यानंतर लोकांना वाटलं झालं सुटलो. छोट्या दुकानदारांना निर्बंध संपले असं वाटलं. अनेक दुकानदारांचा ७ ते २ या वेळेला विरोध असून ९ ते ४ करावी अशी मागणी आहे. त्यामुळे अनेकांची निराशा झाली. सरकारनं या बाबतीत लक्ष देण्याची गरज आहे,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.
काय झाला होता गोंधळ?
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनास्थिती नियंत्रणात आली. राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी तीनच दिवसांपूर्वी काही निर्बंध शिथिल करण्यात आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत पुन्हा एकदा राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन निर्बंध शिथिल करण्यावर चर्चा झाली.
यात जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचे साप्ताहिक प्रमाण आणि ऑक्सिजन खाटांची उपलब्धता या दोन निकषांच्या आधारे राज्यातील जिल्ह्यांची पाच टप्प्यांत विभागणी करावी आणि त्यानुसार निर्बंध शिथिल करण्याचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाने ठेवला होता. चर्चेअंती या प्रस्तावास तत्त्वत: मान्यता देताना या निकषांच्या आधारे निर्बंध कठोर किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सूचना शासननिर्णयाद्वारे अधिसूचित करण्यात येतील, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
तसंच या निकषांचा आधार घेऊन टप्प्यांचे निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन त्याबाबतचा प्रस्ताव आरोग्य विभागाने तयार करावा आणि पुन्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत आणावा. त्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणीची घोषणा करावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.