HW News Marathi
महाराष्ट्र

“ठाकरे सरकारला तालिबानकडून आदेश येतात का?”, आशिष शेलारांचा सरकारवर हल्ला

मुंबई | राज्यात कोरोनाचं संकट कायम असल्याने दहीहंडी उत्सवात सरकारने बंदी आणली आहे. या निर्णयावरून विरोधी पक्षाने ठाकरे सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. “राज्यातील ठाकरे सरकारला तालिबानकडून आदेश येतात का?”, असा बोचरा सवाल उपस्थित करत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा महाविकासआघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने राज्यातील ‘दहीहंडी’ उत्सवावर बंदी घातली आहे. याच पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला आहे.

शिवसेना हिंदुत्वाशी तडजोड करत आहे

आशिष शेलारांनी थेट शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. “शिवसेना हिंदुत्वाशी तडजोड करत आहे”, असा दावा देखील शेलार यांनी केला आहे. त्याचसोबत, मुंबई उच्च न्यायालयाने दहीहंडी उत्सवाच्या वेळी थरांची मर्यादा निश्चित केली तेव्हा हाच पक्ष सर्वात जास्त आरडाओरड करत होता असं म्हणत शिवसेनेला डिवचलं आहे. यावेळी शेलार पुढे म्हणाले की, थरांची उंची आणि गर्दीबाबतचे निर्बंध पाळून दहीहंडी साजरा करण्याला देखील सरकारने परवानगी नाकारली आहे.

पाकिस्तानात जाऊन दहीहंडी साजरी करायची का?

“काही वर्षांपूर्वी जेव्हा मुंबई उच्च न्यायालयाकडून एका जनहित याचिकेवर झालेल्या सुनावणीत तत्कालीन सरकारला दहीहंडीच्या थरांच्या उंचीवर मर्यादा घालण्याचे निर्देश दिले होते. तेव्हा शिवसेनेने मोठा गोंधळ घातला होता. त्यावेळी शिवसेनेने विचारलं होतं कि, आता भारतात सण-उत्सवांवर असे निर्बंध लादले गेले तर आम्ही पाकिस्तानात जाऊन दहीहंडी साजरी करायची का? असा सवाल केला होता”, अशी आठवण आशिष शेलार यांनी यावेळी करून दिली. दरम्यान, सरकारने घातलेल्या बंदीनंतर भाजपाने दहीहंडीचा उत्सव प्रतिकात्मकपणे साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

उद्धव ठाकरे हाय हाय

राज्य सरकारने करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवावर बंदी घातली. याच पार्श्वभूमीवर मनसेने यंदा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची भूमिका घेत ठाण्यामधील भगवती मैदानामध्ये आज (३० ऑगस्ट) सकाळपासून आंदोलन सुरु केलं. मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्त्वात सुरु असलेल्या या आंदोलनात ठाणे पोलिसांनी काही वेळापूर्वी अविनाश जाधव आणि ठाणे शहरातील मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. यावेळी, अविनाश जाधव यांना ताब्यात घेतल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांकडून “उद्धव ठाकरे हाय हाय” अशी घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली

News Desk

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपत्तीचा मुकाबला करण्याचा शासनाचा प्रयत्न! – अजित पवार

Aprna

गहिनीनाथ गडाच्या पंढरपूर वारीचा मार्ग सरकारने मोकळा करावा, पंकजा मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

News Desk