मुंबई । बांधकाम क्षेत्र हे शेतीनंतर सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणारे क्षेत्र असल्याने या क्षेत्रातील सर्व अडचणी नगरविकास विभागाच्या वतीने सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे दिली. बांधकाम क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या ‘नॅशलन रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल’ च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘नरेडको महाराष्ट्र रिअल इस्टेट फोरम २०२२’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
कोरोना लॉकडाऊनचा फटका जसा सर्वच क्षेत्रांना बसला तसा तो बांधकाम क्षेत्रालादेखील बसला, अनेक विकासकांची परिस्थिती या काळात अतिशय अवघड झालेली होती. त्यामुळे या काळात या क्षेत्राला दिलासा देण्याची गरज होती. बांधकाम क्षेत्राला पुन्हा उभारी मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकांना मुद्रांक शुल्कामध्ये सूट दिली. तसेच विकासकाकडून आकारण्यात येणाऱ्या प्रीमियम मध्ये देखील ५० टक्क्यांनी कपात केली. या निर्णयाचा मोठा फायदा विकासकांना मिळाला तर सरकारच्या महसुलात देखील मोठी भर पडली. तसेच मुद्रांक शुल्क माफ झाल्याने वाचलेल्या पैशातून सर्वसामान्य लोकांना त्यांच्या घरातील लागणाऱ्या काही वस्तू घेता येणे शक्य झाले, असेही नगरविकास मंत्री यावेळी म्हणाले.
नगरविकास विभागाने ३ डिसेंबर २०२१ रोजी राज्यात लागू केलेल्या युनिफाईड डीसीपीआरमुळे संपूर्ण राज्यात बांधकामासाठी समान नियम लागू झाले. तसेच या तरतुदींमध्ये इमारतींची उंची वाढवण्याची मर्यादा देखील शिथिल करण्यात आली तसेच एफएसआय देखील मुबलक प्रमाणात वाढवून देण्यात आला. या सगळ्यांचा मोठा फायदा राज्यातील विकासकांना झाला. अनिश्चिततेच्या गर्तेत अडकलेल्या बांधकाम व्यवसायाला नवसंजीवनी देणारे हे निर्णय ठरल्याने या कार्यक्रमात शिंदे यांना बांधकाम व्यावसायिकांनी उभे राहून मानवंदना दिली. बांधकाम व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने केलेली ही कृती पाहून मंत्री शिंदे.पुरते भारावून गेले त्यांनी अत्यंत विनम्रपणे या सन्मानाचा स्वीकार केला. तसेच यापुढे देखील या क्षेत्राचा विकासासाठी असेच सहकार्य करत राहू, अशी ग्वाही दिली.
राज्यात आणि विशेषतः मुंबई मध्ये सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा देखील नगरविकासमंत्र्यांनी यावेळी घेतला. मुंबईसह संपूर्ण एमएमआर क्षेत्रात तयार होत असलेले ३३७ किलोमीटरचे मेट्रोचे जाळे भविष्यात उपयुक्त ठरेल.शहरांतर्गत असलेले रस्ते मोठे करणे करण्याचा देखील प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवडी न्हावा -शेवा सी लिंक असेल किंवा मुंबई कोस्टल रोड प्रकल्प असेल, किंवा मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर तयार होत असलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई आणि पुणे शहरातील अंतर कमी होणार आहे. तसेच या सर्व प्रकल्पामुळे नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार असून त्याचा बांधकाम क्षेत्राला देखील मोठा लाभ होणार आहे असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
ठाणे शहरात देशातील पहिला क्लस्टर प्रकल्प साकारला जात असून या प्रकल्पाद्वारे दीड हजार हेक्टर जमिनीवर संपूर्णपणे सुनियोजित असे नवे शहर साकारले जाणार आहे. ठाणे महानगरपालिका तसेच सिडकोच्या वतीने आम्ही हा प्रकल्प साकारत असलो तरीही नरेडकोच्या सदस्यांनी देखील त्यात नक्की सहभागी व्हावे त्यांना नक्की इतर सवलती नगरविकास विभागाच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून देऊ असेही त्यांनी यावेळी सांगितले.
‘नरेडको’चे अध्यक्ष संदीप रूणवाल, माजी अध्यक्ष राजन बांदेलकर, बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी, प्रख्यात वास्तूरचनाकार हाफिज कॉन्ट्रॅक्टर आणि बांधकाम क्षेत्रातील सर्व प्रमुख मान्यवर आणि ‘नरेडको महाराष्ट्र’ चे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.