HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

मंत्रालयाच्या ६ व्या मजल्यातील केबिनमध्ये दडलंय काय?- आशिष शेलार

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी पहिल्यांदाच शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी मीडियासमोर येऊन खुलासा केला आहे. त्यानंतर आता भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनीही संजय राठोड यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मंत्र्याला वाचवण्यासाठी मंत्रालयाच्या ६ व्या मजल्यातील केबिनमध्ये दडलंय काय?, असा सवालही आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. आशिष शेलार यांनी आज (२३ फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेऊन माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी संजय राठोड यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

संजय राठोड यांचा सार्वजनिक जाहीर कार्यक्रम होतोच कसा?, त्याला परवानगी मिळते का आणि ती कशी मिळते. तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी जमली, त्याची गुप्तवार्ता विभागाला माहिती होती की नाही?. ज्या भगिनीच्या नावानं संशय उभं राहिलंय ती भगिनीही त्याच समाजाची आहे. त्यामुळे मोठं कारस्थान या प्रकारच्या गुन्ह्याच्या चौकशीला दडपण्याठी होतंय. आतापर्यंत पोलीस यंत्रणेवर राजकीय दबाव होता, आता पोलीस यंत्रणेवर आम्ही सामाजिक दबाव टाकू, असंही त्यांनी दाखवून दिलंय, असं टीकास्त्रही आशिष शेलार यांनी सोडलं आहे.

हिंमत असेल तर चौकशी करून दाखवा, अशा प्रकारचा संदेश दिला जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मिळून या प्रकरणात नेमक्या काय गोष्टी गुलदस्त्यात आहेत, त्या समोर आणणं आवश्यक आहे. पोलिसांवर खूप मोठा दबाव आहे, देवेंद्र फडणवीसांनीही ते स्पष्ट केलं आहे. ज्या भोवती संशयाचं भवरं फिरतंय तो राज्याचा मंत्री आहे, असंही आशिष शेलार म्हणाले आहेत.

ते सन्माननीय मंत्री बोलत नाहीत, समोर येत नाहीत. स्वतः सोशल मीडियावरून त्याबद्दलच स्पष्टीकरण देत नाहीत. त्यांना कुठल्या पोलीस यंत्रणेनं बोलावल्याची माहिती समोर येत नाही. ते स्वतः पोलीस यंत्रणेसमोर जाऊन माहिती देतील, असं काहीही करत नाहीत. पीडितेच्या कुटुंबीयांची वक्तव्येही प्रचंड मानसिक दबावाखाली केलेली दिसत आहेत. कायदेशीर प्रक्रियेनुसार गुन्हा नोंद केलाय की नाही तेच कळत नाही. फॉरेन्सिक लॅबसह इतर चौकशी झाली आहे की नाही याबद्दल स्पष्टता नाही, अशी टीकाही आशिष शेलार यांनी केली आहे.

त्या एका व्यक्तीचं नाव वारंवार टेलिफोनिक टॉकमध्ये येत आहे. त्या व्यक्तीची उपलब्धता आहे की नाही, तो गायब आहे की नाही ते कळायला मार्ग नाही. ह्या टोपीखाली दडलय काय याच प्रमाणे ह्या मंत्र्याला वाचवण्यासाठी मंत्रालयाच्या ६ मजल्यातील केबिनमध्ये दडलंय काय हे समोर यायला हवं, असंही आशिष शेलारांनी अधोरेखित केलंय. बाळासाहेबांची शिवसेना माता भगिनींचं रक्षण हे प्रथम कर्तव्य असं मानणारी होती. मात्र पूजा चव्हाण प्रकरणात संपूर्ण शिवसेना चिडीचूप आहे, असंही ते म्हणाले आहेत.

Related posts

लक्ष्यवेधचा ३६ वा “लक्षसिध्दी सोहळा” दिमाखात संपन्न

News Desk

‘राष्ट्रीय युवक दिना’च्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा

News Desk

मुख्यंमंत्र्यांची कुटुंबासमवेत अयोध्या वारी !

rasika shinde